शेतकर्‍यांनो आत्महत्त्या करु नका !

0
साक्री/पिंपळनेर । दि.14 । प्रतिनिधी/वार्ताहर-महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी कर्जबाजारीपणाला वैतागुन आत्महत्या करू नये कायदा आपल्या बाजूने आहे यामुळे आपल्या सर्वांचे कर्ज शासनाला माफ करावे लागेल याची हमी मी घेतो, असे प्रतिपादन सुकाणू समितीचे जेष्ठ सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी शेतकरी जनजागरण यात्रेच्या संघर्ष परिषदेत केले.
शेतकरी संघटनांची राज्य सुकाणू समिती आणि सत्यशोधक शेतकरी सभा आयोजित मशेतकरी जनजागरण यात्रेची संघर्ष परिषदफ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात दि 14 रोजी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे नामदेव गावडे, माजी शिक्षक आमदार जे यु ठाकरे, किसान सभेचे डॉ अजित नवले, डॉ अशोक ढवळे, विश्वनाथ पाटील, रविकांत तुपकर, विठ्ठल पवार, सुशीलाताई मोराळे, संजय पाटील, सुभाष लोमटे, रवी देवांग, कॉ सुभाष काकुस्ते, सजूबाई गावित, किशोर ढमाले, करणसिंह कोकणी, मन्साराम पवार, रामसिंह गावित आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी रघुनाथ पाटील हे बोलत होते, त्यांनी काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षाच्या सरकारवर टीका केली. कृषीमूल्य आयोग चुकीचे मूल्य ठरवत असून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आज कर्जबाजारी आहे.

एक काळ असा होता कि, त्याकाळी सरकारला इतर देशांतून अन्नधान्य आयात करावे लागत होते. देशात नागरिकांना खाण्याएवढेही अन्नधान्य उत्पादन होत नव्हते अश्या परिस्थितीत शेतकर्‍यांनी काबाळकष्ट करून शेती क्षेत्राचे उत्पादन वाढविले आणि देश अन्नधान्याने स्वयंपूर्ण केला.

परंतु देशाला स्वयंपूर्ण करणारा बळीराजा शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे. आणि शेतीवर आधारित इतर सर्व प्रकारचे व्यवसाय करणारे उधोगपती मात्र श्रीमंत होत आहेत. हा विरोधाभास त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

याचबरोबर सरकारकडे तूर आयातीसाठी विदेशातील शेतकर्‍यांना द्यायला प्रतिकिलो 135 रुपये आहेत पण देशातील शेतकर्‍यांच्या तूर खरेदीला 50 रुपये देखील नाहीत.

परदेशातील तूर खरेदीला 9 हजार कोटी रुपये आहेत परंतु देशातील शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. शासनाच्या यासर्व शेतकरीविरोधी निर्णयामुळे शेतकरी तोट्यात गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

त्याच्या नशिबी कर्ज आणि विषाची बाटली आली आहे. हा खेद व्यक्त करत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात ही मागणीही रघुनाथ पाटील त्यांच्याकडून करण्यात आली.

यावेळी बळीराजा संघटनेचे संजय पाटील यांनी सांगितले कि, सरकार जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी करत नाही तोपर्यंत आम्ही आमची बँकेची थकबाकी व वीजबिल भरणार नाहीत. अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

याबरोबर साजूबाई गावित, नामदेव गावडे, कॉ करणसिंह कोकणी, डॉ अजित नवले, माजी आमदार जे यु ठाकरे, विश्वनाथ पाटील, सुशीलताई मोराळे, कॉ सुभाष काकुस्ते, रवी देवांग, डॉ अशोक ढवळे व किशोर ढमाले आदिंनी मार्गदर्शन केले.

संघर्ष परिषदेत सूत्रसंचालन आर टी गावित यांनी केले तर प्रास्ताविक कॉ रणजित गावित यांनी केले. परिषदेसाठी शेतकरी सत्यशोधक सभेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

यात हजारोच्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या. तसेच खान्देशातील धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यातील शेतकरीही उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*