Type to search

maharashtra धुळे

‘गणवेशाविना’च शाळेचा पहिला आठवडा

Share

जिल्ह्यात 75 हजार 496 विद्यार्थी, गणवेशासाठी मागणी केलेल्या निधीची प्रतीक्षा

तर्‍हाडी ।  वार्ताहर :  जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा गेल्या सोमवारपासून सुरू झाल्या असून पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पहिल्याच दिवशी उपलब्ध झाली असली तरी सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश मात्र पहिल्या दिवशी मिळाला नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवसासोबत संपुर्ण आठवडा गणवेशाविनाच गेला. गणवेश कधी मिळणार याची निश्चितता नसल्याने पालक, शिक्षक आणि विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.

गणवेशाची रक्कम देण्यासाठी जिल्हा परिषदेला केंद्र आणि राज्य शासनाकडून अद्यापही निधी मिळालेला नाही. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील 75 हजार 496 विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला आठवडा गणवेशाविनाच घालवावा लागला आहे. यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे पाच कोटी 18 लाख 40 हजार रुपये निधीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आणि माध्यमिक शाळा 17 जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नव्याने पहिलीत दाखल होणार्‍या मुलांचेही शाळांनी जंगी स्वागत केले.

मात्र शासनाकडून गणवेशासाठी निधीच मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्यादिवशी गणवेश मिळाले नाहीत. सर्व शिक्षा विभागाकडून विद्यार्थ्यांना गणवेश दिले जात असून, याबाबत संबंधित अधिकार्‍यांना विचारले असता ते म्हणाले की, शासनाकडूनच निधी मिळाला नसल्यामुळे गणवेश वाटपाला उशीर होणार आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील 9 हजार 579 अनुसूचित जमाती प्रवर्गातील 416, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 2 हजार 997 मुले आणि 62 हजार 504 मुली असे 75 हजार 496 विद्यार्थी मोफत गणवेशासाठी पात्र आहेत. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशसाठी 600 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

शासनाकडे गणवेशासाठी पाच कोटी 18 लाख 400 हजार रुपये निधीची मागणी केली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून राज्याला हा निधी दिला जातो, मात्र केंद्राकडूनच निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जिल्हानिहाय निधी मागणीचे प्रस्ताव मागविले आहेत. निधी मिळाल्यानंतर तो पंचायत समितीकडे आणि त्यानंतर प्रत्येक शाळा समितीच्या खात्यावर वर्ग होण्यासाठी महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!