सेटलमेंटसाठी आ.गोटेंकडून आर्थिक तडजोडी

0

धुळे । दि.11 । प्रतिनिधी-एका प्रकरणात पैशांची मागणी करण्याबाबत भिसे नावाचा भाजपा कार्यकर्ता आणि आ. अनिल गोटे यांच्यातील संभाषणातील कथित सिडीची क्लीप आपल्याकडे प्राप्त झाली असून यामुळे आ. गोटे यांच्या नैतिकतेचा बुरखा फाटला आहे.

यातील आवाज हा आ.गोटेंचाच असल्याची आपल्याला खात्री असून या संभाषणाची तपासरी फोरेन्सिक लॅबमध्ये करण्यात यावी.या प्रकरणात एसआयटी नेमून त्यात इडी,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इन्कम टॅक्स विभागाचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यात यावी.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश समितीचे प्रमुख यांना करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मनोज मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेला संजय वाल्हे, गणेश चौधरी, चंद्रकांत महाजन, राजकुमार बोरसे, महेंद्र शिरसाठ, ललित कोरके, बाळू आगलावे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनोज मोरे म्हणाले की, ही ऑडीओ क्लिप आ.गोटे यांच्या सभ्यतेचा, नैतिकतेचा बुरखा फाडणारी आहे.‘न खाउंगा,ना खाने दुंगा’या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराविरोधातील घोषणेला आव्हान देणारी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्या स्वच्छ व पारदर्शी कारभाराचे बाभाडे काढणारी आहे. आ. गोटे हे मुख्यमंत्र्याशी असलेल्या जवळीकतेचा फायदा घेत आहेत.क्राईम ब्रँचचा व सत्तेचा गैरवापर करीत आहेत, असा आरोपही मनोज मोरे यांनी यावेळी केला.

श्री.मोरे पुढे म्हणाले की, या ऑडीओ क्लिपमध्ये आ.अनिल गोटे व भाजपचा भिसे नावाचा कार्यकर्ता यांच्यातील झालेले संभाषण आहे.

भिसे हा भाजपाच्या राज्यातील मोठमोठ्या नेत्यांसोबत राहतो तसेच भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा पदाधिकारी आहे. या क्लिपमध्ये आ.गोटे व भिसे यांच्या संभाषणात मोपलवार, मांगले आणि केळकर यांच्या नावाचा उल्लेख आहे.

‘लक्ष्यवेधी लावायची कि नाही, मुंबई क्राईम ब्रँचकडे तपास द्यायचा,मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी माझ्या संबधातले आहेत, मी करतो ते बरोबर’ अशा आशयाचा उल्लेख या संभाषणात आहे.

‘उद्या नागपूर येथे येताना नवीन करन्सी घेऊन ये. जुनी नको. ते कोणी घेत नाही’ असेही आ.गोटे या क्लिपमधील संभाषणात भिसेला सांगत आहेत.

मुंबई क्राईम ब्रँचकडे तपास कोणत्या प्रकरणात दिला?मांगलेच्या की किडनॅपिंगच्या?असे भिसे यावेळी आ.गोटेना विचारतो. यातून भिसे ही व्यक्ती भ्रष्टाचाराची प्रकरणे आ.गोटेंकडे आणून देते व आ.गोटे त्या प्रकरणाचे वर्गीकरण करून लक्ष्यवेधी लावणे किंवा क्राईम ब्रँचकडे सदर तपास सोपविण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून करून घेतात, असा आरोप मनोज मोरे यांनी केला.

आपण 9 ऑगस्टला मुंबई येथे कार्यकर्त्यांसह मराठा मोर्चासाठी गेलो होतो. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने आझाद मैदानावर आपल्याला ऑडिओ क्लिप पेन ड्राईव्हमध्ये दिली, असे मोरे यांनी सांगितले.

 

होय, तो आवाज माझाच !


माझ्याशी संबंधित ज्या ऑडिओ क्लिपची सध्या चर्चा सुरू आहे. त्या क्लिपमधील संभाषणाचा आवाज माझाच आहे. त्यातील संभाषणही खरे आहे.

या क्लिपच्या आधारे मी विचलित होईल, असे विरोधकांना वाटत असावे. मात्र ते शक्य नाही. त्याबाबत मी उद्या दि.12 रोजी सकाळी 11 वाजता जाहीरपणे यातील बाबी स्पष्टपणे जनतेसमोर मांडणार आहे.

-आ. अनिल गोटे, धुळे शहर

 

LEAVE A REPLY

*