सेनेने मुख्यमंत्र्यांसमोर ढोल वाजवावा !

0
धुळे । दि.14 । प्रतिनिधी-शेतकर्‍यांसाठी आम्ही विधीमंडळात लढलो. तेव्हा सरकारने 19 आमदारांचे निलंबन केले. त्यानंतर आम्ही संघर्ष यात्रा काढली.
सरकारने कर्जमाफी केली पण भूमिका ठाम नाही. 30 जून 2017 पर्यंत कर्जमाफी करावी ही आमची मागणी आहे. कर्ज माफी होवून तीन आठवडे झाले, तरी याद्या बाहेर आल्या नाहीत.
शिवसेनेचे नेते बँकासमोर जावून ढोल वाजवितात. पण त्यांच्यात हिमत असले तर त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ढोल वाजवून दाखवावेत, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी दिले.
येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदीरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आ.अजित पवार बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा चित्रा वाघ, आ.जयदेव गायकवाड, प्रमोद हिंदुराव, ईश्वर बाबुळदे, शिवाजीराव पाटील, उमेश पाटील, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, माजी आ. रामकृष्ण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, महानगराध्यक्ष मनोज मोरे, स्मिता आर.पाटील, किरण शिंदे, किरण पाटील, जि.प. सभापती लिलाताई बेडसे, ज्योती पावरा, सुवर्णा शिंदे, मिनल पाटील, नवाब शेख, मनपा सभापती कैलास चौधरी, यशवर्धन कदमबांडे, संजय वाल्हे, सत्यजित सिसोदे आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

यावेळी अजित पवार पुढे म्हणाले की, ज्यांच्या नेत्यांना शेतीचे काही कळत नाही, ते शेतीवर बोलतात. सरकारमध्ये असतांना दुटप्पी भूमिका घेतात.

मुंबई महानगरपालिकेत 60 हजार कोटींचे डिपॉझिट पडून आहे. ते पैसे उध्दव ठाकरे सरकारला कर्जमाफीसाठी का देत नाही.? त्यातून महापालिकेला व्याज मिळू शकते व शेतकरी कर्जमुक्त होवू शकतो.

सेनेचे मंत्री आम्ही ‘सरकारजमा’ नाहीत असे सांगतात. मग, सरकारचा भत्ता, गाड्या कशा वापरतात. मंत्रीपदाचा मान-सन्मान का घेतात, ते सरकारचे जावाई आहेत का? सेनेची भूमिका समाजाच्या भल्यासाठी नाही.

तणाव आणि तेढ निर्माण करणे एवढेच त्यांचे काम आहे. म्हणूनच मी त्यांना दोन तोंडी गांडूळ म्हणतो, अशी टिका पवार यांनी शिवसेनेवर केले.

अनेक लाटा आल्या
पक्षाची संघटन बांधणी करण्यासाठी आम्ही राज्याचा दौरा सुरू केला असून गाव तेथे शाखा आणि कार्यकर्त्याच्या घरावर झेंडा हे अभियान हाती पक्षाने हाती घेतले आहे. लोकशाहीत संधी मिळाली नाही तर खचायचं नसते. देशात अनेक लाटा येऊन गेल्या. जनता पक्ष, इंदिरा गांधी यांच्यानंतर आता मोदी लाट आली. मात्र या प्रत्येक लाटेत शरद पवार मिळून मिसळून राहिले. कधी खचले नाहीत.

कोणी गेले म्हणून पक्ष संपत नाही !
गेलेल्यांना आपण बांधून ठेवू शकत नाही. मात्र कोणी मोठ केल, महापौरपद कोणी दिलं, प्रतिष्ठा कोणामुळे मिळाली, कोणी आपल्यासाठी कष्ट घेतले, कोणते कार्यकर्ते राबले, याची जाणीव ठेवली पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले, कोणी गेले तरी कार्यकर्ते जोमाने काम करीत राहतात. पक्षाचे कार्य व विचार कधी थांबत नाही.

