धुळे । दि.10 । प्रतिनिधी-पोलिस होऊन जनसेवेचे व्रत स्वीकारण्याची संधी सर्वांनाच मिळत नाही. पोलिसांना जनसेवेचे हे व्रत पेलण्यासाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती कायम ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी येथे केले.
पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य कवायत मैदानावर पोलिस प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक 6 चे दीक्षांत संचलन झाले. त्यावेळी श्री. जाधव बोलत होते.
यावेळी पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य चंद्रकांत गवळी, माजी प्राचार्य प्रशांत बच्छाव, महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकार देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिम्मतराव जाधव, उपप्राचार्य शशिकांत महाजन आदी उपस्थित होते.

विशेष पोलिस महानिरीक्षक श्री.जाधव म्हणाले, समाजाला सुदृढ ठेवण्यासाठी असामाजिक तत्वांवर उपचार करावे लागतात. समाजातील दुष्ट, असामाजिक, गुंड प्रवृत्तींना कायद्याच्या कक्षेत आणून त्यांच्यावर कारवाईची संधी पोलिसांना मिळते.शिस्त हा पोलिस दलाचा आत्मा आहे. तो बिघडणार नाही, याची पोलिसांनी जाणीव ठेवली पाहिजे.

चारित्र्य, विश्वासार्हता, निष्ठा आणि शिस्त तुमचे करिअर घडविणार आहे. पैसा हा सर्वस्व नाही. त्याच्यापेक्षा चारित्र्य महत्वाचे आहे, असेही विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. जाधव यांनी नमूद केले. कायद्याची अंमबलजावणी करताना दुरुपयोग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच जनतेच्या सुख-दुखा:त समरस झाले पाहिजे. कर्तव्य पूर्ती करताना मनाची संवेदनशीलता हरवू देवू नका, असेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य गवळी म्हणाले, सहाव्या प्रशिक्षण वर्गात 380 पोलिस शिपायांना 9 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण केंद्रासाठी आतापर्यंत शासनस्तरावरुन सुसज्ज वसतिगृह, प्रशासकीय इमारत, सुरक्षा भिंतीचे कुंपणाचे काम पूर्ण होवून ही बांधकामे ताब्यात घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत 6 वर्ग खोल्या, प्राचार्य, उपप्राचार्य निवासस्थान, अधिकारी निवासस्थाने, 210 प्रशिक्षणार्थी क्षमतेचे वसतिगृह, बहुउद्देशीय सभागृह, परिसरातील रस्ते व इतर कामांसाठी 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.जगदीश देवपूरकर, वाहीद अली सय्यद, रमेश बारसे यांनी सूत्रसंचालन केले.

विशेष पोलिस महानिरीक्षक श्री.जाधव यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी केली. त्यानंतर नवप्रवीष्ट पोलिस शिपाई यांनी परेड कमांडर संदीप गेंड याच्या नेतृत्वाखाली शानदार संचलन केले. त्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलिसांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

यावेळी श्री.जाधव यांच्या हस्ते नवप्रवीष्ट पोलिस शिपाई सत्र क्रमांक 6, बक्षीस पात्र पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्यात आंतर वर्ग प्रथम स्वप्नील भीमा चंदन, बाह्यवर्ग प्रथम संदीप आनंदा गेंड, सर्वोत्कृष्ट गोळीबार प्रकाश शंकर चव्हाण, रामदास ज्ञानेश्वर पांढरे, सर्वोत्कृष्ट कवायत संदीप आनंदा गेंड, सर्वोत्कृष्ट खेळाडू सिध्देश्वर मल्लिकार्जुन रायगोंडा, सर्वोत्कृष्ट कमांडो राहुल विश्वेश्वर मडावी, हरिप्रसाद दिगंबर अंभारे, आंतरवर्ग पेपर क्रमांक 1 ते 3 कायदा विषयात प्रथम हर्शल छोटू पाटील, प्रदीप रंगनाथ टेकाळे, आंतरवर्ग पेपर क्रमांक 4 ते 8 विषयात प्रथम स्वप्नील भीमा चंदन, द्वितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी किरण श्रीराम नवले, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी स्वप्नील भीमा चंदन.यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव यांच्याहस्ते प्रेक्षक गॅलरीचे उद्घाटन व स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्रशिक्षणार्थी पोलिसांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरिकरण केले. उत्कृष्ट आंतरवर्ग अधिकारी गिरीश मधुकर सबनीस, एच. आर. पठाण, पोलिस निरीक्षक. उत्कृष्ट बाह्य वर्ग अधिकारी युवराज कौतिक पाटील, राखीव पोलिस निरीक्षक, रवींद्र उत्तमराव तायडे, राखीव पोलिस उपनिरीक्षक, उत्कृष्ट बाह्यवर्ग प्रशिक्षक विजय यशवंत गावंडे, उत्कृष्ट पोलिस अंमलदार नरेंद्र शिवसिंग चव्हाण, विशेष परिश्रम विकास तोताराम पाटील, उत्कृष्ट समालोचक जगदीश देवपूरकर, वाहीद अली सय्यद.

 

LEAVE A REPLY

*