Type to search

maharashtra आवर्जून वाचाच धुळे

31 डिसेंबरला धुळे महापौरांची निवड

Share
धुळे । वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबर रोजी धुळे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे. यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष महासभा सकाळी 11 वाजता घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी जारी केले आहेत. सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी काल दि.18 रोजीच या निवडी बाबतचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना जारी केले होते. विद्यमान महापौर सौ.कल्पना महाले आणि उपमहापौर उमेर अंन्सारी यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपत होता. परिणामी 31 डिसेंबर किंवा त्या आधी नविन महापौरांची निवड होणे अपेक्षीत होते. आता वर्षाच्या अखेरच्या दिवशी महापालिकेतील राष्ट्रवादी आघाडीचा सुर्यास्त होवून नविन वर्षात पालिकेतील भाजपाच्या नवीन कार्यकाळाचा सुर्यादय होणार आहे.

मनपात भाजपाचे 50 नगसेवकांसह स्पष्ट बहुमत प्राप्त आहे. स्पष्ट बहुमतामुळे महापौर, उपमहापौर निवड ही प्रत्यक्षात फक्त औपचारीकताच राहणार आहे. पक्षश्रेष्ठी निवडतील त्यांचीच महापौर आणि उपमहापौर म्हणून निवड होणार आहे. परिणामी पक्षपातळीवर महापौर निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. जिल्हा महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी भाजपात लॉबिंग होत नसल्याचा आधीच जाहिर केले असले तरी महापौर म्हणून संधी देतांना पक्षात जुना आणि नवा अशी स्पर्धा टाळता येणे शक्यच नसल्याचे जाणकारांना वाटते.

मनपात बहुमत असल्याने महापौर निवड ही केवळ औपचारिकता असली तरी पक्षश्रेष्ठींसाठी ही अग्नीपरिक्षाच ठरणार आहे. ही निवडच भविष्यातील राजकारणाची दशा आणि दिशा निश्चित करेल. परिणामी महापौर म्हणून कुणाचे नाव निश्चित करावे यासाठी भाजपाच्या धुरिणांना प्रचंड विचार करावा लागणार आहे.

सध्यातरी महापौरपदासाठी शितल नवले यांचे नाव आघाडीवर असले तरी पक्षातील अनुभवी नगरसेविका सौ.प्रतिभा चौधरी यांची बाजूही भक्कम मानली जात आहे. अनुभवी आणि पक्षाच्या कार्यपध्दतीची माहिती असल्याने त्यांच्या खांद्यावरच महापौरपदाची जबाबदारी टाकावी असे एक मतप्रवाह भाजपात आहे.

शिवाय शितल नवले यांना संधी दिल्यास त्यांच्या पाठिशी वडिल व माजी महापौर मोहन नवले यांच्या अनुभव राहणार आहे. अशा परिस्थितीत शितल नवले भविष्यात वरचढ ठरण्याची शक्यता लक्षात घेवून भाजपाकडून आताच रणनिती निश्चित करतांना खबरदारी घेतली जाणार आहे. असे झाले तर सौ.प्रतिभा चौधरी यांचे पारडे जड मानले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!