दौरा गोपनीय मग स्वागताचे ढोल का वाजले ?

0
विलास पवार,धुळे । दि.10 ।-येथील जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी दर्जाचा अधिकारी चक्क आमदाराला लाच देतांना रंगेहात सापडल्याने पंचायत राज समितीचा धुळे जिल्हा दौरा राज्यभर गाजला आहे.
यानिमित्ताने प्रशासनातील भ्रष्टाचार चव्हाटयावर आला आहे तर लाच नाकारणार्‍या पीआरसी समिती सदस्य आमदाराचा उदोउदोही तेवढाच होत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असतांनाच आ. अनिल गोटे यांनी साडेचार कोटींच्या खंडणी वसुलीचा ‘बॉम्बगोळा’ टाकून जि.प.यंत्रणेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे.
दुसरीकडे गोपनीय दौरे करणार्‍या ‘पीआरसी’च्या स्वागतासाठी ढोल-ताशे कसे वाजले आणि आमदाराला लाच देण्याची वेळ अधिकार्‍यावर का आली? यासारखे प्रश्न सामान्य माणसाला अस्वस्थ करीत आहेत.

‘पीआरसी’ समिती दौरा असला की, जि.प.,पं.स. आणि ग्रामपंचायतींची यंत्रणा नेहमीप्रमाणे ‘अलर्ट’ होते. आपल्या कारभारात कोणत्याही त्रृटी सापडू नयेत म्हणून जिल्हा स्तरापासून ग्रामपातळीपर्यंत प्रशासन कामाला झाडून कामाला लागते.

पीआरसीचा दौरा किमान आठ दिवस आधी जाहीर होतो. त्यामुळे समिती जिल्ह्यात येत असल्याची पुर्वकल्पना अधिकार्‍यांना येत असते.

दि. 5 ते 7 जुलै अशा तीन दिवसांच्या दौर्‍यावर समिती आली आणि विविध गावांना भेटीही दिल्या. 16 आमदारांचा समावेश असलेल्या या समितीत विविध पक्षांच्या आमदारांचा समावेश होता.

समितीचे अधिकार मोठे असल्याने कोणत्या क्षणी कोणावर काय कारवाई होईल, याचा भरवसा नसतो. जिल्ह्यात आलेल्या समितीने अधिकार्‍यांच्या सर्वच बैठका बंद दालनात घेतल्या.

त्यामुळे समितीला अधिकार्‍यांनी काय सांगितले आणि समितीने काय सूचना दिल्या, कोणती चर्चा केली, याची माहिती बाहेर येवू शकली नाही.

समिती जिल्ह्यात भेटी द्यायला निघते, त्यावेळी कोणत्या गावात जाईल याची पुर्वकल्पना दिलेली नसते. यावेळच्या समितीचे दौरे मात्र त्या-त्या गावांना आधीच माहित झाल्याचे दिसले.

म्हणूनच समितीच्या स्वागताचे काही ठिकाणी बॅनर लागले आणि गावांमध्ये हार-गुच्छ आणि ढोल-ताशांनी स्वागतही झाले. ‘पीआरसी’ काय तपासते आणि कोणती कारवाई करते, याची माहिती लगेच बाहेर येत नाही.

मात्र समितीचा कापडणे दौरा माध्यमांमधून गाजला. समिती सदस्य आ. हेमंत पाटील यांनी ग्रा.पं.यंत्रणा आणि अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरल्याचे वृत्त माध्यमांमधून झळकले होते.

पहिल्या दिवशी समिती भेट देते, दुसर्‍या दिवशी भेट आमदाराला लाच देतांना जि.प.चा उपमुख्य कार्यकारी पकडला जातो आणि समितीचेच सदस्य असलेले आ. अनिल गोटे जि.प. यंत्रणेवर साडेचार कोटींची खंडणी वसुलीचा ‘बॉम्बगोळा’ टाकतात, हा साराच प्रकार अचंबित करायला लावणारा आहे.

आ. हेमंत पाटील हे ज्या गावचे सुपुत्र आहेत, त्या कापडणे गावात महिनाभरापुर्वी त्यांचा गावकर्‍यांच्या वतीने जाहीर सत्कार झाला होता. त्यानंतर आपल्या जन्मगावी पीआरसी सदस्य म्हणून हेमंत पाटलांनी दिलेली भेट जशी ताशेरे ओढल्याने गाजली, तसे अधिकार्‍याला लाच देतांना रंगेहात पकडून दिल्याने हेमंत पाटील राज्यभर चर्चेत आले.

लाचलुचपत विभागाच्या कारवाईत शक्यतो तक्रारदार हे लाच देणारा आणि आरोपी लाच घेणारा असतो. येथे मात्र उलटे चित्र पहायला मिळाले.

लाच देवू पाहणार्‍याविरुध्द ‘एसीबी’कडे धाव घेण्यात आली होती. जि.प.चे डेप्युटी सीईओ तुषार माळी यांना या पदावर रुजू होवून दोन महिनेही झालेले नाहीत.

तरीही त्यांना लाच का द्यावीशी वाटली? त्यांच्यावर अशी वेळ का आली? समितीत अनेक सदस्य होते. समितीने अनेक गावांना भेटी दिल्या होत्या.

अशा कोणत्या प्रकरणामुळे तुषार माळी अडचणीत आले होते, की ज्यामुळे आमदाराला लाच द्यावीशी वाटले? तुषार माळींचा हा निर्णय स्वत:चा होता की, त्यांच्या खांद्यावर कोणी बंदूक ठेवली होती? ‘पीआरसी’च्या नावावर जि.प. यंत्रणेने कोट्यावधीची खंडणी गोळा केल्याचा गौप्यस्फोट आ. अनिल गोटे यांनी केला असेल तर दौर्‍यावर असतांनाच त्यांनी ही परिस्थिती उजेडात का नाही आणली? आ. गोटेंना वसुलीचे दर माहिती होते, कोणाकडून किती पैसे गोळा झाले आणि कोणाच्या नेतृत्वाखाली ही खंडणी गोळा झाली, याची माहिती आ. गोटेंकडे होती तर संबंधित दोषींना समितीने या प्रकारापासून वेळीच का फटकारले नाही? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आहेत.

पीआरसी समिती विधानमंडळाची एक अत्यंत महत्वाची आणि ‘ऑन दी स्पॉट’ निर्णय घेणारी यंत्रणा म्हणून ओळखली जाते.

अशा जबाबदार समितीच्या एखाद्या सदस्याला लाच देण्याचा प्रकार घडत असेल तर हा गंभीर प्रकार आहे. ‘एसीबी’ने या प्रकरणाची झाडाझडती सुरु केली आहे.

केवळ लाच देणे, घेणे आणि कोणावर तरी कारवाई होणे, इथपर्यंतच हे प्रकरण मर्यादीत नाही. यामागे नेमके कुठे पाणी मुरले आहे, याचा शोध लागला पाहिजे.

 

LEAVE A REPLY

*