धुळे । दि.12 । प्रतिनिधी-पावसाने दडी मारली असून दुबार पेरणी करूनही पिके करपू लागली आहेत.सर्वत्र पिण्याची पाण्याची टंचाई जाणवू लागली असून नद्यानाल्यांसह तालुक्यातील छोटेमोठे प्रकल्प कोरडेठाक आहेत.
त्यामुळे गेल्या तीन वर्षापेक्षाही भयाण परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण धुळे तालुका दुष्काळाच्या संकटात सापडला आहे.

शेतकर्‍याला आधार देण्यासाठी आणि पिक परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आ.कुणाल पाटील यांनी तालुक्यात दुष्काळी दौरा केला.तालुक्यातील जुनवणे, विसरणे, हडसुणे, बोरविहीर यासह तालुक्यातील दुष्काळी गावांचा व शेतशिवाराचा दौरा केला.

पिके करपली-

धुळे तालुक्यात कपाशी, बाजरी, ज्वारी, भूईमुग, मका, कांदा यासह कडधान्य या पिकांचे उत्पन्न मोठया प्रमाणात घेतले जाते. यावर्षी तालुक्यात काही भागात पावासाचे वेळेवर आगमन झाले.त्यामुळे बहूतांश शेतकर्‍यांनी पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र मध्यंतरी पावसाने हुकावणी दिल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांसमोर उभे ठाकले. बळीराजाने मोठ्या आशेने दुबार पेरणीही केली. मात्र पुन्हा आता गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांवर दुष्काळाचे संकट घोंघावू लागले आहे. पावसाच्या हुलकावणीने पिके करपू लागली असून पाण्याअभावी पिकांनी माना टाकायला सूरूवात केली आहे.त्यामुळे आता पाऊस आला तरी पाहिजे तेवढे उत्पन्न येणार नाही आणि शेतकर्‍यांचा खर्चही निघणार नाही.परिणामी शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली ओढला गेला आहे.

पाणी टंचाई- पावसाने दडी मारल्याने हडसूणे, बोरविहीर, विसरणे, जुनवणे यांसह शिरूड पट्टयातील व तालुक्यातील असंख्य गावातील ग्रामस्थांना पुन्हा भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांमध्ये दुष्काळामुळे सुमारे 15 ते 20 दिवस नळांना पाणी येत नाही.पिण्याच्या पाण्यासाठी दिवसभर हातातले काम सोडून घरी थांबावे लागते. पाण्यासाठी वणवण फिरावे लागते, दरम्यान पाणी आणण्यासाठी शाळेत जाणार्‍या मुलांना शाळेला दांडी मारून पाणी आणावे लागत आहे. खोल गेलेल्या विहीरी आणि धुळे चाळीसगाव महामार्ग पार करून शालेय विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे.दरम्यान पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी आ.कुणाल पाटील यांनी तत्काळ पाणी टँकर सुरू करण्याच्या सूचना तहसिलदार अमोल मोरे यांना दिल्या असून पाणी टंचाई दूर करण्यासाठी सर्व उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही आ.पाटील यांनी ग्रामस्थांना यावेळी सांगितले.

प्रकल्प कोरडे-

पुरेशा पावसाअभावी धुळे तालुक्यात अंचाळे, बुरझड, चौगाव, देवभाने, फागणे, गोंदूर, खंडलाय, खेडा, कोठारे, कुळथे, लामकानी, मांडळ, मुकटी, नांद्रे, निमगुळ, दह्याणे, पुरमेपाडा, रानमळा, शिरधाणे असे एकूण 18 लघु प्रकल्प असून हे सर्व प्रकल्पही कोरडे आहेत. तर कनोली, सोनवद या मध्यम प्रकल्पांनीही तळ गाठला आहे, अक्कलपाडा प्रकल्पात बर्‍यापैकी पाणी आले असले तरी सध्या त्याचा उपयोग शेतीसाठी करता येणे शक्य नसल्याचे दिसते.त्यामुळे पुढील हंगाम व पाणी टंचाईचे संकट टाळण्यासाठी हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे.त्यासाठी शेतकर्‍यांची आजही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

सरासरी पर्जन्यमान-

 

धुळे तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान गेल्यावर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी असून आतापर्यंत तालुक्यातील 7 मंडळविभागात फक्त 10 ते 12टक्के एवढाच पाऊस झाला आहे. तालुक्यात एकूण 12 मंडळ आहेत.
नुकसान भरपाई द्यावी- पहाणी दौर्‍यात आ.कुणाल पाटील यांनी थेट शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन बैठक घेतली तर विसरणे येथे ग्रामस्थांशी पारावर बसून पाणी टंचाईची स्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेत आधार देत त्यांना दिलासा दिला.यावेळी शेतकर्‍यांशी चर्चा करतांना आ.पाटील यांनी सांगितले कि,विहीरी अधिग्रहण करणे, पाण्याचे टँकर चालू करणे अशा विविध पाणी टंचाईवरील उपाय येाजना केल्या जातील.ज्या ज्या शेतकर्‍यांनी दुबार पेरणी करूनही त्यांचे पिक हातचे गेले आहे किंवा ज्या भागात दुष्काळ सदृश्यस्थिती आहे अशा ठिकाणी पंचानामा करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी व दुष्काळ जाहिर करण्यासाठी सरकारकडे मागणी केली जाईल.

ग्रामसभेत दुष्काळाचा ठराव- धुळे तालुका दुष्काळाच्या संकटात सापडला असून सर्वत्र पिके करपली आहेत. पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील पिक आणेवारी 50 पैशाच्या आत लावण्यात यावी तसेच दुष्काळ जाहिर करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने धुळे तालुका दुष्काळी जाहिर करण्याचा ठराव ग्रामसभेत करावा असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केले. दुष्काळी पहाणी दौर्‍याप्रसंगी आ.कुणाल पाटील यांच्यासमवेत समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, तहसिलदार अमोल मोरे, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर,पंढरीनाथ पाटील, बापू खैरनार, मंडळ कृषी अधिकारी पी.व्ही.निकम, कृषी सहाय्यक एस.व्ही.नगराळे, बापू खैरनार, जुनवणे येथील साहेबराव पाटील, अजबराव पाटील, सरपच दिपक पाटील, किशोर पाटील, रविंद्र पाटील, विसरणे सरपंच जितेंद्र पाटील, जयवंत पाटील, महारू पाटील, बोरविहीर येथील अशोक पाटील, डॅा. दिलीप पाटील यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कृषी तसेच महसुल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*