‘एसआयटी’ त आठ अधिकार्‍यांची नियुक्ती

0
धुळे । दि.8 । प्रतिनिधी-कुख्यात गुंड शेख रफियोद्दीन शेख शफियोद्दीन उर्फ गुड्ड्या याच्या हत्येचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी हर्ष पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समिती (एसआयटी) गठीत करण्यात आली आहे.
यासाठी आठ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांनी आज दिली आहे.

कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख याची दि. 18 जुलै रोजी शहरातील गोपाल टी हाऊससमोर निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुरनं 150/217 भादंवि 302, 120 (ब) 504, 506, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 व क्री.लॉ.अमेंडमेंट अ‍ॅक्ट 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात तपासाबाबत होत असलेल्या तक्रारींची दखल घेवून या गुन्ह्याचा सखोल तपास पारदर्शी व कुशलतेने होण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक आयपीएस अधिकारी हर्ष पोद्दार यांच्या नियंत्रणाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्यात आले आहे.

सदर विशेष तपास पथकात मालेगाव शहर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने, धुळे डीवायएसपी हिम्मतराव जाधव, धुळे पोलिस निरीक्षक अनंत रमेश निकम, मालेगाव आझादनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे, धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.जे.राठोड, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याच्या संदर्भात कोणाला काही माहिती द्यावयाची असल्यास त्यांनी विशेष तपास पथकाचे प्रमुख हर्ष पोद्दार (मो.7721056999), गजानन राजमाने (मो.9423252207), हिम्मत जाधव (मो.9423985098) यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन एम.रामकुमार यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*