कर्जमाफीबाबत शासनाच्या फसव्या घोषणांचे पितळ उघडे पडणार !

0
धुळे । दि.14 । प्रतिनिधी-शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून स्वामीनाथन आयोग लागू करणे गरजेचे होते. मात्र राज्यातील भाजप सेनेच्या सरकारने कर्जमाफीबाबत शेतकर्‍यांची दिशाभूल केली आहे.
जाचक अटी टाकून सर्वच शेतकर्‍यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले आहे, म्हणून काँग्रेसने सुरू केलेल्या ‘कर्ज पे चर्चा’ अभियानात शेतकर्‍यांनी सहभागी होवून शासनाच्या धोरणाविरोधात जनआंदोलन उभे करावे, असे आवाहन माजीमंत्री रोहिदास पाटील यांनी केले.
आज शेतकरी व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ‘कर्ज पे चर्चा’ अभियानाला प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.रोहिदास पाटील यांच्या उपस्थितीत धुळे तालुक्यात या अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी बोलतांना माजीमंत्री पाटील म्हणाले कि, राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे.शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयापासून वंचित राहिले आहेत.

त्यामुळे ज्या-ज्या शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले नाही, अशा शेतकर्‍यांकडून राज्यभरातून काँग्रेस पक्ष अर्ज भरून घेत आहे. तातडीचे कर्ज म्हणून 10 हजार कोणालाही मिळाले नाहीत. याबाबतची यादी निवेदन देवून मागितली जात आहे.

थकित कर्जदार शेतकर्‍यांना 1.5 लाखापेक्षा जास्त कर्ज असल्यास शेतकर्‍यांनी उर्वरित रक्कम आधी भरावी मगच त्यांना कर्जमाफीची रक्कम अदा करणार असल्याची जाचक अट टाकण्यात आली आहे.

तसेच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना फक्त 25 हजाराचे अनुदान देवून त्यांचीही सरकारने बोळवण केली आहे.

त्यामुळे काँगे्रस राबवित असलेल्या या अभियानामुळे सरकारचा ढोंगीपणा समोर येवून पितळ उघडे पडणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले कि, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देवून त्यांचा सातबारा उतारा कोरा केला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या पाहिजे आणि संपूर्ण वीज बिल माफ केले तरच कर्जाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आधार मिळेल असेही श्री. पाटील म्हणाले.

यांच्यासमवेत खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील,पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील,भगवान गर्दे,कृऊबाचे उपसभापती रितेश पाटील,कृषीभूषण भिका पाटील, कृऊबा संचालक विजय गजानन पाटील,जि.प.माजी सभापती शांताराम राजपूत,पं.स.उपसभापती दिनेश भदाणे,तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी,शशीकाका रवंदळे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राजीव पाटील आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन उपाध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*