नुकसान भरपाईचा 54 कोटीचा पहिला हप्ता प्राप्त

0
रामकृष्ण पाटील
कापडणे । बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी, राज्य शासनाने मंजूर केलेल्या भरपाईचा पहिला हप्ता जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. जिल्ह्यासाठी एकुण 203 कोटी भरपाई मंजुर असून ते तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. 2017 च्या खरीप हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकर्‍यांसाठी 54 कोटी 16 लाखाचा पहिला टप्पा प्राप्त झाल्याने शेतकरी वर्गास दिलासा मिळणार आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार 383 हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली. त्यापैकी तब्बल एक लाख 53 हजार 659 हेक्टर कापुस बोंडअळीग्रस्त झाला. यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. राज्य शासनाच्या आदेशान्वये कृषी व महसुल यंत्रणेने नुकसानीचे संयुक्त पंचनामे केले. 2017 या वर्षातील खरीप हंगामातील कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शासनाने बागायतीसाठी हेक्टरी 13 हजार 500 तर कोरडवाहूसाठी हेक्टरी सहा हजार 800 मदत जाहीर केली.

शासनाने नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यास एकूण 203 कोटी दहा लाख 42 हजार रुपये रक्कम मंजुर केले आहेत हे अनुदान जिल्ह्यास तीन टप्प्यात देण्यात येणार असून पहिला 54 कोटी 16 लाख रुपये जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहे. गेल्या खरीपात हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकरी वर्गास या मदतीने काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे.

महसूल विभाग व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून केलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे कापूस पिकाचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकर्‍यांना मदत अनुज्ञय राहणार आहे. नुकसानाचे संयुक्त पंचनामे केला असल्याची खात्री करूनच मदतीचे वाटप करावे, कापूस मदतीची रक्कम संबंधित बाधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात यावी. कोणत्याही बाधित रोग अथवा निविष्ठा स्वरूपात मदत देण्यात येऊ नये. मदतीच्या रकमेतून बँकेने कुठलीही वसुली करू नये.

2017- 18 खरीप हंगामात ज्या तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे अशा तालुक्यांमध्ये निविष्ठा अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. त्या क्षेत्रांमध्ये द्विरुक्ती होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. कापूस पिकाची जिरायत व बागायती नोंद सात बार्‍यावर असणे आवश्यक राहणार आहे. तहसीलदार व अप्पर तहसीलदारांनी पहिला हप्ता वितरित केल्यानंतर संबंधित रकमेचे वाटप केलेल्या लाभार्थींची यादी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवून दुसर्‍या हप्त्याची मागणी करावी. शासनाकडून तीन समान हप्त्यात नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करतांना त्यांना अनुज्ञय असलेली संपूर्ण रक्कम एकाचवेळी देण्यात येणार आहे. बाधित शेतकर्‍यांना वाटप करावयाची मदतीची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित पध्दतीने प्रदान करावी परंतु एकाद्या शेतकर्‍याकडे आधार क्रमांक नसेल तर अशी व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये यासाठी मतदान ओळखपत्र, आधार नोंदणी पावती, पॅनकार्ड, वाहन चालक परवान्याची खातरजमा करून रक्कम देण्यात यावी असे निर्देश नुकसान भरपाई संदर्भात देण्यात आले आहेत.

पहिला हप्त्याची रक्कम
धुळे ग्रामीण- 13,61,97,000
साक्री तालूका- 2,46,94,000
शिंदखेडा तालूका- 10,58,20,000
शिरपूर तालूका- 18,37,80,000
दोंडाईचा अप्पर- 8,27,44,000
पिंपळनेर अप्पर- 83,65,000

LEAVE A REPLY

*