वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी त्रिस्तरीय यंत्रणा

0
धुळे । दि.10 । प्रतिनिधी-वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत आहे. मात्र याबाबत जनतेला फारशी माहिती नसल्याने दरवर्षी फक्त अडीच ते तीन हजार एवढ्याच तक्रारी विद्युत लोकपालांकडे येत असतात.
यासाठी वीज ग्राहकांनी जागरूक होणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीत दाद मागण्याची संधी वीज ग्राहकांना आहे. सहा महिन्यात ग्राहकांना न्याय देणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्युत लोकपाल आर.डी.संखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वीज वितरण विभागाचा ‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विज गार्‍हाणेच्या सुनावणीसाठी विद्युत लोकपाल श्री.संखे आज शहराात आले होते. दुपारी अधिक्षक अभियंता कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना संखे म्हणाले की, विद्युत कायदा ग्राहकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा अस्तित्वात आहे.

पहिल्या टप्यात तक्रार निवारण कक्षात तक्रार करता येते. दुसर्‍या टप्यात विद्युत फोरमकडे अपील आणि अंतीम सुनावणी ही विद्युत लोकपालच्या पिठासमोर होत असते. या माध्यमातुन सहा महिन्यात निकाल देणे आवश्यक आहे.

मात्र या त्रिस्तरीय यंत्रणेच्या बाबतीत लोकांना फारसी माहिती नाही. राज्यात सव्वा दोन कोटी वीज ग्राहक असतांना त्यातुलनेत तक्रारींची संख्या फारच कमी आहे.

याकरीता ‘लोकपाल आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अन्याय झाला असेल तर ग्राहकांनी सरळ तक्रार केली पाहिजे, असे देखील त्यांनी सांगीतले.राज्यात दोन लोकपाल आहेत.

त्यात एक नागपुर येथे मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी तर मुंबई लोकपालाच्या कक्षेत उर्वरीत महाराष्ट्राचा समावेश आहे.

विद्युत लोकपालकडे तक्रार करण्यासाठी ग्राहकाला शुल्क लागत नाही. वकील, शुल्क, स्टॅम्प व कागदपत्रांची आवश्यकता नाही.

त्यामुळे विनाखर्च न्याय मिळु शकतो. असेही त्यांनी सांगीतले. यावेळी वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता संजय सरग यांनी म्हणाले की, सेवा अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

ग्रामपंचायत स्तरावर ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करुन जनजागृती करण्यात येत आहे. तसेच विद्युत सहाय्यक नियुक्तीसाठी प्रयत्न सुरु आहेत.

शिरपुर तालुक्यातुन 74 ग्रामपंचायतीत विद्युत सहाय्यक नियुक्तीची प्रक्रीया सुरु असून या विद्युत सहाय्यकांना 3 हजार रुपये मेहनताना तसेच विमा, सुरक्षा साधने, प्रशिक्षण आदि सुविधा महावितरण पुरविणार आहे.

सप्टेबंरपर्यंत जिल्ह्यातील सर्व पदे भरण्यात येतील, असे म्हणाले. यावेळी विद्युत लोकपाल सचिव दिलीप डुमरे, धनंजय मोहोड, कार्यकारी अभियंता के.डी.पावरा, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, अ‍ॅड.चंद्रकांत येशीराव, आदि उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*