वरिष्ठ सहाय्यकासह दोघे गजाआड

0
धुळे । दि.14 । प्रतिनिधी-मनपाचे अतिक्रमण विभाग विभागाचे वरिष्ठ सहाय्यक लोकसेवक नंदुलाल शामराम बैसाणे (वय 53), व खाजगी इसम दादाभाई वसंत मोहिते (वय 45) यांच्यासह तिघांना 10 हजार रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे देवपूरमधील एकविरा देवी मंदिराजवळ बखळ प्लॉट आहे. सदर प्लॉटवर श्री. खाटीक यांनी अतिक्रम केलेले असल्याने तक्रारदार यांनी धुळे महानगरपालिकेकडे त्यांचे बखळ प्लॉटवरील अतिक्रमण काढण्यासाठी लेखी अर्ज दिला होता.
परंतू अतिक्रमण न निघाल्याने पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार मनपाच्या अतिक्रमण विभागातील नंदुलाल बैसाणे यांना भेटले. बैसाणे यांनी सदर अतिक्रमण काढून देण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यावेळी तक्रारदार यांनी नंदुलाल बैसाणे यांना 10 हजार रुपये दिले होते. तरीही अतिक्रमण न काढल्यामुळे तक्रारदार यांनी नंदुलाल बैसाणे यांची मनपा येथे जावून पुन्हा भेट घेतली.

 

त्यावेळी बैसाणे यांनी उर्वरीत 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती.

त्यानुसार दि.14 जुलै 2017 रोजी महानगरपालिका धुळे येथे पडताळणी केली असता, नंदुलाल शामराव बैसाणे यांनी तक्रारदार तक्रारदाराकडून तडजोडीअंती 10 हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर सापळा लावण्यात आला. त्यात नंदुलाल बैसाणे यांच्या सांगण्यावरुन खाजगी इसम दादाभाई मोहिते यांनी तक्रारदाराकडून पंच साक्षीदारांसमक्ष 10 हजार रुपये लाच स्विकारुन नंदुलाल बैसाणे यांच्याकडे दिल्यानंतर दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक व पोलिस उपअधिक्षक शत्रुघ्न माळी, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलिस निरीक्षक पवन पी. देसले व त्यांच्या पथकातील जितेंद्र परदेशी, किरण साळी, संदीप सगर, देवेंद्र वेंद्रे, कृष्णकांत वाडीले, संतोष हिरे, कैलास शिरसाठ, कैलास जोहरे, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी व संदीप कदम यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*