नवसंजीवनी योजनेचा कृती आराखडा सादर करा !

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या नवसंजीवन योजनेचा कृती आराखडा व पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा संबंधित यंत्रणांनी तत्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात नवसंजीवनी योजना प्रारुप आराखडा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रदीप भोये, उपवनसंरक्षक जी. के. अनारसे, सहाय्यक वनसंरक्षक रेवती कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळेचे प्रकल्प अधिकारी आर. एन. हाळपे, एल. आर. राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय शिंदे, प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे उपस्थित होते.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, साक्री तालुक्यातील 102 व शिरपूर तालुक्यातील 71 गावांचा या योजनेत समावेश आहे.

त्यापैकी दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी सहा गावे संवेदनशील आहेत. आदिवासी बांधवांच्या आरोग्यात सुधारणा करणे, त्यांना आरोग्य विषयक सुविधा पुरविणे, विविध रोजगार कार्यक्रमांतर्गत वर्षभर पुरेल एवढा रोजगार उपलब्ध करुन देणे, आदिवासी बांधवांना पिण्याचे शुध्द व पुरेसे पाणी उपलब्ध करुन देणे, अन्नधान्य पुरवठा सुनिश्चित करुन पूरक आहार देणे व या सर्व उपाययोजनांद्वारे आदिवासींचे क्रियाशील आयुष्य वाढविणे हा नवसंजीवन योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

संपूर्ण आदिवासी उपययोजना क्षेत्र, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र व पाडा, मिनीपाडा असे क्षेत्र आहे. प्राथमिक आरोग्य सेवा पुरविणे, शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रोजगार हमी योजना, शालेय पोषण आहार कार्यक्रम, स्वस्त धान्य दुकानांमार्फत शिधा वाटप, सार्वजनिक वितरण व्यवस्था, रस्ते, वीज आदी व्यवस्था संबंधित यंत्रणांनी कृती आराखड्यानुसार अंमलबजावणी करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी दिले.

जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, शिरपूर व साक्री तालुक्यात मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरण्यात आली आहेत.

स्तनदा माता व नवजात अर्भकांची आशा स्वयंसेविकांमार्फत नियमितपणे तपासणी करण्यात येते. या भागात पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे.

बालक आजारी असल्यास वैद्यकीय अधिकारी तपासणी करतात. तसेच वाहनांची ही उपलब्धता आहे. लसीकरण मोहीम नियमितपणे राबविली जाते. आरोग्य सेवक पाण्याच्या नमुन्यांची नियमित तपासणी करतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*