खातेनिहाय चौकशी करा ! निलंबनाआधी माळींचे आदेश

0
कापडणे । दि.17 । प्रतिनिधी-पीआरसी सदस्य आ. हेमंत पाटील यांच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतीबंधक विभागातर्फे कापडणे ग्रामपंचायतीत चौकशी सुरु आहे.
एसीबीतर्फे चौकशी सुरू असतांनाच लाचप्रकरणात ज्यांच्यावर कारवाही झाली, ते तत्कालीन डेप्युटी सीईओ तुषार माळी यांनीच आता चौकशीचे आदेश दिल्याने आता या प्रकरणाने कलाटणी घेतली आहे.

श्री.माळी यांच्या पत्रानुसार आता खातेनिहाय चौकशी सुरु झाली असून पीआरसी दौर्‍यादरम्यान ग्रा.पं.दप्तरातील ज्या खाडाखोडबाबत तक्रार झाली त्या दप्तराची आज (दि.17) सखोल चौकशी करण्यात आली.

येथील ग्रामपंचायत कार्यालयात विस्तार अधिकारी कपिल वाघ यांनी ही तपासणी केली. विशेष म्हणजे ज्या कालावधीतील दप्तराबाबत खाडाखोडची तक्रार आहे व चौकशी सुरु आहे त्या काळातील लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे.

रिव्हर्स ट्रॅप प्रकरणात डेप्यूटी सीईओ तुषार माळी यांना दि.12 रोजी जामिन मंजुर झाला. यानंतर दि.13 रोजी जिल्हा परिषदेत हजर झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले.

मात्र तत्पुर्वीच तुषार माळी यांनी खातेनिहाय चौकशी करुन माहिती पाठविण्याचे सबंधीत कार्यालयांना कळविल्याचे समजते.

यात कापडणे जि.प.शाळा पोषण आहार, पाणीयोजना संदर्भातील तक्रारी तसेच ग्रा.पं.दप्तरातील खाडाखोड व अनियमितता याबाबत श्री.माळी यांनी अनुक्रमे जि.प.चे शिक्षणाधिकारी(प्राथ.), पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व गटविकास अधिकारी यांच्याकडे खातेनिहाय चौकशी करुन माहिती देण्याचे कळविले आहे.

दि.6 रोजी पीआरसीने कापडणे येथे भेट दिली.यानंतर झालेल्या लाचप्रकरणाच्या तक्रारीत पंचायत राज समितीचे सदस्य आ.हेमंत पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न, कापडणे पाणी योजनेतील तक्रारी, जि.प. शाळेच्या पोषण आहारात घोळ तसेच ग्रा.पं.च्या दप्तरात खाडाखोड व अनियमितता आढळल्याने झाल्याचे म्हटले.

या तक्रारी ‘मॅनेज’ करण्याच्या उद्देशानेच तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी हा दिड लाख लाच देण्याचा प्रकार केल्याच्या आ.हेमंत पाटील यांच्या तक्रारीवरुन डेप्युटी सीईओ तुषार माळी यांच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने येथील जि.प.शाळा, ग्रा.पं. व पाणीयोजनेची चौकशीही केली. तक्रारदार आ.हेमंत पाटलांच्या तक्रारीवरुन एसीबी चौकशी करत असतांना आता खुद्द तुषार माळींनीच चौकशीची मागणी केल्याने या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतल्याचे बोलले जात आहे.

आता खातेनिहाय चौकशीत नेमके काय बाहेर येते याबाबत जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे.दरम्यान आज (दि.17) येथील ग्रामपंचायत कार्यालयात विस्तार अधिकारी कपिल वाघ यांनी 2015-16 या वर्षातल्या दप्तरातील खाडाखोड व अनियमितता याबाबत तपासणी केली.

यावेळी ग्रामविकास अधिकारी आर.एन.कुंवर उपस्थित होते.या लाचप्रकरणातील संशयीत श्री.माळी यांच्या मागणीनुसार होणार्‍या या चौकशीतुन काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

LEAVE A REPLY

*