धुळे हगणदारीमुक्त शहर म्हणून घोषित : शासनाचा अहवाल प्राप्त

0
धुळे । दि.25 । प्रतिनिधी-स्वच्छ भारत योजनेंतर्गत झालेल्या केंद्र शासनाच्या त्रयस्त समितीच्या तपासणीअंती शहराला हगणदारीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
त्याबाबत शासनाचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. दरम्यान, शहर हगणदारीमुक्त झाल्याबद्दल महापौर सौ.कल्पना महाले यांचा सत्कार आज आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.

स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत यापूर्वी राज्य शासनातर्फे धुळे शहराची पाहणी करण्यात आलेली होती. राज्य शासनामार्फतही यापूर्वी शहराला हगणदारीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले होते व केंद्राच्या स्वच्छ सर्व्हेक्षणानंतर शहराचा 124 वा क्रमांक निश्चित झालेला होता.

नुकतीच केंद्र शासनाच्या वतीने त्रयस्त समितीच्या माध्यमातून केंद्राच्या नियुक्त तज्ज्ञ मार्गदर्शकांनी धुळे शहर महापालिकेच्या कामांची पाहणी व तपासणी केली होती.

यात गलिच्छ वस्ती, व्यापारी क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र तसेच रहिवास विभाग, वैयक्तिक शौचालय, शहराची महत्त्वाची ठिकाणे या विविध पातळींवर पाहणी व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती.

तसेच आजतागायत महापालिकेने अवलंबिलेल्या व केलेल्या कामांचा व कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला होता. या तपासणीअंती केंद्र शासनामार्फत धुळे शहर व महापालिका क्षेत्र हगणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले असून त्याबाबत तपासणी अहवाल महापालिकेला प्राप्त झालेला आहे.

आतापर्यंत केंद्र शासनामार्फत झालेल्या तपासणीअंती राज्यातील फक्त चार महापालिका हगणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यात धुळे शहराचा समावेश आहे.

ही बाब शहरवासियांसाठी अभिमानाची आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या शिफारशीमुळे महापालिकेला अमृत अभियानातील विविध योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असून स्मार्ट सिटीकडे वाटचाल आता सुरु झाली आहे, अशी माहिती महापौर सौ.कल्पना महाले यांनी दिली आहे.

शहर हगणदारीमुक्त झाल्याबद्दल महापौर महाले यांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपायुक्त रवींद्र जाधव, एच.पी.कवठळकर, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, कैलास शिंदे, आरोग्य अधिकारी महेश मोरे, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*