चोरीच्या मोबाईलमुळे अडकले दरोडेखोर !

0
धुळे । दि.17 । प्रतिनिधी-फागणे, ता.धुळे येथील कोयल पेट्रोलपंप दरोडा प्रकरण केवळ बारा तासात तालुका पोलिसांनी उघडकीस आणले.
तीन दिवसापूर्वी चाळीसगाव येथे पडलेल्या दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन या गुन्ह्याचा उलगडा झाला. दरोडेखोरांनी चोरलेल्या मोबाईल लोकेशनवरुन त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, दोन दरोडेखोरांना 21 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
जळगाव-सुरत महामार्गावरील फागणे, ता.धुळे येथील कोयल पेट्रोल पंपावर चड्डी-बनियनमध्ये असलेल्या दरोडेखोरांनी दरोडा टाकला.
यावेळी दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर झोपलेला पोकलँडचा मालक ईस्माईल उर्फ बापू बाबुलाल सैय्यद (वय 74, रा.निफाड, नाशिक) याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याची हत्या केली.

त्यावेळी पेट्रोल पंपावरील दीपक सुकदेव पाटील (वय 32, रा.देवभाने), प्रकाश बुधा पाटील (वय 35) आणि जगदीश सतीष पाटील (वय 30, रा.फागणे) यांनी दरोडेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवून लाकडी कपाटातील तिजोरीमधून दहा हजार रुपये रोख, एक हजार रुपये किंमतीचे प्रकाश पाटील यांच्या उजव्या हातातील चांदीचे ब्रासलेट 50 ग्रॅम वजनाचे आणि तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 14 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

दरोडेखोरांनी प्रकाश पाटील, दीपक पाटील आणि जगदीश पाटील यांनाही मारहाण केली. यात तिघे जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात पेट्रोल पंपाचे मॅनेजर प्रकाश बुधा पाटील यांनी फिर्याद दिली. भादंवि 302, 394, 397, 34 प्रमाणे तीन अज्ञात दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासासाठी सहा पथके तयार करण्यात आली. श्वानाच्या मदतीने दरोडेखोरांचा माग काढण्यात आला. ते जळगाव जिल्ह्याच्या दिशेने पळाल्याचे प्रथमदर्शी पुढे आले.

मात्र, चोरीच्या मोबाईल फोनने दरोडेखारांचा घात केला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन मुक्ताईनगर गाठले. तेथून फिरोज कावजी पवार आणि महेंद्र कावजी पवार या दरोडेखारांना अटक करण्यात आली.एका दरोडेखोराचा शोध घेतला जात आहे.

तीन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा दरोडा चाळीसगाव तालुक्यातील पेट्रोल पंपावर दरोडेखारांनी टाकला होता. तेथील सीसीटीव्ही फुटेज तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली.

ते सीसीटीव्ही फुटेज कोयल पेट्रोल पंपावरील कामगार जगदीश व प्रकाश या दोघांना दाखविण्यात आल्या. त्यात दरोडेखोर एकच असल्याचे समोर आले.

त्यानंतर दरोडेखारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. हे आव्हान धुळे पोलिसांनी स्वीकारले. खबर्‍यांचे नेटवर्क आणि मोबाईल लोकेशनवरुन दरोडेखारांपर्यंत पोहचण्यास मदत झाली.

पोलिस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, डीवायएसपी हिंमत जाधव, उपविभागीय अधिकारी नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय रमेशसिंह परदेशी, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी केवळ 12 तासात दरोडेखारांना जेरबंद केले.

दरम्यान, दरोडेखोर फिरोज पवार आणि महेंद्र पवार यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना दि.21 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर एक दरोडेखोर बेपत्ता आहे. त्याचा शोध तालुका पोलिस घेत आहेत.

 

LEAVE A REPLY

*