पैशांची मागणी केल्याचे सिद्ध करुन दाखवा !

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्या संभाषणाची ऑडीओ क्लिप ऐकवली. त्यातील संभाषण खरे असून त्यातील आवाज माझाच आहे. मात्र या संपूर्ण संभाषणात मी पैशांची मागणी केल्याचा उल्लेख कुठेच नाही.
मी असले धंदे करीतही नाही. मोपलवार या अधिकार्‍याने राष्ट्रवादीला ही क्लिप पुरविली आहे. मात्र हिम्मत असेल तर कोणत्याही एजन्सीमार्फत चौकशी करा. आता मीच मुख्यमंत्र्यांकडे यासाठी चौकशीची मागणी करणार आहे, अशी माहिती आ.अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांनी समृध्दी महामार्ग प्रकरणातील अधिकारी राधेशाम मोपलवार यांचे संभाषण असलेली एक ऑडीओ क्लिपही पत्रकारांना ऐकवली.

मीच कागदपत्रे दिली
आ. गोटे म्हणाले, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधीर पक्षनेते धनंजय मुंडे आणि आ.अजित पवार, आ.जयंत पाटील, आ.दिलीप वळसे पाटील मोपलवारची सगळी कागदपत्रे मी दिली.

म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बळ मिळाले. सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मीच कागदपत्रे आणि पुरावे दिल्याचे सांगीतले. टीव्ही चॅनेलवर चर्चेस यायची त्यांच्या एकाही नेत्याची हिंमत झाली नाही.

चर्चेस मी आहे, असे कळताच त्यांचे नेते टरकतात.मोपलवारच्या भ्रष्टाचाराबाबत विलासराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असतांना व छगन भुजबळ कै.आर.आर. पाटील, जयंतराव पाटील अजित पवार हे सर्व उपमुख्यमंत्री असताना मी आवाज उठविला होता. मोपलवार अशोक चव्हाणांचे लाडके होते.

आम्ही मोपलवारबद्दल काही बोललो असतो तर, काँग्रेस – राष्ट्रवादीने आमच्यावर डाव उलटवला असता. पण मी कागद- पुरावे का दिले होते?

हे आता त्यांच्या नेत्यांना कळालं असेल. मुख्यमंत्र्यांनी मोपलवारची हकालपट्टी केल्यानंतर मोपलवारने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना शिवांच्या लाखोल्या वाहिल्या, असेही आ. गोटे यांनी यावेळी सांगीतले.

चौकशी लावाच!
माझ्या संभाषणाची क्लिप राष्ट्रवादीने पत्रकारांना दिली.ती नोव्हेंबर महिन्यातील असून गेल्या 6 महिन्यांपासून सोशल मिडीयावर फिरते आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे फार पूर्वीच ती सीडी आलेली आहे. ही घटना मागच्या आर्थिक संकल्पीय अधिवेशनाच्या काळातील आहे.म्हणजे मार्च, एप्रिलमधील आणि त्यांना आता जाग आली. एस.आय.टी.ची मागणी काय करता? शंभर एसआयटया लावा, एसआयटी, सीबीआय, ईडी हे सगळे त्यांच्या नेत्यांनी माझ्याविरूध्द वापरले आहे. असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर सांगाल त्या न्यायाधिशाकडून आणि वकिलांकडून चौकशा करा!

नोटबंदीमुळे नवी करन्सी
आ.गोटे म्हणाले, क्लिपमध्ये माझ्या संभाषणात मी नवीन करन्सी आणायला सांगितल्याचे म्हटले आहे. होय! ते शब्द आहेत. पण त्याआधीचे वाक्य नीट व शांतपणे ऐका.‘मला तुमचा एक रूपया नको. मला परमेश्वराने भरपूर दिले आहे,’ असे मी म्हटले आहे. आणि ती करन्सीची गोष्ट तुम्ही सांगता.8 नोव्हेंबर रोजी जुन्या नोटा रद्द झाल्या. ‘डिसेंबरमधील अधिवेशनाच्या काळात आलात तर, नागपूरमध्ये वापरण्यासाठी नवीन करंसी आणा.’ असे मी म्हटले. याचा अर्थ असा हॉटेलवाले जुन्या नोटा स्वीकारत नाहीत वगैरे वगैरे…असा आहे. जो मोपलवार आपल्या बायकोच्या घटस्फोटासाठी 32 कोटी रूपये देतो, तो आपली अब्रू वाचवायला काय दोन-पाच लाख देणार आहे का? स्वत: मोपेलवारने मला तीन वेळा फोन केला. त्याचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. पण मी त्याला स्वच्छ व स्पष्ट शब्दात सांगितले. 1995 पासून मी तुम्हाला शोधत होतो. तुम्ही आता 22 वर्षानीं मला सापडलात आणि पुराव्यासकट सापडलात, असेही आ. गोटे म्हणाले.

