कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्त्या

0
शिंदखेडा तालुक्यातील बाभुळदे येथील योगेश भटू शिंदे (वय 38) या शेतकर्‍याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून स्वत:च्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.

याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, बाभुळदे येथील योगेश शिंदे हे दि.8 ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला लागले.

त्यानंतर शेतात जातो असे सांगून ते सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शिंदे यांच्या शेजारच्या शेताचे मालक हिंमत पाटील यांच्या लक्षात आला.

त्यांनी ही माहिती शिंदे कुटुंबियांना दिली. योगेश शिंदे हे घरातील कर्ते होते. त्यांच्या पश्चात वृध्द आई-वडील, लहान भाऊ, पत्नी, पाच आणि तीन वर्षाचे दोन मुले असा परिवार आहे.

पाटील यांची आठ बिघे जमिन असून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. त्यांनी स्टेट बँकेतून एक लाख 90 हजार पिककर्ज घेतले होते.

तसेच नातेवाईकांकडूनही उसनवार पैसे घेतलेले होते. ते कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत योगेश हे होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा गावात ऐकण्यास मिळाली.

मोटारसायकल चोरी – शहरातील देवपूर परिसरात असलेल्या भगवती नगरात राहणारे जिजाबराव सुपडू बाविस्कर यांनी त्यांच्या मालकीची 15 हजार रुपये किंमतीची एमएच 18 एएफ 8498 क्रमांकाची मोटारसायकल दि.9 जुलै रोजी घरासमोर लावलेली होती. अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल चोरुन नेली, अशी फिर्याद जिजाबराव सुपडू बाविस्कर यांनी देवपूर पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पाणी भरण्याचा वाद – फोफरे, ता.साक्री शिवारातील शेतातील सामाईक विहिरीतील पाणी भरण्यावरुन संजय भिला देवरे, रा.सैताळे आणि भैय्या बापू देवरे यांच्यात दि.8 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता वाद झाला. भैय्या याने काठीने संजय भिल यांना मारहाण केली. तर रत्नाबाई भैय्या देवरे हिने संजयच्या बरगडीजवळ चावा घेवून जखमी केले. तसेच दोघांनी दमदाटी करुन शिवीगाळ केली. याबाबत संजय भिला देवरे यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे भैय्या बापू देवरे आणि रत्नाबाई देवरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

महिला बेपत्ता – तीन मुलांसह महिला घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार थाळनेर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. सावळदे, ता.शिरपूर येथे राहणारी वैशाली योगेश कोळी (वय 31) हे दि.4 ऑगस्ट रोजी तिचा मुलगा राज (वय 8), पप्पू (वय 4) आणि मुलगी रोशनी (वय 6) या तिघांना सोबत घेवून ती घरातून बाहेर गेली. तिचा शोध घेतला, पण ती मिळून आली नाही, अशी तक्रार योगेश संतोष कोळी यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरुन मिसिंग दाखल करण्यात आली. पुढील तपास हेकाँ माळी हे करीत आहेत.

मिटरमध्ये फेरफार करुन विजचोरी : तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल-मिटरमध्ये तांत्रिक फेरफार करुन महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान व्हावे म्हणून तिघांनी विजचोरी करुन फसवणूक केली. या प्रकरणी तीन जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विज वितरण कंपनीतर्फे विजचोरी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे भरारी पथकाद्वारे छापे टाकले जात आहेत. असाच छापा दि.2 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता शहरातील साक्री रोडवरील जलगंगा सोसायटीत टाकले असता तेथे कृष्णा गोरख पाटील, विनोद वसंत सोनार या दोघांनी मिटरमध्ये तांत्रिक फेरफार करुन विजचोरी केली.

असाच प्रकार पदमनाभ नगरात राहणारे छोटू बाविस्कर यांच्याकडेही उघडकीस आला आहे. या तिघांनी 263 युनिटची चोरी केली असून या प्रकरणी सहाय्यक अभियंता प्रशांत संभाजी गवळी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भादंवि 420, 468, 471, 34 सह भारतीय विद्युत कायदा कलम 2003 चे कलम 135 प्रमाणे कृष्णा गोरख ठाकरे, विनोद वसंत सोनार आणि छोटू बाविस्कर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ के.व्ही.सोनवणे हे करीत आहेत.

