पीआरसी दौरा ठरणार कापडण्यासाठी राजकीय गुंतागुंतीचा

0
रामकृष्ण पाटील-पंचायत राज समितीचा धुळे जिल्हा दौरा नुकताच संपन्न झाला. या दौर्‍यानंतर अनेक प्रश्नांनी उचलखाल्ली. विशेषत: यानंतरच्या विविध घटनांच्या केंद्रस्थानी कापडणे गाव राहिले आहे.
पीआरसी मुळे जिल्ह्याभरात ज्या पध्दतीने उलथापालथ झाली तेवढीच, किंबूहना त्यापेक्षाही मोठी राजकिय अस्थिरता कापडण्यात निर्माण झाली आहे.
एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत राजकीय राड उठविणार्‍या स्थानिक नेत्यांच्या मनात एका वेगळ्याच चिंतेची लकेर जाणवत आहे.
जेवढ्या मर्यादीत विषय व कालावधीपुरते चौकशी होणे अपेक्षित होते त्यापेक्षा हा चौकशीचा वणवा जास्त भाग व्यापतो की काय हा विचार निश्चितच चलबिचल करणारा असल्याचे बोलले जात आहे.
रामकृष्ण पाटील

पंचायत राज समितीचा हा दौरा कापडण्यासाठी राजकिय गुंतागुंतीचा ठरणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

महाराष्ट विधानमंडळाची पंचायत राज समिती दि.5 ते 7 दरम्यान जिल्ह्याच्या दौर्‍यावर येऊन गेली. पीआरसीचा दौरा म्हटला म्हणजे भल्या-भल्यांच्या उरात धडकी भरते.

आप-आपल्या खात्यांचा लेखाजोखा सादरीकरणासाठी तयार करण्यापासून ते अर्थपूर्ण स्तरापर्यंत कशी लगबगीने तयारी होते हे सर्वश्रृंत आहे.

कमी अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी पीआरसी बाबत धसका घेतला गेला असतांनाच कापडणेकरांनी मात्र याबाबत पाहिजे तितके टेन्शन घेतल्याचे दिसले नाही.

पंचायत राज समितीला फार जास्तीचे वैधानिक अधिकार असल्याने आपल्या गावी समिती आली नाही तर बरे होईल अशी अपेक्षा राजकिय नेते व प्रशासकिय अधिकारी ठेवतांना दिसतात.

असे असतांना दुसरीकडे मात्र समितीने कापडण्यास भेट दिली पाहिजे अशी मनोमन ईच्छा येथील दोन्ही राजकीय गटांची दिसून आली.

यासाठी दोन्ही गटांनी पहिल्यादिवशी समिती सदस्यांची भेटही घेतली. इतर गावांपेक्षा थोड बिनधास्त राहण्याच कारणही तसेच होत.

पीआरसी सदस्य असलेल्या ज्या आमदारांनी डेप्यूटी सीईओंच्या रिव्हर्स ट्रपच्या तक्रारीत कापडण्याचे नाव घेतले व गावाचे नाव राज्यभरात प्रसिध्द(?) झाले ते आमदार मुळचे कापडण्याचे रहिवाशी आहेत.

गेल्याच महिन्यात येथील ग्रामस्थांतर्फे व विविध संघटनांतर्फे झालेल्या नागरी सत्कारात या आमदार भूमीपुत्राचाही भव्य सत्कार झाला.

यावेळी गावकरांच्या ॠणांबद्दल ते बोलल्याने आता पीआरसी सारख्या महत्वपूर्ण समितीच्या माध्यमातून काहीतरी आपल्या हाती पडेल या भाबळ्या आशेवर गावातील ग्रामस्थ होते.

आ.हेमंत पाटील यांची गावचा माणुस अशी ओळख असल्याने या दौर्‍याचा ग्रामस्थांनी फार तणाव न घेतल्याचे जाणवले. पंचायत राज समितीच्या स्वागतासाठीचे येथील होल्डींग व ढोल-ताशेही त्याचा प्रत्यय देऊन गेले.

