धुळेकरांवर करवाढीचा बोझा नाही!

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-धुळेकर नागरिकांवर कोणत्याही स्वरुपाची करवाढ न करता आर्थिक बोजा न पाडता उत्पन्न व खर्च यांची सांगड घालून अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली आहे. अशी माहिती महापौर सौ. कल्पना महाले यांनी दिली.
महापालिकेची महासभा महापौर कल्पना महाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी महाले या बोलत होत्या.
पुढे बोलतांना महाले म्हणाले की, प्रशासनाने विहित कालमर्यादेत अंदाजपत्रक सादर न केल्याने ते महासभेत येण्यास उशिर झाला आहे. सुधारीत अंदाजपत्रक आवश्यक त्या फेरफार करुन सप्टेंबर महिन्यात सादर करणे आवश्यक आहे. परंतू तसे झालेले नाही, यामुळे प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी केली.

अमृत योजनेत शहराचा समावेश झालेला असून त्यासाठी शासनाच्या विविध निकस व अटींमध्ये पात्र होणे गरजेचे आहे. शहरातील अक्कलपाडा ते हनुमान टेकडीपर्यंत बंदीस्त पाईपलाईन टाकणे तसेच हनुमान टेकडी येथील जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता 18 एमएलडीवरुन 48 एमएलडी करणे यासारख्या योजनांमुळे पाण्याची समस्या कमी होणार आहे.

तसेच अमृत योजनेंतर्गत भुयारी गटार योजनेच्या कामास प्राथमिक मान्यता प्राप्त झाली आहे. व अमृत योजनेंतर्गत शहरातील प्रत्येक विभागात बगीचा प्रस्तावित करण्यात येत आहे.

त्यासाठी शासनामार्फत निधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये मनपाचा हिस्सा आवश्यक असून सदर मनपा हिस्सासाठी अंदाजपत्रकात आवश्यक ती तरतूद करण्यात येणार आहे असेही महापौरांनी सांगितले.

शासनाच्या ध्येय व धोरणानुसार महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी व महिलांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी महिला व मुले यांना केंद्रस्थानी ठेवून महिला व बालकल्याण समिती अंतर्गत अंदाजपत्रकात जेडर बजेट अंतर्गत अंदाजपत्रकाच्या 5 टक्के तरतूद करण्यात येत आहे.

तसेच मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांचा सामाजिक स्तर उंचविण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्यासाठी अंदाजपत्रकात 5 टक्के तरतूद करण्यात आली आहे. तसेच अंध व अपंग नागरीकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंदाजपत्रकात तीन टक्के तरतूद करण्यात येत आहे.

वीज बिलात बचत होण्याच्या दृष्टीने शहरात एलईडी लाईट बसविण्याचा प्रस्ताव राज्यस्तरीय तथा जिल्हा स्तरीय नगरोत्थान योजनेत प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक तो मनपाचा हिस्सा अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे असे महापौरांनी सांगितले.

शहरात सुमारे 70 ते 80 हजार मालमत्ताधारक आहेत व सुमारे 35 ते 40 नळ कनेक्शन धारक आहेत. घर तेथे नळ कनेक्शन ही संकल्पना व योजना कार्यान्वित करुन अनाधिकृत नळकनेक्शन नियमित केल्यास त्याद्वारे आवश्यक ते उत्पन्न वाढ होणार आहे.

तसेच प्रशसनाने अंदाजपत्रकात फक्त घरगुती नळ कनेक्शनद्वारे मिळणारे उत्पन्न दर्शविले आहे. यात व्यावसायीक नळ कनेक्शनद्वारे मिळणार्‍या उत्पन्नाचा समावेश केलेला नाही.

घर तेथे नळ कनेक्शन ही संकल्पना व व्यावसायीक नळ कनेक्शनद्वारे मिळणारे पाणीपट्टी याचा विचार केल्यास वाढीव सुमारे दोन कोटी रुपये मात्र पाणीपट्टीद्वारे उत्पन्न येणे अपेक्षीत आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी अशी सूचनाही महाले यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*