तर आमदार कार्यालयाला कुलूप ठोकू !

0
धुळे । दि.7 । प्रतिनिधी-कर्जमाफीच्या योजनेतील दहा हजार रुपयांची कर्जरुपी उचल जिल्हा बँक देत नसेल तर खुशाल जिल्हा बँकेच्या शाखांना कुलूप लावा, परंतु कर्जमाफीचा फायदा शेतकर्‍यांना शासन देणारच नसेल तर मग आम्ही सुध्दा गढीवरील आमदार कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा शिंदखेडा तालुक्यातील धमाणे गावचे उपसरपंच भगवंत पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने कर्जमुक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दहा हजार रुपयांचे कर्जरुपी उचल देण्यासाठी जिल्हा बँकेला जबाबदार धरले आहे.

तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यातील धुळे जिल्हा बँकेमुळे दहा हजार रुपये उपलब्ध होणार नसतील तर भाजपातर्फे जिल्हा बँकेच्या शाखांना कुलूप ठोकणार आहेत, असा आरोप भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांनी केला आहे.

कामराज निकम यांचा आरोप बिनबुडाचा असून द्वेष भावनेने केलेला आहे. मुळातच राज्य सरकारने फक्त राज्य सहकारी बँकेला हमी दिलेली आहे.

त्या हमीवरुन राज्य सहकारी बँकेने जिल्ह्यासाठी 38 कोटी रुपये मंजूर केले असले तरी ते अजून प्राप्त झालेले नाहीत. राज्य सहकारी बँकेचे 38 कोटी रुपये 9.50 टक्के व्याजदराने जिल्हा बँकेला मिळणार आहेत.

जिल्हा बँक शेतकर्‍यांना चार टक्के व्याजदराने कर्जरुपाने शेतकर्‍यांना देणार असून जिल्हा बँक पाच टक्के तोटा सहन करणार आहे.

तरीही जिल्हा बँकेकडे जे जे शेतकरी शासनाच्या जाचक नियमानुसार प्रतिज्ञापत्र सादर करतील, त्यांना तोटा सहन करुन दहा हजार रुपयांची कर्जरुपी उचल देणार आहेत.

कर्जमाफीचा एवढा डंका पिटायचाच असेल तर दहा हजार रुपये बिनव्याजी द्या, अनुदानरुपी द्या. जिल्ह्यात किती थकबाकीदार शेतकरी आहेत, त्यापैकी किती शेतकर्‍यांनी प्रतिज्ञापत्र भरुन दिले, राष्ट्रीयकृत बँकही पिककर्ज देतात, त्यांच्याकडे किती शेतकर्‍यांनी दहा हजार रुपयांची प्रतिज्ञापत्र सादर केली तेही जाहीर करा, कर्जमाफी योजनेंतर्गत एकूण किती अर्ज ऑनलाईन केले याची आकडेवारी जाहीर करावी.

या आकडेवारीत भाजपा व राज्य सरकारचे सोंग व डोंग उघडे पडणार आहे. तेव्हा ढोंगी कोण त्याचे उत्तर भाजपाला आपोआपच मिळेल.

डॉ.हेमंत देशमुखांवर जुना आरोप करुन तुम्ही कर्जमाफी योजनेचे लक्ष विचलीत करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जिल्हा बँकेचे दहा वर्ष संचालक राहिलेल्या मंत्र्यांनी जिल्हा बँकेत काय केले हेपण जाहीर करावे.

कर्जमाफी योजनेत जिल्हा बँक दोषी असेल तर खुशाल शाखांना कुलूपे लावा. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी फक्त शासनाच्या जाचक अटींमुळेच मिळत नसल्यामुळे गढीवरील आमदार कार्यालयाचे आम्ही कुलूप ठोकणार आहोत, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*