पिक कर्ज घेणार्‍या सभासदांची विमा रक्कम कर्जखाती टाकणार

0
धुळे । दि.10 । प्रतिनिधी-पंतप्रधान पिकविमा योजना 2017-18 या वर्षासाठी सर्व सभासदांना सक्तीने लागू करण्यात आलेली आहे. जिल्हा बँकेमार्फत पिककर्ज घेणार्‍या सभासदांचा पिकविमा त्यांच्या कर्जखाती टाकून परस्पर विमा कंपनीस भरणा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक विविध कार्यकारी व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन, संचालक व सभासद तसेच बँकेमार्फत वैयक्तिक थेट पिककर्ज घेणार्‍या सर्व संबंधित सभासदांसाठी पंतप्रधान पिकविमा योजना 2017-18 या वर्षासाठी सक्तीने लागू करण्यात आली आहे.
जिल्हा बँकेमार्फत पिक घेणार्‍या सर्व सभासदांचा पिकविमा त्यांच्या कर्जखाती नावे टाकून परस्पर विमा कंपनीस भरणा करण्यात येणार आहे.

तसेच बिनकर्जदार सभासदांसाठी पिकविमा योजना ऐच्छिक स्वरुपात आहे. धुळे जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., मुंबई तर नंदुरबार जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे श्री.कदमबांडे यांनी सांगितले.

सदर योजनेंतर्गत विमा घ्यावयाची अंतिम मुदत 31 जुलै 2017 असून बिगर कर्जदार सभासदांनी विमा घोषणापत्रे भरुन जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेत रोख रकमेचा भरणा करुन पावती घ्यावयाची आहे.

घोषणापत्र भरतांना सातबारा उतारा, फोटो असलेल्या बँकखाते पुस्तकाची प्रत, आधार कार्ड छायांकित प्रत, आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती, किसान क्रेडिट कार्ड, मतदान ओळखपत्र असे कागदपत्र असणे आवश्यक आहे.

सदर कर्जदार शेतकरी सभासदांनी आपले आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर पूर्ण पत्त्यासह संबंधित संस्थेत अथवा बँकेत जमा करावे, असे आवाहनही श्री.कदमबांडे यांनी केले आहे.

या योजनेच्या सहभागासाठी व अधिक माहितीसाठी सभासदांनी जिल्हा बँकेच्या सर्व शाखा, नजिक विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री.कदमबांडे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*