धुळे जिल्ह्यात 11 ठार

0

धुळे / जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

यामध्ये साक्री तालुक्यात झालेल्या तिहेरी अपघातात चार जण ठार तर सात जखमी झाले.

नरडाणाजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू होवून दोन जण जखमी झाले.

तर धुळ्याजवळ लग्न वर्‍हाडाला झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सहा जण जखमी झाले.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरुच आहे. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून अपघाताची ही मालिका थांबावी, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.
साक्री/पिंपळनेर –तालुक्यातील साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाटयाजवळ महिंन्द्रा पिकअप मालवाहू गाडी, मोटारसायकल आणि खाजगी प्रवासी वाहतूक करणारी अ‍ॅपेरिक्षा यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात चार जण ठार झाले असून सातजण जखमी झाले आहेत.

आज (दि.9) दुपारी साक्री-पिंपळनेर रस्तयावरील धाडणे गावाच्या फाटयावर हा अपघात घडला.

यावेळी मोटासायकलने पेट घेतल्याने आग पसरून त्यात पिकअप गाडीनेही पेट घेतला.

यात पिकअप गाडीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, जखमींना उपचारासाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुगणालयात दाखल करण्यात आले आहे.

साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाटयावर महिंन्द्रा पिकअप मालवाहू गाडी (क्रमांक एमएच 18 एए 7521) पिंपळनेरहून साक्रीकडे जात असतांना रस्त्यावरील खड्डे चुकवितांना समोरून येणार्‍या अ‍ॅपेरिक्षा क्रमांक क्रमांक एमएच 18 -1936 वर जाऊन आदळली. यामुळे पिकअपच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणारी विना क्रमांकाची मोटारसायकल पिकअप गाडीवर आदळली.

यावेळी मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीतून पेट्रोल बाहेर आल्याने पेट्रोलने पेट घेतला. काही क्षणातच आग पसरून पिकअप गाडीनेही पेट घेतला. यात मोटारसायकल व पिकअप गाडी पुर्णपणे जळाली.

मात्र काही वेळाने साक्री नगरपालिकेचा अग्नीशमन बंब दाखल होवून आग विझविण्यात आली.

या अपघातात अ‍ॅपेरिक्षामधील चार जणांचा जागीच मृत्यु झाला.

या घटनेत मोटारसायकलवरील संतोष प्रकाश डांबरे (वय 25), एकनाथ आप्पा माळीच (वय 35) दोन्ही रा.चिकसे ता.साक्री आणि अ‍ॅपेरिक्षामधील प्रवाशी संतोष नाना मोरे (वय 65), वसंत राघो अहिराव (वय 68) दोन्ही रा.धाडणे, ता.साक्री यांचा मृत्यू झाला आहे. तर सातही जखमींमध्ये अ‍ॅपे रिक्षातील वंदना उत्तम बोरसे (वय 35), मंगलाबाई वसंत गायकवाड (वय 40), सयाजी कैलास पवार (वय12), उत्तम मन्साराम बोरसे (वय45), जिभाऊ मालजी पवार (वय 40), जंगलू रामजी माळचे (वय 40), सर्व रा. धाडणे ता.साक्री आणि अविनाश भटू भदाणे (वय32) रा. धाडणे यांच्या हाता-पायाला व डोक्याला गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
धुळे –रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरवर टाटा सुमो आदळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. धुळे-नाशिक महामार्गावर शहरातील गुरुद्वाराजवळ सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

या घटनेतील सर्व मृत धुळे येथील रहिवासी आहेत. तर सहा जण जखमी झाले असून या जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, एमएच 19 क्यू 9689 या क्रमांकाची टाटासुमो धुळ्याकडे येत होती. यावेळी एमएच 14 एएस 8265 या क्रमांकाचा वाळूचा रिकामा डंपर रस्त्यावर उभा होता.

टाटासुमो या डंपरवर आदळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

मयतांमध्ये साजीदा बानो मुमताज अली (वय17), रा.अजमेरा नगर, नॅशनल उर्दू हायस्कूल, धुळे, जमिलाबानो रज्जकअली (वय 35), रा.हटकर नगर, मशिदजवळ, वडजाई रोड, धुळे, रोजिनाबानो युसूफ अन्सारी (वय 12), रा.फिरोजअली नगर, तिरंगा चौक, धुळे, अमीन अहमद रज्जबअली, रा.फिरोजा नगर, वडजाई रोड, धुळे अदनान फकीर अन्सारी (वय 8), रा.अजमेरा नगर, धुळे यांचा समावेश आहे. मयतांमध्ये अमीन अन्सारी व अंदान अन्सारी या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

अपघातानंतर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने डीवायएसपी हिंमत जाधव यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. टाटासुमोतील जखमींना बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनगीर-ट्रकचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाला असून अन्य दोन जखमी झाले आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावरील कलमाडी फाट्यावर आज (दि. 9) सकाळी हा अपघात घडला.

अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे 4 च्या सुमारास एमपी09-आयजी 5999 या क्रमांकाचा ट्रक पपई घेवून सेंधव्याकडून धुळ्याकडे येत होता.

कलमाडी फाट्यावर या ट्रकचे टायर फुटल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्याचवेळी द्राक्ष घेवून येणारा युपी 14-एटी 5050 या क्रमांकाचा ट्रक त्यावर आदळला.

या अपघातात मोहम्मद अक्रम (वय 44), रा.काजियाबाद आणि नंदू छगनलाल चव्हाण (वय 43), रा.इंदूर याचा जागीच मृत्यू झाला तर मो. इब्राहिम मो. इसा याच्यासह अन्य दोघे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले. त्यांनी पोलिसांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावली. तात्काळ रुग्णवाहिका दाखल झाली व जखमींना उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले.

LEAVE A REPLY

*