होय, कदाचित माझी पक्षातून हकालपट्टी होईल…!

0

धुळे । दि.15। प्रतिनिधी-नव्या प्रकल्पात आमदारांचा सहभाग असल्यामुळे होवूच द्यायचे नाही, ही राष्ट्रवादी सेनेची भूमिका राहिली आणि माझ्याच पक्षाच्या सरंक्षण राज्य मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील गटाने हे काम हाती घेतले.

आता माझ्या विरोधकांना कामच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे माझी अवस्था ‘दोस्त मुझे दुष्मनोकी जरूरत नहीं, अरे, अपनेही दुष्मनो का काम कर रहे है’ अशी झाली आहे.

माझ्याविरोधात तक्रारीचा पाढा वाचणार्‍यांना प्रवेश देण्याचे काम माझा पक्ष करीत आहे. त्यामुळे ‘साहेब’ कदाचित माझी पक्षातून हकालपट्टी करतील, असे भाकीत आ. अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी त्यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हेच आपल्याविरोधात काम करीत असल्याचा आरोपही केला.

आ. गोटे म्हणाले की, पाच कंदिल मार्केटची जागा पालिकेच्या ताब्यात नसतांना, अथवा रिक्त नसतांना बी.ओ.टी तत्वावरील टेंडर काढण्यात आले.

नियोजीत प्लॅनप्रमाणे निवडक ठेकेदारांचीच टेंडर्स आलीत. पावसाळयात भाजी बाजारात कांदे, बटाटे, भाजीपाला विकून पोट भरणार्‍या भाजी विक्रेत्यांना दमदाटी करून मार्केट पाडण्यासाठी जे.सी.बी.पोकलँड, पोलीस बंदोबस्त असा लवाजमा घेवून पालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.पण मी दुसर्‍याच दिवशी कागदपत्रासह मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थिती अवगत करून दिली.

मुख्यमंत्र्यांनी पावसाळयापर्यंत अतिक्रमण काढू नये. वास्तुचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे, असे आदेश दिलेत. पालिका प्रशासनाने अहवाल सादर करावा, असा त्याचा अर्थ होता.

नाशिक महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात आली. महेश झगडे यांनी पहिल्याच मिटींगमध्ये उपस्थित सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले.महापौर, आयुक्त, जिल्हाधिकारी यांची मते जाणून घेतली.

व्यावसायिकांकडे आजमितीस असलेल्या क्षेत्रफळापेक्षा दिडपट, शक्य असेल तर दुप्पट क्षेत्रफळाचा गाळा त्यास विनामोबदला म्हणजे फुकट द्यावा. गाळयाचे भाडे पालिकेने आपले उत्पन्नाचे साधन म्हणून वसूल करावे.

मुख्यमंत्र्याकडून एफ.एस.आय.आणण्याची जबाबदारी माझी, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. टोलेजंग इमारत उभी करू.सहा महिन्यातच व्यावसाईकांना गाळे देवून टाकू.

तोपर्यंत पालिकेने तात्पुरते पुनर्वसन कसे करायचे?यावर उपाय शोधावा, असेही ठरले.मात्र आयुक्तांनी शासनास अजूनतरी अहवाल सादर केलेला नसावा.

सरंक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी भुयारी गटार योजनेचा आढावा घेतला. झोपेतून जागे व्हावे तसे नगरसेवक, आमदारांनी सोडवण्याच्या पात्रतेचा 136 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नावर अधिकार्‍यांना धारेवर धरले.

त्यानंतर पाच कंदील मार्केटसाठी डॉ.भामरे नाशिक येथे डेरेदाखल झाले. सौ.महापौरदेखील त्यांच्या लवाजाम्यासह डेरेदाखल झाल्या.मी मुख्यमंत्र्यांशी, पंतप्रधानांशी बोलतो.

दिल्लीत व्यंकय्या नायडूंना भेटतो.मोदीसाहेब, लवकरच धुळ्यात उदघाटनास येणार असल्याचा वार्तालाप झाला. नॅशनल, इंटरनॅशनल चर्चा झाल्या.

आयुक्तांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. चुटूकपुटूक पुनर्वसन करायच असतं तर, मुख्यमंत्र्यांनी हे काम माझ्यासारख्या व्यक्तीवर सोपविलेच नसते.समितीचा निर्णय होईल.

त्यावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून पुढील ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ठरेल. जर मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलून आपण काही वेगळं केलं तर, आपणास एफ.एस.आय.केवळ एकच मिळेल.

मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेप्रमाणे केले तर अमर्याद एफ.एस.आय.मिळवता येईल. पालिकेला दिर्घकाळासाठी उत्पन्नाचे साधन होईल.व्यावसाईकांना दुप्पट क्षेत्रफळ मिळाल्यास सुंदर दुकाने उभी राहतील.

दुकाने विकत घेण्यासाठी पैसे लागत नसल्याने शिल्लक सर्व रक्कमेची व्यवसायात गुंतवणूक करून व्यवसाय वाढवतील आदी बाबी आयुक्तांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.

