फागणे येथे पेट्रोल पंपावर दरोडेखोरांचा हैदोस : एक ठार

0

धुळे |  प्रतिनिधी :  जळगाव-सुरत महामार्गा वरील फागणे, ता.धुळे येथील कोयल पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी पंपावर झोपलेल्या पोकलँड चालकाची निर्घृण हत्या केली. दरोडेखोरांना अडविणार्‍या कर्मचार्‍यांनाही दरोडेखोरांनी मारहाण केली. यात तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री उशिरा तालुका पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. ही घटना घडली त्यावेळी पंपावरील सीसीटिव्ही यंत्रणा बंद होती.

याबाबत माहिती अशी की, चड्डी, बनियन घातलेले ३० ते ३५ वयोगटातील तीन दरोडेखोर जळगाव-सुरत महामार्गावरुन पायी चालत आले. त्यानंतर त्यांनी महामार्गावरील फागणे गावातील कोयल पेट्रोल पंपासमोरील ध्वज फाडून तोंडाला बांधला आणि पेट्रोल पंपाच्या कॅबीनमध्ये शिरकाव केला.

यावेळी दरोडेखोरांनी हिंदी भाषेत माल निकालो, पैसे निकालो नही तो मार डालुंगा, असे सांगितले. त्यांनी धमकावत पेट्रोल पंपाच्या आवारात झोपलेला पोकलँडचा मालक ईस्माईल उर्फ बापू बाबुलाल सैय्यद (वय ७४, रा.निफाड, नाशिक) याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याची हत्या केली.

त्यावेळी पेट्रोल पंपावरील दीपक सुकदेव पाटील (वय ३२, रा.देवभाने), प्रकाश बुधा पाटील (वय ३५) आणि जगदीश सतीष पाटील (वय ३०, रा.फागणे) यांनी दरोडेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर लाकडी कपाटातील तिजोरीमधून दहा हजार रुपये रोख त्यात दोन हजारच्या तीन, पाचशेच्या चार आणि दहाच्या २०० नोटांचा समावेश आहे.

एक हजार रुपये किंमतीचे प्रकाश पाटील यांच्या उजव्या हातातील चांदीचे ब्रासलेट ५० ग्रॅम वजनाचे आणि तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. दरोडेखोरांनी प्रकाश पाटील, दीपक पाटील आणि जगदीश पाटील यांनाही मारहाण केली. यात तिघे जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरोडेखोर ३० ते ३५ वयोगटातील असून ते रंगाने काळेसावळे आहेत. त्यांची उंची पाच ते ५.५ फूट दरम्यान आहे. त्यांनी सॅण्डो बनियन आणि पँट परिधान केलेली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरोडेखोरांनी सुमारे अर्धातास पेट्रोल पंपात धुमाकूळ घातला.

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात पेट्रोल पंपाचे मॅनेजर प्रकाश बुधा पाटील यांनी फिर्याद दिली. भादंवि ३०२, ३९४, ३९७, ३४ प्रमाणे तीन अज्ञात दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तालूका पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. श्‍वान पथकाला घटनास्थळी बोलविण्यात आले. श्‍वानने शेतापर्यंतच माग काढला.

नियतीचा घाला

पोकलँडचा चालक ईस्माईल उर्फ बापू बाबुलाल सैय्यद हा पेट्रोलपंप परिसरात शेतीत काम करीत होता. रात्र जास्त झाल्यामुळे शेतात झोपण्याऐवजी तो पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांसोबत झोपण्यासाठी आला होता,

परंतु नियतीने त्याच्यावर घाला घातला आणि झोपल्यानंतर तीन ते चार तासानंतर ईस्माईलची हत्या करण्यात आली.

चौकशीसाठी ताब्यात

कोयल पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकल्यामुळे जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली होती. तालुका पोलिसांनी कसून चौकशी केली व संशयावरुन रात्री उशिरा जळगाव जिल्ह्यातील चारठाणा (ता. मुक्ताईनगर) येथील ङ्गिरोज पावजी तवर व महेंद्र पावजी तवर या दोन्ही भावांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याच दरोडेखोरांचा बोळे-शेवगे (ता.पारोळा) दरम्यानच्या रस्तालुटीत समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर शेवगे येथे घटनास्थळी आणण्याच आले होते.

LEAVE A REPLY

*