धुळे महापालिकेत हद्दवाढ गावातील नागरिक समस्यांमुळे त्रस्त : शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन

0
धुळे ।  प्रतिनिधी :  महापालिकेत 11 गावांच्या हद्दवाढीनंतर कुठल्याच प्रकारच्या मुलभूत सुविधा महापालिकेच्या माध्यमातून या गावांना पोहचत नाही. विविध समस्यांमुळे या गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या गावातील नागरिकांच्या प्रश्नासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना करावी, या गावांमध्ये पाच वर्षापर्यंत घरपट्टी वाढवू नये, महापालिका प्रशासनामार्फत हद्दवाढ झालेल्या गावांचा विकास आराखडा तयार करून शासनाकडे पाठवून विशेष विकास निधी उपलब्ध करण्यासाठी ठोस प्रयत्न करावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

या गावाच्या मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

याबाबत आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेचे संबंधित अधिकारी या गावांकडे गांभिर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत. हद्दवाढ झाल्यानंतर सर्व गावांना हा त्रास होणार होता. म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून 16 गावांची हद्दवाढ करू नये, कारण महापालिका महानगरातच मुलभूत सुविधा सध्या परिस्थितीत पुरवू शकत नाही.

तर महापालिकेपासून पाच-सात किलो मीटर अंतरावर असणार्‍या गावांचा कुठल्या परिस्थितीत मुलभूत सुविधा पुरविणार? कारण महापालिकेची आर्थिक स्थिती संबंधित गावापर्यंत विकास कामे घेवून जाईल, अशी नसतांना तरी देखील हद्दवाढीचा हट्ट कशासाठी असे निवेदन जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना सोळा गावांच्या ग्रामस्थांना मोर्चा काढून देण्यात आले होते.

जर हद्दवाढ करायचीच असेल तर कमीत-कमी 200 कोटी रुपयांचा सोळा गावांचा विकास आराखडा तयार करून शासनाला पाठवावा, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच जिल्हा नियोजन समिती, वित्त आयोग अशा सर्व योजनांचा हद्दवाढ झाल्यानंतर कुठलाच निधी मिळणार नाही. तसेच गटारी, गावातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पथदिवे या मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होईल आणि सध्या हेच प्रश्न हद्दवाढ झालेल्या गावांना सतावत आहेत.

पाच वर्षापर्यंत हद्दवाढ झालेल्या गावातील घरपट्टी वाढवू नये, तसेच तेथील ग्रामपंचायत कार्यालय आणि कर्मचारी यांच्यामार्फत महापालिकेच्या कारभार चालवावा, परंतु अशा कुठल्याच प्रकारचे नियोजन आजपर्यंत झालेले दिसून येत नाही. संबंधीत योजनांचा निधी विकास कामांचा निधी बंद झाल्यामुळे कुठल्याच कामांचा प्रस्ताव नाही, रस्ते, गटारी, पाणी पथदिवे स्वच्छता या प्रश्नांनी हद्दवाढ झालेल्या गावांना घेरले आहे.

हद्दवाढ झालेल्या गावांपैकी सर्वच गावांमधल्या तेथील नागरिकांना कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. हद्दवाढ झाल्यापासून कुठल्या ना कुठल्या गावातील नागरिक महापालिकेत आपापल्या परिने गावातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी निवेदन देवून आपले गार्‍हाने अधिकार्‍यांसमोर मांडतात. परंतु या उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत कुठल्याही उपाययोजना महापालिका प्रशासन करतांना दिसत नाही.

वलवाडी परिसरात 30 ते 35 हजार लोकसंख्या असून या भागात मोठ्या प्रमाणावर कॉलनी परिसर आहे. त्यामुळे गटारी साफ होत नाही. पाण्याचा निचरा होतांना अडचणी असल्याने पाणी गटारींमध्ये साचते. यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होऊन तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. अनेक ठिकाणी रस्ते नाहीत. रस्ते आहेत त्यांंना खड्डे पडले असून रस्ते तयार करण्यासह रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, पथदिवेही काही प्रमाणात चालु तर काही बंद आहेत.

तसेच वरखेडी गावात महापालिका हद्दीतील गटारींचे पाणी वरखेडी गावातील वाहणार्‍या नाल्यात सोडल्यामुळे तेथील विहिरीचे आणि परिसराचे पाणी दुषीत झाल्यामुळे ते पिण्यायोग्य नसल्याने गावकर्‍यांचे हाल होत आहेत. या गावाची हद्दवाढ झाल्यानंतर पाण्याच्या प्रश्न सुटू शकतो. तसेच अवधान, बाळापूर, महिंदळे, चित्तोड, भोकर, पिंप्री, नकाणे, मोराणे या गावात रस्ते, गटारी, पथदिवे, गावातील स्वच्छता याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी अतूल सोनवणे, हिलाल माळी, वैशाली लहामगे, कैलास पाटील, डॉ. सुशील महाजन, नरेंद्र अहिरे, किरण जोंधळे, देवराम माळी, अरुण धुमाळ, मुकेश खरात, अ‍ॅड.राजन वाघ, शरद गोसावी, गुलाब धोबी, वाल्मीक पाटील, भुषण नथ्थू पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*