धुळे बसस्थानकातून 60 हजारांची चोरी
धुळे बसस्थानकाच्या धुळे-नंदुरबार फलाटावर पूनम भूषण पाटील (वय 25, रा.नंदुरबार) या दि.8 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता बसची वाट पहात असताना त्यांच्या बॅगेत ठेवलेले 60 हजार 500 रुपये किंमतीची पाच तोळ्याची सोन्याची मंगलपोत व रोख 500 रुपये चोरुन नेले. याबाबत भूषण पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

विनापरवाना 22 रिक्षा पकडल्या
प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात 22 विना परमिटच्या रिक्षा पकडल्या. रिक्षा चालकांसाठी परमिट खुले केले असून आरटीओमधून नव्याने परमिट देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, विनापरमिट वाहन चालविणार्‍या, वाहनांवर नंबर प्लेट नसलेल्या आणि म्युझिकल हॉर्न वाजविणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरुच राहील, असा इशारा देण्यात आला आहे. दि.7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विनापरमिट प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आज दि.9 रोजी आरटीओ विभागाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नवनाथ जगदाळे, चंद्रकांत कुरे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक प्रकाश मुंढे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील शिरसाठ, विलास परदेशी, शांताराम भोई, हेकाँ आसिफ शेख, नंदू विसपुते, धनंजय मोरे, संतोष माळी, पोना दिनेश देवरे, चंद्रकांत पाटील, रतन मोरे, ज्ञानेश्वर गिरासे यांच्या पथकाने आज कारवाई केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात 22 विनापरमिट असलेल्या रिक्षा पकडण्यात आल्या.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला पळविले
धुळे शहरातील धनाई पुनाई कॉलनीत राहणारी रिमा मुकुंद यादव (वय 20) हिला मिलींद राजेंद्र आवटे, रा.रेल्वेस्टेशन रोड याने लग्नाचे आमिष दाखवून तिला फूस लावून, धमकी देवून पळवून नेले. याबाबत सुनील बापू यादव यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 363, 506 प्रमाणे मिलींद राजेंद्र आवटेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई आर.जी.माळी हे करीत आहेत.

शेतकर्‍यांची 30 लाखात फसवणूक
कांदा खरेदीचे आमिष दाखवून 67 कांदा उत्पादक शेतकर्‍यांना 30 लाख 67 हजार 414 रुपयात गंडा घातल्याप्रकरणी एकाला कळवण येथून तालुका पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, धुळे तालुक्यातील लोहगड, चौगाव, कुसूंबासह परिसरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांदा पिक खरेदीचे आमिष दाखवून अफसर खाँ शब्बीरखाँ पठाण, रा.कुसूंबा व त्याचा भागिदार महम्मद सरबर, रा.कर्नाटक या दोघांनी काही शेतकर्‍यांकडून कांदा खरेदी केला व त्याचे पैसे देतो, असे सांगून पोबारा केला. दोघांनी तालुक्यातील 67 शेतकर्‍यांकडून 30 लाख 67 हजार 414 रुपये किंमतीचा कांदा खरेदी केला होता. याबाबत काही शेतकर्‍यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेवून कैफियत मांडली होती. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात मनोज दिलीप पाटील यांनी फिर्याद दिली. भादंवि 406, 420, 120 ब प्रमाणे अफसर खाँ शब्बीरखाँ पठाण आणि महम्मद सरबरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तालुका पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक वाय.आर.जाधव, सी.टी.सैंदाणे, हेकाँ प्रकाश मोहने, सतीष कोठावदे, पोकाँ सचिन माळी, राकेश सूर्यवंशी यांच्या पथकाने अफसर पठाण याला अटक केली आहे. तर महम्मद सरबर हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

LEAVE A REPLY

*