धुळ्यात दोन ठिकाणी घरफोडी

0
धुळे । दि.10 । प्रतिनिधी-शहरातील कल्पतरु सोसायटी व अभियंता नगरात घरफोडी झाली असून चोरट्यांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे. याबाबत चाळीसगाव रोड व पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील दसेरा मैदानाच्या मागे असलेल्या कल्पतरु सोसायटीत प्लॉट नं.11 मध्ये सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष वसंत देशपांडे हे राहतात. ते कुटुंबियांसमवेत नाशिक येथे मुलीकडे गेले होते.

त्या दरम्यान दि.8 जुलैच्या सकाळी 11 ते 9 जुलैच्या सकाळी अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरात डल्ला मारला. शेजारी राहणारे मुकुंद जोशी यांच्या लक्षात ही घटना आली.

चोरट्यांनी लोखंडी कपाट ठेवलेले दहा हजार रुपये चोरुन नेले. श्वान पथकाला बोलाविण्यात आले. श्वानने मालेगाव रोड, दसेरा मैदानपर्यंत माग काढला.

त्यामुळे चोरटे मालेगाव रोडवरुन वाहनाने पसार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात मंगला सुभाष देशपांडे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन भादंवि 454, 457, 480 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.

शहरातील देवपूर परिसरात असलेल्या अभियंता नगरात प्लॉट क्र.17 मध्ये नरेंद्र सदाशिव सोनार हे बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या टेरेसवरील बंद दरवाजा उघडून घरात प्रवेश केला व घरातून डेझर्ट कुलर, पाण्याची इलेक्ट्रीक मोटार, इन्व्हर्टर, गॅस सिलिंडर, पितळी परात, स्टीलच्या दहा कळशा, दोन हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरुन नेला.

याबाबत पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात नरेंद्र सोनार यांनी फिर्याद दिली. भादंवि 354, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणीचा विनयभंग – सोनगीर, ता.धुळे शिवारातील शेत गट नं.111 मध्ये चुलत भाऊ व चुलत बहिण यांचा वाद असलेली शेती पाहण्यासाठी गेली असताना ज्ञानेश्वर बच्छाव शिरसाठ याने विनयभंग केला.

यावेळी त्या महिलेचा भाचा वाद सोडविण्यास गेला असता त्याची शर्टची कॉलर धरुन त्यास मारहाण करुन त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून ज्ञानेश्वर शिरसाठ हा पळून गेला.

याबाबत पीडित महिलेने सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 392, 354, 333, 504 प्रमाणे ज्ञानेश्वर शिरसाठविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

गळफास घेवून आत्महत्या – साक्री शहरातील लोकमान्य नगरात राहणारा विजय नामदेव पवार (वय 49) याने दि.9 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजता भाडणे शिवारातील शेतातील पोल्ट्री फार्म असलेल्या घरात अँगलला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत साक्री पोलिस ठाण्यात चेतन दिलीप पवार यांनी माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शेतातून ट्रॅक्टर नेल्याचा वाद – शेवाळी, ता.साक्री येथे राहणारे विशाल सुकलाल भदाणे यांच्या शेतात बाजरीचे पिक पेरलेले असून त्यातून रवींद्र संतोष साळुंखे याने ट्रॅक्टर पेरलेल्या शेतातून नेत असताना त्याला विरोध केला. यातून विकास यांना मारहाण केली. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार अपघातात पाच जखमी
जळगाव-सुरत मार्गावरील मुकटी, ता.धुळे शिवारात कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, मुकटी, ता.धुळे शिवारात दि.9 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास जळगाव-सुरत महामार्गावरुन जळगावकडून धुळ्याकडे येणार्‍या कारचे टायर फुटल्याने अपघात झाला.

या अपघातात तुषार सुभाषचंद जैन (वय 18), विना राहूल शर्मा (वय 36), दर्शना खुशाल जैन (वय 27), वासू फात्तूमल दुसेजा (वय 40), राहूल जुगलकिशोर शर्मा (वय 28) हे जखमी झाले. अपघाताची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सुपर शॉपचे दुकान फोडले
शिरपूर तालुक्यातील शहादा रोडवरील बापूजी सुपर शॉप दुकानाचा पत्रा दि.9 जुलै रोजी सकाळी 9.10 वाजता अज्ञात व्यक्तीने उचकावून दुकानात प्रवेश केला व आठ हजार रुपये रोख आणि आयडीबीआय बँकेचे डेबीट कार्ड असा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात अशोक अग्रवाल यांनी फिर्याद दिली. भादंवि 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंगणे येथील तरुणीवर बलात्कार; काकासह तरुणावर गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून हिंगणे, ता.धुळे येथून तरुणीला पळवून नेवून तिच्यावर शिर्डी येथे बलात्कार केला. त्यानंतर त्या तरुणीला मारहाण करुन धुळ्यातील चाळीसगाव रोड चौफुलीवर सोडून देण्यात आले.

या प्रकरणी त्या तरुणाच्या काकासह तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, धुळे तालुक्यातील हिंगणे येथे राहणार्‍या 20 वर्षीय तरुणीला रावसाहेब सुरज मासुळे याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तु माझ्याशी लग्न केले नाही तर तुला ठार करेल, अशी धमकी दिली व दि.29 मे रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास तरुणीला घरुन मोटारसायकलवर बसवून चौगाव येथे आणले.

चौगाव येथे मोटारसायकल लावून तेथून कुसूंबा, चांदवडमार्गे शिर्डी येथे नेले. शिर्डीतील प्रभात डेअरीजवळील वस्तीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

दि.5 जुलैपर्यंत तिचा लैंगिक छळ केला आणि लग्न न करता रावसाहेब मासुळे याने त्याच्या काकाला बोलावून घेतले. त्याने नाशिक येथे टेम्पो आणला.

काकाने पीडित तरुणीला मारहाण करुन टेम्पोत बसवले व शहरातील चाळीसगाव रोड चौफुली येथे आणले व तिला भावाकडे सोडून तो पसार झाला.

यानंतर त्या तरुणीने तालुका पोलिस ठाण्यात आपबिती सांगितली. तिच्या तक्रारीवरुन रावसाहेब मासुळे व त्याचा काका यांच्याविरुध्द भादंवि 376 (2) (एन), 323, 506 सह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) (11), 3 (1) (12) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी रावसाहेब मासुळे याला अटक केली असून त्याच्या काकाचा शोध सुरु आहे, असे तालुका पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आले. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक नीलेश सोनवणे हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*