गुटखा माफियांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !

0
धुळे । दि.13 । प्रतिनिधी-गुटख्याच्या वादातून धुळे शहरात खूनाची घटना घडली आहे. राज्यात गुटखा बंदी असतांना शहरात गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे.
त्यामुळे गुटखा विक्री करणार्‍या दुकानदारांची सखोल चौकशी करून स्थानिक गुटखा माफियावर कठारे कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे यात दोषी असणार्‍या अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि या व्यवसायाला मदत करणारे स्थानिक गुंड व राजकीय गुंड यांचादेखील या खुनात सहआरोपी म्हणून समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज जिल्हा पोलिस अधिक्षक एम. रामकुमार यांच्याकडे करण्यात आली.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुटखा विक्रीतून शासनाला शेकडो कोटींचा महसुल मिळत होता. परंतु या गुटख्याच्या सेवनाने कॅन्सरसारखा जीवघेणा आजारअसल्याने व गुटख्याच्या व्यसनामुळे लहान बालकासह मोठे व तरुण पिढी बरबाद होत असल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकडो कोटीच्या महसुलावर पाणी सोडून राज्यात गुटखा सेवनावर व विक्रीवर बंदी आणली.

परंतु सध्याच्या शासनाने या निर्णयाची अमंलबजावणी केली नाही. अन्न व औषध प्रशासनही विक्री रोखण्यात अपयशी ठरला आहे. काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचे काहम होते.

परंतु कॅन्सरपेक्षा भयंकर असा भ्रष्टाचाराचा आजार जडलेल्या या खात्याने शेजारील गुजरात, मध्यप्रदेश येथून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे येणार्‍या व सर्रास विक्री सुरू ठेवली आहे.

धुळ्यात गुटखा वादातून 4 जूनला तरूणाचा खून झाला आहे. तरीही अन्न व औषध प्रशासन विभाग जागा झालेला नाही. आजही शहरात सर्रास व मुबलक प्रमाणात गुटखा मिळतो आहे.

धुळे शहरासह जिल्हाभर आदेशाची कठोर अंमलबजावणी करावी. मध्यप्रदेश व गुजरातमधुन येणार्‍या बसेसद्वारे गुटख्याच्या गोण्या आणल्या जातात.

ज्या बसमध्ये गोण्या मिळाल्या, त्या बसेस चालकासह परत पाठवल्या आणि रिव्हर्स चेकिंग झाली तर निश्चितच या बेकायदेशीर धंद्याच्या मुळाशी जाता येईल. परंतु खंडणी व हप्त्यामुळे थातूरमातुर कारवाई केली जाते.

याबाबतीत ठोस कार्यवाही झाली नाही तर भविष्यात मोठे जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा पत्रकात देण्यात आला असून यशवर्धन कदमबांडे, मनोज मोरे, संदीप बेडसे, कैलास चौधरी, आर.बी.बोरसे, अरुण पवार, व्ही.एन.पवार, व्ही.एन.पाटील, रणजित राजे भोसले, सुनिल आगलावे, शेख राजज, कुणाल संजय पवार, सुयोग पी.माने, कृष्णा मोरे, जयेश पवार, रजनिश निंबाळकर, गणेश जाधव, चंद्रकांत महाजन, राहुल गायकवाड, कुंदन पवार, गणेश चौधरी, पराग बोरसे, सुहास, दिनेश, संदीप हरले आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

LEAVE A REPLY

*