तरुणाची हत्त्या करणार्‍या दोघांना जन्मठेप

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-अनैतिक संबंधास अडथळा ठरू नये म्हणून महिलेच्या पतीचा धावत्या गाडीत दोरीने गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश बावस्कर यांनी ठोठावली.
याबाबत माहिती अशी की, म्हळसर, ता. शिंदखेडा येथे राहणारा राजेंद्र शिवदास सोनवणे याच्या पत्नीशी सुभाष रामचंद्र पाटील याचे अनैतिक संबंध होते.
या संबंधाला राजेंद्र अडथळा ठरू नये म्हणून दि. 28 फेब्रुवारी 2014 रोजी रात्री 8.30 ते 9.30 दरम्यान मौजे पिंप्री फाटा ते कमखेडा फाट्या दरम्यान राजेंद्र यास दीपक लोटन माळी रा. शिरपूर व सुभाष रामचंद्र पाटील यांनी शिरपूर फाटा येथील हॉटेल वेलकम समोरुन एमएच18 व्ही 506 क्रमांकाच्या क्रूझर गाडीत बसविली.

त्यावेळी सुभाष रामचंद्र पाटील याने धावत्या गाडीतच राजेंद्र याचा दोरीने गळा आवळून गळफास दिला व हालचाल करु नये म्हणून दीपक लोटन माळी याने राजेंद्र यास दाबून धरले व दोघांनी त्याला संगनमताने ठार केले.

त्यानंतर राजेंद्र मृतदेह कमखेडा शिवारात भगवान बुधा भोई यांच्या मालकीच्या शेतातील पिकात आणून टाकले. राजेंद्रची ओळख पटवू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोघांनी त्याच्या मृतदेहावर रॉकेल टाकून पेटवून दिले व त्याच्या जवळील पेनड्राइव्ह आणि पाकीट असे साहित्य जाळून टाकले.

याबाबत दत्तात्रय शिवदास सोनवणे यांनी नरडाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा न्यायालयात पोनि साहेबराव जाधव यांनी दीपक लोटन माळी आणि सुभाष रामचंद्र पाटील यांच्याविरुध्द जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश बावस्कर यांच्यापुढे सुरु झाला. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एम.बी.देशपांडे यांनी साक्षी पुरावे तपासले.

साक्षी पुरावा ग्राह्य धरुन न्यायालयाने दीपक माळी व सुभाष पाटील यांना दोषी ठरविले. भादंवि 302, 34 अन्वेय जन्मठेप व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधी कारावासाची शिक्षा तसेच भादंवि 201 अन्वये दोन वर्ष सक्त मजूरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदेची शिक्षा दोघांना जिल्हा व सत्र न्यायधीश बावस्कर यांनी ठोठावली.

 

LEAVE A REPLY

*