वेगवेगळ्या अपघातात चार ठार; चालक, वाहकांसह चौघे जखमी

0
धुळे । दि.7 । प्रतिनिधी-वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले असून या बाबत शिरपूर शहर, मोहाडी आणि पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर दहिवद गावानजिक ट्रकने बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक व वाहकासह चार जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिरपूर-शहादा रोडने एमएच 18 ए 5991 क्रमांकाची ट्रक शिरपूरकडून शहादाकडे भरधाव वेगाने जात असताना अर्थे शिवारात आश्रमशाळेसमोर समोरुन येणार्‍या बोलेरो पिकअप (क्र.एमपी 12 जीए 0497) ला ट्रकने मागून जोरदार धडक दिली.

या अपघातात राजेश परशूराम चव्हाण (वय 30) आणि भरतकुमार वासुदेव गोसावी (वय 28), रा.खंडवा हे ठार झाले. तर दोन्ही गाडींचे नुकसान झाले असून ट्रकचालक अपघाताची माहिती न देता पळून गेला. याबाबत शिरपूर शहर पोलिस ठाण्यात धर्मेंद्र लिलाराम मोटवानी यांनी फिर्याद दिली.

भादंवि 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 प्रमाणे ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ ठाकरे हे करीत आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गाने अज्ञात वाहन मुंबईकडून इंदूरकडे भरधाव वेगाने नेत असताना मोहाडी गावाच्या शिवारात उड्डाण पुलाजवळ पुढे धावणार्‍या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रमोद उर्फ भुरा विजय शिंदे (वय 31, रा.मोहाडी) हा ठार झाला.

हा अपघात दि.6 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता झाला. याबाबत विनोद विजय शिंदे यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 304 (अ), 279, मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 प्रमाणे अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ वाय.आर.पाटील हे करीत आहेत.

जीजे 19 टी 5002 क्रमांकाची ट्रक चरणमाळ-पिंपळनेर रस्त्याने चालक दि.6 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजता भरधाव वेगाने नेत असताना बसरावळ शिवारात समोरुन येणार्‍या जीजे 5 बीए 3721 क्रमांकाच्या मोटारसायकलला धडक दिली.

या अपघातात प्रविण दावजी राऊत (वय 25, रा.बसरावळ) हा ठार झाला. तर ट्रकचालक अपघाताची माहिती न देता पळून गेला. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात सुनील दावजी राऊत यांनी फिर्याद दिली. भादंवि 304 (अ), 279, 427, 184, 134/177 प्रमाणे ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई-आग्रा महामार्गाने एचआर 74 ए 7490 क्रमांकाची ट्रक भरधाव वेगाने नेत असताना यु टर्न घेणार्‍या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक व बसचे नुकसान झाले. तसेच अपघाताची माहिती न देता ट्रकचालक पळून गेला.

या अपघातात ट्रकचालक जगदीश भिमराव पाटील, वाहक भावना पाटील, छोटू शिवराम पारधी, इमलूबाई वेचान पावरा हे जखमी झाले.

याबाबत एस.टी.चालक जगदीश भिमराव पाटील यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 279, 337, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 138/177 प्रमाणे ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

घरावर दगडफेक – शहरातील जमनागिरी रोडवरील अशोक नगरात राहणारा दर्शन राजेंद्र लोढा याच्या घरावर दि.5 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता विकास व मुकेश हे दगडफेक करीत असताना याबाबत त्यांना विचारल्याचा राग येवून विकास उर्फ विक्की प्रताप सपकाळ याने स्टील फाईटने दर्शनच्या डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच दर्शनच्या बहिणीस मुकेश सुरेश ठाकरे याने शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच घराच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात दर्शन लोढा यांनी फिर्याद दिली. भादंवि 326, 336, 427, 504, 506, 34 प्रमाणे विकास उर्फ विक्की प्रताप सपकाळ मुकेश सुरेश ठाकरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्पदंशाने मृत्यू – नगाव येथे राहणारा राजेश रमेश सोनवणे (वय 26) याला दि.5 ऑगस्ट रोजी रात्री 7.30 वाजता सर्पाने चावा घेतला. त्यात तो जखमी झाला. राजेशला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार घेत असताना डॉ.शहा यांनी राजेशला मृत घोषित केले. याबाबत पोहेकाँ जे.एस.ईशी यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेततळ्यात पडल्याने मृत्यू – दाबली, ता.शिंदखेडा शिवारात मधुकर वामन पाटील यांच्या शेततळ्यात गोपाल भरत पाटील (वय 18, रा.दाबली) हा पाणी पिण्यासाठी गेला. त्यावेळी त्याचा पाय शेततळ्यात घसरल्याने पाण्यात बुडून गोपालचा मृत्यू झाला. याबाबत मधुकर दौलत पाटील यांनी नरडाणा पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोना एस.बी.पवार हे करीत आहेत. गोपाल पाटील हा शेतात शेळ्या चारण्यासाठी गेला होता.