पण केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी व सौ.महापौरांनी एकच मार्केट करण्याचा घोषा लावला. यामुळे 150 कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचा एक प्रकल्प गेला.

15 कोटींची कामेच नाहीत!
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना नदी काठावरील रस्त्यांकरीता 15 कोटी रूपयांचे विशेष अनुदान दिले.मी सातत्याने पाठपुरावा करीत 15 कोटी मंजूर करून घेतले. तत्कालीन महापौर व सत्ताधारी राष्ट्रवादी सेनेने एका ओळीच्या पत्राने मागणी केली नव्हती. तरीसुध्दा महासभेत ठराव,आयुक्तांकडे बैठका घेतल्या. 15 कोटी रूपयांपैकी 1500 रूपयांचे काम त्यांना दाखवीता येणार नाही, असेही गोटे यांनी म्हटले आहे.

पक्षातून माझी हकालपट्टी होईल…
मी जाणून आहे की, आताही मुख्यमंत्र्यांकडे जातील. साहेब काही तरी करा. आमदाराचा बंदोबस्त झाला पाहीजे, असे गार्‍हाणे करतील. त्यावर ‘साहेब’ मला बोलावतील, झापतील, कदाचित पक्षातून हकालपट्टीही करतील. पुन्हा तिकीट देणार नाही, असंही सांगतील. शिस्तभंगाची कारवाई तर अटळच आहे. या सर्व गोष्टी गृहित धरून सहन करण्याचा मी संकल्प सोडला आहे.विरोध करायचा तर दंड थोपटून मैदानात उतरायचे.समोेरासमोर लढाई करण्यातच खरी मर्दानगी आहे.कुजबूज आंदोलन, चुगलखोरी, बनावट स्टोर्‍या तयार करून नेत्यांचे कान भरायचे, बोगस तक्रारी करायच्या असले उद्योग करण्याची मला आवशकता नाही. जे-जे माझे विरोधक होते. माझ्या विकास कामांना कायम विरोध करणार्‍या असंतुष्ट आत्म्यांना माझ्या पक्षात पवित्र करून घेण्याचा धडाका सुरू आहे. माझ्या पक्षातच माझ्याविरूध्द बोलणार्‍यांची संख्या वाढवायची. मुंबई वारी घडवून आणायची. माझ्याविरूध्द जेवढे काही ओकता येत असेल तेवढे ओकायचे, हे न समजण्याइतका मी बालीश नाही. पण विरोधकांशी अंधारात तडजोड करून पक्षाशी गद्दारी करण्याचा विचार मनाला कधी शिवला सुध्दा नाही.

‘मनोकामना‘ पूर्ण न झाल्यानेच माजी महापौरांचा भाजपात प्रवेश
वृत्तपत्रांच्या कात्रणाचे गठ्ठेच्या गठ्ठे घेवून दिल्ली-मुंबईला नेत्यांच्या घरी चकरा मारायच्या,आमदार त्रास देतो, पक्षाबद्दल काही-माही बोलतो. चक्क गाढव म्हणतो, असे म्हणत उंबरठे झिजवून-झिजवून अनेकजण परत आले. माझ्याच पक्षातील नेत्यांनी केलेलं हेच काम राष्ट्रवादी सेनेच्या माजी महापौर सौ.जयश्रीताई अहिरराव यांनी केले.तत्कालीन आयुक्त डॉ.नामदेवराव भोसलेंच्याविरूध्द जाणं हे एक निमित्त होत. विकासाच्या प्रत्येक कामाला विरोध केल्याचे ‘बक्षीस’ म्हणून महापौरपदासाठी सौ.जयश्रीताईंना पुन्हा सव्वा वर्ष वाढवून मिळाले.आमदारांनी प्रामाणिक आयुक्त आणला तर त्याला टिकू द्यायचं नाही. अडीच वर्षे जास्तीची मिळावीत. याकरिता सौ.सुप्रीयाताई, आ.अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सर्वांच्या घरी जोगवा मागून झाला. मात्र मनोकामना पूर्ण न झाल्याने अखेरीस आमच्या पक्षाची दारे खुली झाली. लगेचच राष्ट्रवादीत काम करणं कठीण होतं, असं सांगत कथीत राष्ट्रवादीच्या माजी महापौर अखेरीस भाजपात दाखल झाल्या असल्याची टिका आ. गोटे यांनी पत्रकात केली आहे.

चौपाटी पाडणार्‍या वारुळेंना राष्ट्रवादीची ‘बक्षिसी’
शहरातील पांझरा चौपाटी पाडण्याकरीता अर्थपुरवठा करणार्‍या माजी आमदारांनी ललीत वारूळे (पाटील) याची खणा-नारळाने ओटी भरली. शिंदखेडा येथे राहून धुळे शहरातील चौपाटी पाडण्याची जबाबदारी उरावर घेतल्याबद्दल ललीत वारूळेंना बक्षीस म्हणून छगन भुजबळ यांच्या ‘डाका’ कंपनीचे भागीदार संदिप बेडसे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे शिंदखेडा तालुका अध्यक्षपद बहाल केले आहे, अशी टिकाही आ. गोटे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*