शिंदखेडा पोलीस स्टेशनचा ढिसाळ कारभार !

0
शिंदखेडा । दि.17 ।-शिंदखेडा शहर पोलीस स्टेशनचा कारभार अतिशय ढिसाळ झाला असून शिंदखेड्यात पोलिस स्टेशन अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आहे.
पोलीस स्टेशनला कर्मचार्‍यांची संख्या अल्प आहे. त्यात वाढ व्हावी म्हणून सातत्याने मागणी करण्यात आली. वरिष्ठांचे वारंवार लक्ष वेधण्यात आले.
त्यात निश्चित भर पडली आहे. मात्र असे असले तरी पोलीस स्टेशनची कामगिरी मर्यादीतच असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते.

सध्या देवीदास भोज हे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोतदार यांच्यासह जाधव कार्यरत आहेत.

नुकतेच स्वप्नील राजपूत हे मोहाडी शहर पोलिस स्टेशनला बदलून गेले आहेत. राजपूत असताना बर्‍यापैकी पोलिस स्टेशनच्या कामगिरीचे अस्तित्व जाणवत होते, हे नाकारून चालणार नाही.

प्रदीप दीक्षित

पत्ते खेळणार्‍यांचा बंदोबस्त व्हावा
शिंदखेडा पोलीस स्टेशनला केवळ दोन महिन्यांसाठी मंगलसिंग सूर्यवंशी हे पोलिस निरीक्षक म्हणून लाभले होते. त्या काळात संपूर्ण तालुक्याला शिस्त लागली होती. शहरात सारेच शिस्तीत होते. आज मात्र काय परिस्थिती आहे? आज मात्र सर्वत्र गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पत्ते खेळणार्‍यांचे अड्डे ठिकठिकाणी खुलेआम सुरू आहेत. चांगल्या वसाहतीतदेखील खुलेआम टाइमपासच्या नावाखाली पत्ते खेळणारे टोळके दिसतात. ही परिस्थिती अशीच राहिली तर येणार्‍या गणेशोत्सवात त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात.

विनानंबर प्लेटची वाहने
विनानंबर प्लेटच्या मोटारसायकलीच काय मुदत संपलेल्या रिक्षादेखील रस्त्यांवर धावतांना दिसतात.तिन सिट बसून मोटारसायकल प्रवास करणार्‍यांना जणू परवानगीच मिळाली आहे. बर्‍याचदा पोलीस कर्मचारी समोर असले तरी तिन सिट बसून प्रवास करणार्‍यांना काहीच फरक पडत नाही. एकंदरीत देवीदास भोज यांचे नियोजन ढिसाळ असून नागरिक कोणतीच अपेक्षा पोलिसांकडून ठेवत नाही. अल्पवयीन मुलं-मुली मोटारसायकली नियमांचे उल्लंघन करून चालवतात. यामुळे अपघाताच्या प्रमाणातही सातत्याने वाढ होत आहे. यामुळे कधी सुधारणार शिंदखेडा पोलीस स्टेशनचा कारभार? रात्रीची गस्त तर सध्या दुरापास्तच झाली आहे.

चोर्‍यांचे प्रमाण वाढले
शहरात चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शहरातील गजबजलेल्या स्टेशन रोड भागात दुकाने फुटतात, शिंदखेडा एजुकेशन ट्रस्ट संचलित मीराबाई शाह कन्या विद्यालयातील संगणक गायब होतात. चोरांनी या शाळेतील एकूण 10 ते 13 संगणक आणि किमती वस्तू चोरून नेल्या.याबाबतची तक्रारदेखील शिंदखेडा पोलिस स्टेशनला दाखल आहे. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी चोरट्यांचा कोणताच तपास पोलिसांना लावता आलेला नाही.

कर्मचार्‍यांमध्ये हाणामारी
शिंदखेडा पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले दोन पोलीस कर्मचार्‍यांमध्ये कार्यालयातच हाणामारी होऊन शेख नामक पोलिसाने आबा भील नावाच्या पोलीस कर्मचार्‍याला पोटावर गंभीर जखम केल्याने त्यास उपचारार्थ धुळे येथे दाखल करावे लागल्याची घटना पीआय भोज यांच्या समोर घडली होती, हे सत्य नाकारून चालणार नाही.संबधितावर कायदेशीर कार्यवाही होणे आवश्यक असताना कार्यवाही झाली नाही. अखेर आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यानी दीपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.

गुटखा, दारूविक्री सुरूच
सध्या रोडलगत दारू दुकाने निश्चित बंद आहेत. मात्र तरीही विक्री वेगवेगळ्या मार्गाने, छुप्या पध्दतीने कही भागात सुरूच आहे. त्यामागे पोलिसांचे आशीर्वाद आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. अगदी सोडा वाटरच्या लॉरीवरही दारूचे पाऊच विकले जातात. गुटका विक्री बंद असताना ठिकठिकाणी गुटक्याच्या पुड्यांची विक्री खुलेआम होत आहे. अगदी काही पोलीस कर्मचारीदेखील गुटखा खाताना दिसतात, हे कशाचे प्रतीक म्हटले पाहिजे? पोलिसांना कार्यवाहीचा सर्व अधिकार असताना कार्यवाही का केली जात नाही? तरुण पिढी आधीच व्यसनाधीन आहे त्यात भरच पडताना दिसते. पोलिस निरीक्षक भोज यांनी मनावर घेतले तर शहराला व तालुक्याला शिस्त लागणे कठीण नाही.

 

LEAVE A REPLY

*