सातबारा ऑनलाईन झाल्याने नागरिकांचे प्रश्न सुटणार : जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे

0
धुळे |  प्रतिनिधी :  नागरिक व सरकार यांचा अपवाद वगळता कमीत कमी संबंध यावा, नागरिकांचे प्रश्न तत्काळ निकाली निघावेत, अशी अपेक्षा आहे. सातबारा ऑनलाइन होणे ही त्याची सुरवात आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयातील वर्दळ कमी होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.

महसूल दिनानिमित्त अपर तहसील कार्यालयाच्या आवारात आज सकाळी महसूल फलक अनावरण, घडी पत्रिकेचे प्रकाशन व ऑनलाइन सातबारा सॉफ्ट कॉपी लॉन्च करण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, ङ एस. आर. पाटील, महानगरपालिका स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, शहर अभियंता कैलास शिंदे, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक भै. गो. येरमे, सहाय्यक नगररचनाकार श्री. देवरे, प्रकाश चव्हाण, नगर भूमापन अधिकारी श्री. फुलपगारे, सहाय्यक दुय्यम निबंधक सुनीता सुपारे, प्रमोद पाटील, मनोज मोरे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते विजय बाजीराव पाटील, तलाठी अनिता भामरे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, सातबारा तुमचाच असल्याने तो कधीही पाहता आला पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे.

जमिनीचे मोल दिवसेंदिवस वाढत आहे. संगणक युगामुळे सातबारा ऑनलाइन झाला आहे. दोन मिनिटांत तो मोबाईलवर पाहता येतो. ऑनलाइन सातबाराची नियमितपणे पडताळणी करुन तरी नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

उपविभागीय अधिकारी श्री. मिसाळ म्हणाले, सातबारा ऑनलाइन केल्यानंतर आता एटीएम मशीनप्रमाणे सातबारा वेंडिंग मशीन बसविण्याचे नियोजन आहे. नागरिकांनी आपल्या हक्कांप्रती जागरुक राहत ऑनलाइन सातबारा उताराची नियमितपणे पडताळणी करावी.

आयुक्त श्री. देशमुख म्हणाले, महसूल विभागाचा उपक्रम अनुकरणीय आहे. या सुधारणांमुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. डॉ. पाटील म्हणाले, ऑनलाइन सातबारा शेतकर्‍यांसाठी दिलासादायक बाब आहे. अपर तहसीलदार श्रीमती देवरे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, सातबारा ऑनलाइन करणे हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे.

गेले वर्षभर तो सुरू होता. सातबारा उतारा महा- इ- सेवा केंद्रांवरुनही काढता येईल. संजय सामुद्रे, अपर तहसीलदार श्रीमती देवरे यांनी सूत्रसंचालन केले. अपर तहसीदार श्रीमती देवरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*