पीआरसीने कापडण्यास भेट दिल्यानंतर बरेच प्रश्न निर्माण झाले. मात्र काही प्रश्न अनुत्तरीतच राहुन गेले. समितीतील सदस्यांनी जसा पोषण आहारावर सवाल उभा केला तसा आलेल्या तक्रारीवरुन पाणीपुरवठ्याच्या विषयाला हात घातला.

ग्रा.पं. चे दप्तर तपासतांनाच खाडाखोड झाल्याचेही त्यांनी सांगीतले. डेप्यूटी सीईओ तुषार माळींच्या लाचप्रकरणाशी त्यांनी सरळ कापडण्यातील या सार्‍या बाबींचा सबंध जोडल्याने कापडण्याचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात तर गेलेच परंतू या चौकशींनीही आता व्यापक स्वरुप घेतले आहे.

लाच प्रकरणाचे समर्थन होऊच शकत नाही व कोणी सुज्ञ नागरीक ते करणारही नाही. परंतू जिल्हा परिषदेच्या दोन नंबरच्या अधिकार्‍यास लाच देण्यास भाग पडावे व त्यांनी ते चुकीचे धाडस करावे ऐवढा घोळ कापडण्याबाबत होता का? या विचारानेच येथील ग्रामस्थांना ग्रासले आहे.

दोन्ही गटांना चौकशी होतांना जो मर्यादीत कालावधी व विषय अपेक्षित होता त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तो वाढणार हे निश्चित. नव्या-जुन्या पाणीयोजनांची चौकशी होणे, ग्रा.पं.चे जुने दप्तर गायब होणे, जुने ऑडीट बाकी राहणे, नव्या दप्तरात काही त्रुटी राहणे या गोष्टींचा वेळोवेळी पाठपुरावा करुनही जेवढी गती मिळत नव्हती त्यापेक्षा जास्त गती पीआरसीमुळे मिळणार असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

असे असले तरी हा उत्सुकतेचाही विषय ठरत आहे. विरोधी गटाने सध्याच्या पाणीयोजनेच्या चौकशीची मागणी केल्यानंतर सत्ताधारी गटाने 2005 पासुनच्या पाणीयोजना व ग्रा.पं.दप्तराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

येथील साडेतीन कोटीच्या पाणीयोजनेचे काम दोन टप्प्यात होत आहे. पाणीयोजनेचा दुसरा टप्प्याचे काम सध्याचा सत्ताधारी गट करतोयं पण पाणीयोजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम ज्या गटाने केले तो गट सध्या विरोधी गटासोबत आहे.

तर विरोधी गटाने 12-13 वर्षापूर्वी केलेल्या ज्या तात्पुरत्या पाणीयोजनेबद्दल सत्ताधारी गटाची तक्रार आहे त्या योजनेचे तत्कालिन पदाधिकारी सध्या सत्ताधारी गटासोबत आहेत.

सखोल चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कार्यवाही झाली पाहिजे असे परखड विचार नेते ग्रामस्थांसोबत मांडतात. मात्र राजकीय नेते निर्माण झालेल्या राजकीय त्रांगड्याने चांगलेच धास्तावले आहेत.

मीच चौकशी मागणी केली आणि त्या जाळ्यात माझ्यासोबतचाच कार्यकर्ता अडकला तर? हा सवाल उभा राहण्याबरोबरच निर्माण होणारे राजकिय चित्र निश्चित चांगले राहणार याची दोन्ही गटांना कल्पना आहे.

आ.हेमंत पाटलांशी सख्य दाखविणार्‍या नेत्यांच्या मनाला आता, हा माणुस आपल्यासाठी भविष्यात राजकिय अडचण निर्माण करुन जाईल की काय असा सवाल जाणकारांतून व्यक्त होतयं.

पंचायत राज समितीचा दौरा मात्र कापडण्यासाठी राजकिय गुंतागुंतीचा ठरणार हे निश्चित असुन भविष्यात कोणावर काय दिवस ओढावतो याबाबत ग्रामस्थांत कमालीची उत्सुकता व विविध तर्कवितर्क दिसुन येत आहेत.

 

LEAVE A REPLY

*