भुरटे धंदे करत नाही!
सट्टयाच्या पेढया चालविणे, रॉकेलचा काळाबाजार करणे असे भुरटे धंदे करणार्‍या चिंधीचोरांना फार काही मोठे घबाड हाती सापडल्याचे वाटते. पण मला इज्जत आहे आणि गेली 50 वर्षे उभा महाराष्ट्र मला चांगल्याप्रकारे ओळखतो आहे.ज्या गोष्टी आहेत, त्याचा कधीही इन्कार केला नाही, करणार नाही. मला मिळालेले धाडस ही परमेश्वराची देणगी आहे. भल्याभल्यांना सत्य स्वीकारणे व पचवणे कठीण जाते.

मोपलवार हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘प्रॉडक्ट’
समृध्दी महामार्ग प्रकरणात तोट्यातील एक कंपनी वर्षभरातच नफ्यात आली आहे. अधिकार्‍यांनीच जमिनी खरेदी केल्या असून पैसे काढून घेतले आहेत. याची सखोल चौकशी करावी आणि पार्टनरशिपमध्ये किती टक्केवारी आहे, याबाबत सभागृहात मी वाचा फोडली. राज्याचे मुख्यमंत्री सतर्क झाले. दरम्यानच्या काळात मोपलवार फोन टॅपींगचे काम करीत होता. मोपलवार हा तेलगीच्या स्टॅम्प अनधिकृतपणे विकत होता.त्याच्यावर याप्रकरणी मुंबई क्राईम बँचकडे गुन्हा दाखल आहे. तेलगीने दिलेल्या जबाबातील सात पानांमध्ये मोपलवारचा सहभाग असल्याचे त्याने कबुल केले आहे. मोपलवारला विलासराव देशमुखांनी वाचविले.मी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग, डॉ.जितेंद्र प्रसाद यांच्यासह सीबीआय,लाचलुचपत,इन्कमटॅक्स आणि सीव्हीसी विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.पंतप्रधान कार्यालयाचे मला सहावेळा रिमाईंडर पत्र प्राप्त झाले असून 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान मी दिल्लीत जात आहे. या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे अधिकारी अनिल सिन्हा यांची भेट घेणार आहे. मोपलवारने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात 15 वर्ष नंगानाच केला.यासंदर्भात विखे पाटील,जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्याकडेसुध्दा मी पुराव्याचे कागदपत्र सादर केले आहेत. मोपलवारने 800 कोटीचा गैरव्यवहार केल्याची माहिती असून सभागृहात मी बोललो आहे. मोपलवार हे राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट असून तो नांदेडचा रहिवाशी आहे. त्याच्या संदर्भातल्या 35 ऑडियो क्लिप माझ्याकडे आहेत. सतिष मांगले याने त्याच्या काही साथीदारांसह डिटेक्टीव कंपनी स्थापन केली होती. फोन टॅप करण्याचे काम तो करीत होता. यासंदर्भात दि.16 ऑगस्ट दुपारी 4 वा. मी मंत्रालयात पत्रकार परिषद घेणार आहे असेही आ.अनिल गोटे यांनी सांगितले.

‘गुड्ड्या’ प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
गुड्ड्या चोर हत्याकांडप्रकरणात कुठल्या बिळात गेले आमदार? असा प्रश्न करून मला अकारण या वादात ओढले गेले.त्यामुळे धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गुन्हेगारी स्वरूप धुळेकर जनतेसमोर आणण्याची संधी मिळाली. गुड्ड्या हत्याकांडप्रकरणी मी विचारलेल्या दहा मुद्दयांचा खुलासा करावा, असे मी सातत्याने सांगत आहे. मात्र आपल्या गुन्हेगारी कृत्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्ष करीत आहे.आता मोपलवार नावाच्या भ्रष्टाचारी व व्यभिचारी अधिकार्‍याच्यासंदर्भात माझ्याविरूध्द बोलले जात आहे. मात्र आता मीच मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन जो काय तपास करावयाचा, शहानिशा करावयाची ती करा, असे सांगणार आहे. यासाठी फॉरेन्सिंक लॅबोरेटरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. कारण हा माझा आवाज आहे आणि संभाषणात बोललो तो शब्द न शब्द खरा आहे. सहा महिन्यांपूर्वीचे संभाषण वाजवून लोकांना मूर्ख बनवित आहात, हे कारण न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही.गुड्ड्या हत्त्याकांडावरून लक्ष विकेंद्रीत करण्यासाठी माझ्या संभाषणाची सिडी काढण्याचा बालीशपणा केला, हे धुळेकर जनतेच्या लक्षात आले आहे, असेही आ. अनिल गोटे यांनी म्हटले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*