तुषार माळींची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-पंचायत राज समितीचे सदस्य आ.हेमंत पाटील यांना दीड लाखाची लाच देण्याचा प्रयत्न करणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांची पोलीस कोठडीत प्रकृती बिघडल्याने त्यांना काल रात्री भाऊसाहेब हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सलग दुसर्‍या दिवशी जि.प.तील विभाग प्रमुखांचे जबाब लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नोंदविण्यात आले.
शहरातील हॉटेल झंकार पॅलेसमध्ये 7 जुलैला दुपारी 4.30 वासता उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी आ.पाटील यांना दीड लाखांची लाच देऊ केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस कोठडीची मुदत उद्या दि.12 जुलै रोजी संपत आहे.उद्या माळी न्यायालयात हजर केले जाईल.

परंतू माळी यांची प्रकृती काल रात्री बिघडल्याने त्यांना रात्री भाऊसाहेब हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जबाब नोंदविण्यास सुरूवात केली आहे.

आज जि.प.तील विभाग प्रमुखांची चौकशी करण्यात आली त्यात पाणीपुरवठा विभाग, लघुसिंचन, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, कृषी, स्वच्छता, महिला व बालकल्याण, सामान्य प्रशासन, ग्राम पंचायत, जलयुक्तशिवार या विभागाच्या प्रमुखांची लाच लुचपत विभागाचे उगले यांनी स्वत: जबाब घेतले काही विभाग प्रमुखांची एक तास तर काही अधिकार्‍यांची दोन ते तीन तास चौकशी झाली.

तर काही महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधिक्षक शत्रुघ्न माळी, निरीक्षक पवन देसले, महेश भोरटेकर, हवलदार संतोष हिरे, किरण साळी, कैलास शिरसाठ, देवेंद्र वेंदे, जितेंद्र परदेशी, संदिप सरग, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे यांचे पथक ही चौकशीचे काम पाहत आहे.

 

 

LEAVE A REPLY

*