सोनवदचे पाणी शुध्दीकरणासाठी परवडणारे नाही !

0
रामकृष्ण पाटील,कापडणे । दि.10 ।-सोनवद प्रकल्पातील बहुतांश पाणी हे धुळे परीसरातील विविध उद्योगांचे व शहरातील गटारींचे येते. यामुळे सोनवद हा जलस्रोत जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी परवडणाराच नाही.
आमच्या कालावधीतच काय तर ग्रामपंचायतीच्या आयुष्यातही या स्रोताचे पाणी शुध्द करणे शक्य नाही. या स्रोतातुन येणारे पाणी केवळ स्वच्छ होऊ शकते शुध्द नाही असे स्पष्ट मत ग्रामपंचायत सरपंच भटु पाटील व पाणीपुरवठा समितीचे सदस्य प्रमोद पाटील यांनी एसीबीच्या पथकासमोर मांडल्याचे समजते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे आज(दि.10) येथील पाणीयोजनासंदर्भात चौकशी करण्यात आली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासुन येथील जि.प.शाळांची चौकशी करण्यात येत होती. आज चौकशीचा सलग तिसरा दिवस आहे.

पदाधिकार्‍यांच्या या वक्तत्वाने हा जलस्रोत निवडण्याच्या प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह उभे केल्याचे बोलले जात आहे.
पंचायत राज समितीचे सदस्य आ.हेमंत पाटील यांना दिड लाखाची लाच देऊ पाहणार्‍या डेप्युटी सीईओला नुकतीच अटक करण्यात आली.

याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल(दि.9) व परवा (दि.8) येथे येऊन सलग दोन दिवस चौकशी केली.

यात अनुक्रमे येथील जि.प.शाळा क्र.1 व 2 च्या पोषण आहाराची चौकशी करण्यात आली. आज (दि.10) येथील ग्रा.पं.सरपंच व पाणीपुरवठा योजनेच्या सदस्यांची पाणीयोजनेसंदर्भात चौकशी झाली.

दरम्यान दि.6 रोजी पीआरसीने कापडणे येथे भेट दिली असता पाणीयोजनेच्या तक्रारी, जि.प.क्र.1 शाळेच्या पोषण आहारात घोळ तसेच ग्रा.पं.च्या दप्तरात खाडाखोड व अपुर्णता आढळल्या होत्या.

तसेच पाणीयोजनासंदर्भातही तक्रारी होत्या. या तक्रारी मॅनेज करण्याच्या उद्देशाने हा लाच देण्याचा प्रकार झाल्याचे तक्रारदार पीआरसीचे सदस्य, आ.हेमंत पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवरच तीन दिवसापासुन येथे तपास सुरु आहे. यातील कापडणे गावाचा तक्रारीत उल्लेख करणारे आ.पाटील(नांदेड मतदारसंघ) हे मुळचे कापडणे गावाचे रहिवाशी आहेत.

या लाच प्रकरणासंदर्भात डेप्युटी सीईओ तुषार माळी यांच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने हा तपास सुरु असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे. यात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक पवन देसले, पोलीस नाईक कैलास शिरसाठ, कृष्णकांत वाडीले, पो.कॉ. संतोष हिरे, प्रदीप देवरे, वाय.एन.केदार यांचा पथकाने आज(दि.10) पाणीयोजना संदर्भात चौकशी केली. येथील पाणीयोजना ही सोनवद प्रकल्पावरुन करण्यात आली आहे.

पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर या जलसाठ्यात बहुतांश वेळा धुळे शहराच्या गटारींचे व परीसरातील विविध उद्योगधंद्यांचे दुर्घंधीयुक्त पाणी वाहते.

हे पाणी केवळ स्वच्छ होऊ शकते शुध्द कधीच नाही. परीसरातील बर्‍याचशा गावांनी या स्रोताचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर करणेच बंद केले आहे असे असतांना हा जलस्रोत कापडण्यासाठी निवडणे ही गंभीर चुकच आहे.

असे स्पष्ट करत सरपंच भटु पाटील व पाणीपुरवठा योजनेचे सदस्य प्रमोद पाटील यांनी हे पाणी शक्यतो वापरायलाच देतो व पाणी गावाला देतांनाही गावात दवंडी पिटवतो असेही चौकशीत सांगितल्याचे समजते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत कापडणे पाणीयोजनेच्या जलस्रोतावरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने ही चौकशी आता काय वळण घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

 

LEAVE A REPLY

*