माय-लेक बेपत्ता
धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या भाई मदाने नगरात राहणारी पूजा संजय बैसाणे (वय 21) ही दि.3 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता राहत्या घरातून तिची मुलगी परी (वय 5) हिला शाळेत सोडण्यास गेली, परंतु दोघे जण घरी परत आले नाहीत. दोघांचा नातेवाईकांकडे शोध घेतला. याबाबत भटाबाई संजय बैसाणे यांनी देवपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन मिसिंग दाखल करण्यात आली. तर साक्री रोडवरील भिम नगरातील गुरुकूल शाळेजवळ राहणारी कामिनी अमोल अहिरे (वय 35) ही दि.5 ऑगस्ट रोजी तिचा मुलगा योनित (वय 7) याला घेण्यास शाळेत गेली, परंतु दोघे जण घरी परत आले नाही. याबाबत शशिकला बापू अहिरे यांनी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

गायींची चोरी; चार जणांविरुध्द गुन्हा
धुळे शहरातील वडजाई रोडवरील हाजी नगरात राहणारा शेख मुश्ताक शेख हाफीजसह चार जणांनी दोन गायी चोरुन स्वत:च्या फायद्यासाठी एमएच 18 एन 812 क्रमांकाच्या स्कार्पिओ गाडीतून गायींचे तोंड व पाय बांधून आणले. सदर गाडी अंबिका नगरात आली असता गाडीतील दोन जण पळून गेले. या ठिकाणाहून एक लाख 50 हजाराची स्कार्पिओ, दहा हजाराच्या गायी असा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोकाँ प्रेमराज विक्रम पाटील यांनी चाळीसगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 व प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणे अधिनियम 1960 चे कलम 11 (डी) (1) प्रमाणे शेख मुश्ताक शेख हाफीज, शकीर शाह इम्रान शाह आणि अज्ञात दोन व्यक्ती यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन गटात मारहाण; सात जण जखमी
धुळे शहरातील कदमबांडे नगरात मारहाण केल्याच्या संशयावरुन रमेश उत्तम गोपाळ (वय 32, रा.नगावबारी, कदमबांडे नगर) यांच्याशी नरेश गवळीसह दहा जणांनी वाद घातला. या वादातून धारदार शस्त्र, लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने रमेश गोपाळ याला मारहाण केली. तसेच त्याला ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत रमेश गोपाळ, रोहिदास दगडू गोपाळ, प्रकाश बाबुराव गोपाळ, दीपक निंबा गोपाळ, शिवदास दगडू गोपाळ, संतोष राजाराम गोपाळ हे जखमी झाले. याबाबत रमेश उत्तम गोपाळ यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 प्रमाणे नरेश गवळी, सागर प्रकाश पाटीलसह आठ ते दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई एस.के.पाटील हे करीत आहेत. दरम्यान, याच वादातून दूध विक्रेता नरेश कांतिलाल गवळी याला मगन गोपाळसह चार जणांनी लोखंडी पाईप, दांडक्याने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात नरेश कांतिलाल गवळी यांनी फिर्याद दिली. भादंवि 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 प्रमाणे मगन गोपाळ, संतोष गोपाळ, पिंटू गोपाळ, शिवदास गोपाळ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक के.एस.सोनवणे हे करीत आहेत.

पाच जणांना विषबाधा तिघांविरुध्द गुन्हा
अवधान शिवारातील बालाजी ट्रान्सपोर्टच्या पडीत जागेत दि.5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मजूर 20 डांबरने भरलेले पत्र्याचे ड्रम हातोड्याने फोडून ड्रमचा पत्रा वेगळा करीत असताना विषारी पदार्थामुळे मजुरांना चक्कर येवून त्रास झाला. विषारी पदार्थ जीवास धोका होईल, असे माहिती असताना देखील ड्रम फोडायला लावले, अशी फिर्याद मोहाडी पोलिस ठाण्यात मुजादीद खान पठाण यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 284, 337, 34 प्रमाणे इरफान खान सिकंदर खानसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*