अजितदादा, राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून द्या !

0
विलास पवार,धुळे । दि.13-सत्तेच्या काळात सर्वच जवळ असतात. राजकीय उलथापालथीत उतरती कळा लागली की कार्यकर्ते पक्षांप्रमाणे भुर्रकन उडून जातात. अशावेळी पक्षाशी बांधीलकी कायम ठेवून संघटन मजबूत करण्यासाठी झटणार्‍यांचे मोल मोठे असते.
आज खान्देशात राष्ट्रवादीची वाट ‘बिकट’ बनलेली असतांना धुळ्यात पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यात माजी आ.राजवर्धन कदमबांडे हे आपल्या शिलेदारांमार्फत यशस्वी ठरत आहेत.
जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे आणि महानगराध्यक्ष मनोज मोरे या युवा नेत्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवून विरोधकांशी संघर्ष केला जात आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात पक्षासोबत राहणार्‍यांची दखल घेतली गेली पाहीजे.

जिल्हा राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्यासाठी अजितदादांनी वादळात नौका हाकणार्‍यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहीजे, अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्ता व्यक्त करीत आहे.

वादळांवर वादळे आली असताना जिल्ह्यात राष्ट्रवादीची नौका सहीसलामत ठेवणारे माजी आ.राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे आणि महानगराध्यक्ष मनोज मोरे हे पक्षसंघटन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.

धुळ्यात माजीमंत्री डॉ.हेमंतराव देशमुख आणि नंदुरबारात डॉ.विजयकुमार गावीत यांनी दुसर्‍या पक्षाची वाट धरुन राष्ट्रवादीला ‘टाटा’ केला.

तेव्हा या जिल्ह्यांमध्ये पक्षाची काय स्थिती होईल? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र कुशल संघटक असलेले माजी आ.राजवर्धन कदमबांडे यांनी पक्षात नवनवीन शिलेदार तयार केलेत.

आलेल्या राजकीय लाटांमध्ये अनेकांचे हाल झाले असतांना धुळे शहर आणि जिल्ह्यात पक्षाचे संघटन टिकवून ठेवण्यात कदमबांडे यशस्वी झाले आहेत.

आज खान्देशात राष्ट्रवादीची अवस्था बिकट असतांना धुळ्यात कदमबांडे यांनी आपल्या शिलेदारांच्या मदतीने राष्ट्रवादीची घडी विस्कटू दिलेली नाही.

जेथे-जेथे उणीव निर्माण झाली, तेथे-तेथे कदमबांडे यांनी पर्याय निर्माण केले. त्यामुळेच अतिशय कठीण काळातही धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीने आपली ताकद टिकविण्यात यश मिळविले आहे.

गेल्या वर्षभरात खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत मेळावे झालेत. अजितदादा शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी जिल्ह्यात येवून गेले.

या नेत्यांचे प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यात राजवर्धन कदमबांडे यांनी आपले कौशल्य पणाला लावले. आज धुळे जिल्ह्यात पक्ष टिकवून ठेवण्यासाठी राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली संदीप बेडसे आणि मनोज मोरे सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

पक्षाची नौका जिल्ह्यात ‘डोलायमान’ झाली की श्री. कदमबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही शिलेदार पक्षाची कमान सांभाळतात. जिल्ह्यात डॉ. हेमंतराव देशमुख यांच्या रुपाने ज्येष्ठ नेतृत्व राष्ट्रवादीला लाभले होते.

त्यांनी पक्ष सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे काय होणार? अशीही शंका सामान्य कार्यकर्त्याच्या मनात होती.दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्याला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनविणारे विजयकुमार गावीत यांनी दुसर्‍या पक्षाची वाट धरल्याने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी संपते की काय? असा प्रश्न निर्माण होत होता.

अशा परिस्थितीत राजवर्धन कदमबांडे यांनी संदीप बेडसे, मनोज मोरे यांच्यासारख्या पदाधिकार्‍यांना ताकद देऊन धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली.

पक्षाची इतरत्र परिस्थिती बिकट झालेली असतांना धुळे जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात ठेवली. महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून राष्ट्रवादीची ताकद तेवढीच असल्याचे दाखवून दिले.

आगामी काळात महापालिका निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी अजितदादांना प्रयत्न करावे लागतील.

ज्यांनी-ज्यांनी पक्ष टिकवून ठेवण्यासाठी अडचणीच्या काळात आपले संघटनकौशल्य पणाला लावले आहे. त्यांचा विचार करावा लागेल.

कौतुकाची थाप द्यावी लागले. जिल्ह्यात दोन मंत्री विरोधी गटाचे असतांना पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवणार्‍यांना न्याय देवून जिल्हा राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्याचा अजितदादांना आज संकल्प सोडला पाहिजे.

 

LEAVE A REPLY

*