‘सामाजिक गुन्हेगारी’ मोडीत काढण्यासाठी कटिबध्द !

0

विलास पवार,धुळे / कोणत्याही शहराची शांतता अबाधित ठेवायची असेल तर सामाजिक गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे आवश्यक असते.

मी धुळ्यात नवीन असलो तरी शेजारील नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात काम केले आहे.

त्यामुळे धुळ्याची पार्श्वभूमीवर आणि इथले प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सामाजिक गुन्हेगारीवर विशेष लक्ष केंद्रीत करणार असून अशा पध्दतीची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कटिबध्द राहील, अशी ग्वाही जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिली.

पोलिस दलातील शिस्तप्रिय अधिकारी म्हणून नावारुपाला आलेले एम.रामकुमार यांनी पोलिस अधीक्षक म्हणून नुकताच जिल्ह्याचा पद्भार हाती घेतला आहे.

जिल्ह्यात काम करीत असतांना गुन्हेगारी नियंत्रणावर आपला भर असेल, पोलिस आणि जनता यांच्यातील सुसंवाद वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगून एम.रामकुमार म्हणाले की, अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच धडा शिकविण्याचा माझ्या विभागाचा प्रयत्न राहील. कायदा प्रत्येकासाठी समान आहे. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी माफी नाही.

माझ्यासोबतचे अधिकारी, कर्मचारी यांच्यातदेखील शिस्तीचा कारभार आपल्याला पहायला मिळेल. लोकांशी संवाद आणि संपर्क साधून जनसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असे सांगून रामकुमार म्हणाले, तपास कार्यात स्थानिक पोलिसांना काय-काय अडचणी येतात याबाबत परिस्थिती समजून घेईन.

संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत का? हे जाणून घेईन. कामकाजाची पध्दत बदलण्याची गरज असेल तर तशा सूचना दिल्या जातील.

बैठका आणि संवादातून स्थानिक समस्या कशा सोडविता येतील, यासाठीचे प्रयत्न केले जातील. गुन्हेगारांवर वचक ठेवणे आणि जनसामान्यांना सुरक्षितता वाटेल यासाठी काम करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पोलिसांच्या समस्या जाणून घेणे देखील आवश्यक आहे.

पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न सोडविण्यावर भर असेल. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातील.

कोणीही चुकीचे काम केले तर ‘पनिशमेंट’ आणि उत्कृष्ट कामगिरी केली तर ‘रिवॉर्ड’ देण्याची माझी कामाची पध्दत आहे. कुठलाच जिल्हा कधी शांत नसतो.

गुन्हेगारी सगळीकडे आहे. मात्र असे असले तरी गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करणे आणि जनतेला सुरक्षितपणे जीवन जगता यावे, असे वातावरण तयार करणे हे पोलिस विभागाचे कर्तव्य असते.

जनतेच्या त्या अपेक्षा असतात. मोहल्ला कमिटी, पोलिसमित्र यासारखे अनेक उपक्रम राज्यात राबविण्यात आले आहेत. त्या धर्तीवर धुळ्यात नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न राहील. जिल्ह्याचे प्रश्न समजून घेण्यासाठी लोकांमध्ये वावरणे आणि लोकांशी संपर्कात राहणे आवश्यक असते.

कोणत्याही सामान्य माणसावरचा अन्याय आपल्यापर्यंत पोहचला पाहिजे, यासाठी मी सदैव जनतेसाठी उपलब्ध राहील. म्हणूनच माझ्या दालनाबाहेर मोबाईल क्रमांक स्पष्टपणे लिहिला आहे.

सामान्य माणसाशी नाते तयार करतांना गुन्हेगारांना वठणीवर आणण्याची जबाबदारी माझा विभाग करेल, असेही रामकुमार म्हणाले.

LEAVE A REPLY

*