Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच धुळे मुख्य बातम्या

धुळे जिल्ह्यातून दहा मुली घेतल्या दत्तक : संजय बागूल यांची माहिती

Share

धुळे ।  प्रतिनिधी :  जिल्ह्यात 2018- 2019 या आर्थिक वर्षात तीन मुले आणि दहा मुली दत्तक घेण्यात आल्या आहेत. दत्तकेच्छुक पालक मुलींची मागणी करीत आहेत. गुणवान मुलगी ही देशाची संपत्ती आहे, असे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारीत अधिकारी तथा बेटी बचाओ- बेटी पढाओ समितीचे सदस्य सचिव संजय बागूल यांनी कळविले आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार अनाथ, निराधार, दुर्लक्षित बालकांना हक्काचे घर व कुटुंब मिळवून देण्यासाठी दत्तक प्रक्रिया राबविण्यात येते. अपत्य नसलेल्या पालकास, दत्तकेच्छुक पालकास बालक मिळते, असा दुहेरी लाभ या योजनेमुळे होतो. दत्तक प्रक्रिया केंद्रीय संस्थेमार्फत संपूर्ण देशात राबविण्यात येते. प्रत्येक राज्यात या प्रक्रियेचे नियंत्रण केले जाते. सद्य:स्थितीत राज्यात 49 संस्था या क्षेत्रात कार्यरत आहेत.

जिल्ह्यात अपंग व कुष्ठरोगी स्वावलंबन संस्था संचलित शिशुगृह, धुळे या संस्थेमार्फत ही योजना राबविण्यात येते. दत्तकेच्छुक पालकांना या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. बालक दत्तक घेवून पालकत्व स्वीकारणार्‍या कुटुंबांची संख्या वाढत असून बालक दत्तक घेण्याबाबत नागरिकांची मानसिकता सकारात्मकतेच्या दिशेने बदलत आहे, असेही श्री. बागूल यांनी सांगितले.

जिल्ह्यात बहुतांश दत्तकेच्छुक पालक हे मुलींची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी देशात 3374 बालके दत्तक देण्यात आली. त्यात 1397 मुले, तर 1977 मुली होत्या. राज्यात 695 बालके दत्तक देण्यात आली. त्यात 305 मुले व 390 मुलींचा समावेश होता

.
धुळे जिल्ह्यातून चार मुले व पाच मुली दत्तक देण्यात आल्या. या सर्व आकडेवारीतून मुलींच्या बाबतीत समाजाची मानसिकता बदलत असून मुलगा- मुलगी समान अशा भावना समाजात निर्माण होत असल्याचेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बागूल यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!