शेतकर्‍यांनी मधमाशी व्यवसायाकडे वळावे !

0
दोंडाईचा । दि.10 । प्रतिनिधी-रासायनिक खते व बियाण्यांच्या वाढलेल्या किंमती, शेतकर्‍यांकडून होणारा खते व किटकनाशकांचा बेसुमार वापर यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.
खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन नैराश्यातुन आत्महत्येसारखा मार्ग जवळ करीत आहे.
मात्र शेतकर्‍याने देशी गाय, गांडूळ प्रकल्प व मधमाशीचे शास्त्रोक्त पध्दतीने पालन केल्यास कमी खर्चात शेती चांगली होवुन उत्पादनात वाढ होवु शकते.
शेतात एकरी दोन याप्रमाणे मधाच्या पेटया ठेवल्यास मधमाश्यांच्या माध्यमातुन चांगले परागीभवन होईल.पिकाची फुलगळती कमी होवुन उत्पादन वाढीसोबत दर्जेदार व भरघोस पिक मिळेल.
तसेच पिकाची चांगली गुणवत्ता असल्याने बाजारात पिकापेक्षा चांगला दर मिळेल. इस्त्राईलमध्ये झालेल्या कृषी क्रांतीत मधमाशी पालनाचा खुप मोठा वाटा आहे.
तेथे मधमाशी पालन हा स्वतंत्र उद्योग म्हणुन विकसित झाला आहे. राज्यातील शेतीची परिस्थिती पाहता शेतकर्‍यांनी या उद्योगाकडे वळणे गरजेचे आहे.
त्यातून उत्पादन वाढीसह मध व इतर उत्पादनाच्या विक्रीतुन अतिरिक्त नफा मिळवणे शक्य होईल. शेतकरी आत्महत्या काही प्रमाणात थांबतील, असे प्रतिपादन नाशिक येथील सुप्रकृती प्रतिष्ठानचे संस्थापक तथा मधमाशी पालनतज्ञ डॉ.तुकाराम निकम यांनी केले.

सावळदे ता.शिरपुर येथील प्रगतीशिल शेतकरी सचिन राजपूत यांच्या शेतात आज झालेल्या मधमाशी पालन कार्यशाळेत ते बोलत होते.दोंडाईचा ता.शिंदखेडा येथील सपना मधमाशी पालन व प्रशिक्षण केंद्रातर्फे झालेल्या कार्यशाळेसाठी माजी आमदार बापूसाहेब रावल, प्रा.के.यु.राजपूत, के.बी.पाटील, श्री.चौधरी, जे.एम.पावरा, आय.एच.खान, अतुल राजपूत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

डॉ.निकम म्हणाले की, मधमाशी, भुंगे हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे मित्रकिटक आहेत. मात्र, रासायनिक खते, औषधांच्या बेसुमार वापरामुळे त्यांची संख्या घटली. परिणामी निसर्ग चक्रामध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

या कीटकांमार्फत होणार्‍या परागीभवनामुळे उत्पादन जलद गतीने वाढते.मधमाशी पालनातुन मधासह वाईन, प्रोपोलिससारखे बहुगुणी औषध, जागतिक बाजारपेठेत अत्यंत मौल्यवान असलेली रॉयल जेली, नैसर्गिक मेण अशी उत्पादने मिळू शकतात. पाळीव मधमाश्यांचे प्रकार, मधमाशी पालनाचे तंत्र, मधमाश्यांचे जीवनचक्र आदी बाबत त्यांनी माहिती दिली.

श्री.रावल म्हणाले की निसर्गाच्या विरोधात गेल्याने शेतीव्यवसाय संकटात सापडला. दुष्काळ हा प्रामुख्याने मानवनिर्मित आहे. जैविक शेतीत मित्र कीटक जिवंत राहतात. निसर्गाचा प्रत्येक घटक शेतीसाठी उपयोगी आहे.

शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, शेतील विशेष दर्जा मिळवण्यासाठी चळवळ उभारावी. प्रत्येकाने मधमाश्यांच्या पेटया आपल्या शेतात ठेवण्याचा प्रयत्न करा. जिव, जिवश्य, जिवनम हा निसर्ग मंत्र आहे. असे बापूसाहेब रावल यांनी सांगितले.

सचिन राजपूत यांनी शेतात मधमाशी पालनानंतर झालेल्या उत्पादन वाढीबाबत माहीती दिली. यावेळी मधमाशी पालनासंदर्भातील साहित्याचे वितरण झाले.

जयपालसिंह गिरासे यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले. सावळदे, बाबुळदे, कुरखळी, पिंप्री सह शिरपूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*