कोणीच सुखी नाही
राज्यातले वातावरण बदलत असल्याची जाणीव जनतेला झाली आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारने काहीच काम केलेले नाही. गरजुंना नोकर्‍या मिळत नाही, महागाई कमी झाली नाही, शेतकरी समाधानी फळे, भाजीपाला, दूध उत्पादक आणि शेळीपालन करणारा कसा जीवन जगतोयं याची जाणीव सरकारला नाही. देशात परकीय गुंतवणूक आली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणामुळे आयटी क्षेत्रात बेरोजगारी वाढते आहे. हे सरकार सांगतं एक आणि करतं काहीच. मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक यांच्यावरील अन्यायाबाबत केंद्र सरकार बोलायला तयार नाही, असेही अजित पवार म्हणाले.

गोवंश हत्याबंदीच्या नावाखाली हैदोस
गाईचे रक्षण जरुर व्हावं, पण माणसावरही लक्ष असू द्या. दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आज कोणतीही भिती उरलेली नाही. गोवंश हत्याबंदीच्या नावाखाली देशभरात हैदोस सुरु आहे. हे सरकार घटनेने दिलेल्या अधिकारावर गदा आणत असून खान्यापिण्यावरही बंधने आणली जात आहे. गो मांस ठेवण्याच्या संशयावरुन लोकांच्या हत्या होत आहे. म्हशी विकायला जाणार्‍यांचीही आता हत्या केली जाते, अशी टिकाही श्री. पवार यांनी केली.

थेट सरपंच निवडीमुळे खेळखंडोबा
लोकांमधून सरपंच निवडीचा निर्णय सरकारने घेतला. मात्र सरपंच कामे कसे करणार हा प्रश्न आहे. या निर्णयाचा विकासावर मोठा परिणाम होणार आहे. यातून ग्रामीण भागात सावळागोंधळ आणि खेळखंडोबा पहायला मिळेल. सध्या नगरपालिकेतदेखील असेच चित्र आहे. आमच्या सरकारनेदेखील एकदा लोकनियुक्त सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. मात्र अनुभवानंतर तो निर्णय बदलला. आताचे सरकार मनात आले तसे कायदे आणि नियम बनवित असल्याचा आरोप पवार यांनी केला.

सर्वच योजना फसव्या
व्यापारी जीएसटीमुळे नाराज आहेत. स्टार्ट अप इंडिया, इजिटल इंडिया, स्किल इंडिया, मेक इन इंडिया यासारखे नावे देवून फसव्या योजना हाती घेतल्या जातात. मात्र शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे सरकार सांगत होते. मात्र पाच वर्ष संपण्याची वेळ आली तरी सरकारचा अभ्यासच सुरु आहे.

यात्रेकरूंवर हल्ले
अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला होऊन निरपराध भाविकांचे जीव गेले. आता दर्शनाकरीता लोकांनी फिरायचे नाही का? भाविकांचे रक्षण करणे केंद्राची जबाबदारी आहे. पाकिस्तान आणि चिन सिमेवर अशांतता असून यात कुणाचे निर्णय आणि धोरण चुकत आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

नोटबंदी करुन लोकांचे हाल केले. मोठमोठ्या रांगा लागल्या, अनेकांना जीव गमवावा लागला. सामान्य माणसापर्यंत दोन हजाराची नोट आली नव्हती, तोपर्यंत अतिरेक्यांच्या हातात या नोटा पोहचल्याचे दिसून आले होते, असेही पवार यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, संघटन मजबूत करण्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी आम्ही राज्यभर दौरा करीत आहोत.

ज्यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली त्यांना धक्का दिल्याशिवाय राष्ट्रवादी स्वस्त बसणार नाही. तापी खोर्‍यातील प्रकल्प, उपसा सिंचन योजना यांना गती देण्यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केले होते.

2014 मध्ये हिवाळी अधिवेशनात सर्वप्रथम राष्ट्रवादीने कर्जमाफीची मागणी केली. राज्यात निघालेल्या संघर्ष यात्रेचे अजित पवार हेच खरे जनक होते.

सरकार वेगवेगळे निकष लावून आणि जी.आर.काढते तर शिवसेना ढोल वाजवून नौटंकी करीत आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत आवाज उठविण्याची शिवसेनेत हिमत नाही.

90 लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करु. येत्या 24 जुलैला अधिवेशनात आमची भूमिका मांडली जाईल.

22 जुलैला अजितदादा पवार यांचा वाढदिवस राज्यात प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, मनोज मोरे, यशवर्धन कदमबांडे यांनीही मोगत व्यक्त केले.

 

 

LEAVE A REPLY

*