महिला अधिकाऱ्याच्या संवेदनशिलतेमुळे वृध्दाला मिळाला आसरा

0
रामकृष्ण पाटील | कापडणे  :    धुळ्यातील मुख्य वनसंरक्षक बंगल्याच्या (पोलीस ट्रेनिंग सेंटर) बाहेरील रस्ता… रणरणत्या उन्हात बसलेले वयोवृध्द गृहस्थ… कोणीतरी थांबेल अन् दोन घासाची तसबीज करेल, या वेड्या आशेवर रस्त्याकडे डोळे लागलेले… रस्ता मात्र सुसाटचं.
मन:स्वस्थ्य हरवलेल्या या व्यक्तीस बघून एका महिला अधिकार्‍यांचं मन मात्र अस्वस्थ झालं. अन् अचानक गाडी थांबली. वृध्द बाबांची आस्थेवाईक चौकशी करुन दोन घास भरविले. आपली काळजी घेणारे कोणी नसल्याचे या वृध्द व्यक्तीकडून समजल्यानंतर सामाजिक बांधिलकी सोपासत या संवेदनशिल व्यक्तीमत्वाच्या महिला अधिकार्‍यांनी व त्यांच्या भगिनींनी स्वत: पुढाकार घेत या वृध्द व्यक्तीस नगांवच्या वृध्दाश्रमात दाखल केले.

एखादे कथानक शोभेल अशा या घटनेतील संवेदनशिल महिला अधिकारी आहेत. जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर. हर्षदा बडगुजर तसेच त्यांच्या भगिणी व मोराणेच्या समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यींनी जागृती बडगुजर यांनी हे समाजोभिमुख कार्य केले आहे. किसनदास शंकरदास इंदाणे (वाघळी ता. चाळीसगांव) या सत्तरीतील वयोवृध्द व्यक्तीला या दोन्ही भगिनींनी नगाव येथील आनंदविहार वृध्दाश्रमात दाखल करत आसरा मिळवून दिला.

धुळे येथील समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर व त्यांच्या एम.एस.डब्लू.कॉलेजला व्दितीय वर्षात शिक्षण घेणार्‍या लहान बहिण जागृती बडगुजर या दोन दिवसापुर्वी जमनागिरी रोड परिसरातून जात होत्या. पोलीस ट्रेनिंग सेंटरजवळ रस्त्याच्या कडेला एक वृध्द त्यांना हलाखीच्या परिस्थितीत बसलेले दिसले.

सामाजिक जाणीवेतून गाडी थांबवत हर्षदा बडगुजर यांनी या वृध्द व्यक्तीची आस्थेवाईक चौकशी केली. जवळ असलेले सफरचंद पुढे करत माझ्याकडे असलेली फळे खाणार का? या प्रश्नानंतर वृध्दाकडून आलेली प्रतिक्रीया त्यांची हलाखीच्या अवस्था व त्यातून त्यांची होणारी हेळसांड मांडुन गेली. या सार्‍या बाबी हर्षदा बडगुजर यांच्या संवेदनशिल मनाला अस्वस्थ करुन गेल्या.

या वृध्द व्यक्तीच्या विस्कटलेल्या जीवनाकडे समानुभूतीने पाहत, हर्षदा बडगुजर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांना आसरा द्यायचे मनाशी ठरविले.याबाबत वृध्द बाबांची चौकशी केली असता त्यांना कोणीच जवळचे नातेवाईक नसल्याचे कळले. वृध्दाश्रमात राहाल का? या बडगुजर यांच्या प्रश्नावर त्यांनी सहमती दर्शवली. परंतू त्यासाठी आपल्याकडे कोणतेच कागदपत्रे नसल्याची असमर्थतता व्यक्त केली.

यावर समाज कल्याण अधिकारी हर्षदा यांनी जागेवरच तोडगा काढला. नगांव येथील आनंद विहार वृध्दांश्रमाचे अध्यक्ष शशिकांत भदाणे व प्रकल्प संचालक राजेंद्र नेरकर यांच्याशी या वृध्द व्यक्तीस आसरा देण्यासंदर्भात संपर्क साधला. त्यांनीही लगेच संमती दर्शविली. हर्षदा बडगुजर व त्यांच्या भगिणी यांनी या वृध्द बाबांना लगेच या वृध्दाश्रमात दाखल केले. काही वेळ त्यांनी वृध्दांश्रमातील वृध्द आजी-बाबांसोबत घालवत, किसनदास इंदाणे बाबा हे नविन असल्याने त्यांना सांभाळुन घ्या अशी विनंतीही केली.

यावेळी ही बडगुजर भगिणींची ही मानवी संवेदनशिलता पाहून सर्व उपस्थित भारावून गेले. त्यांच्या या संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीने समाजासमोर आदर्श असा वस्तूपाठ घालून दिला.

वृध्द आजोबांच्या नशिबी विस्कटलेलं जीवन

रस्त्याने जातांना अतिशय हलाखीच्या परिस्थितीत हे वृध्द आजोबा दिसले.  हवालदिल मनस्थितीतील या आजोबांची आस्थेवाईक चौकशी केली असता त्यांच्या जीवनातील अतीव दु:ख्य समजले. या वृध्द व्यक्तीचे नाव किसनदास शंकरदास इंदाणे (वाघळी ता. चाळीसगांव), वय 70 वर्ष. एक मुलगा आठ वर्षाचा असतांनाच हे जग सोडुन गेला, दुसर्‍या एकुलता एक तरुण मुलाचे वयाच्या 29 वर्षी निधन झाले.

गेल्या 22 वर्षापूर्वी सहचारीनेही जीवनाची साथ सोडली व तीनेही निरोप घेतला. इंदाणे आजोबांनी जवळचे कोणी नातेवाईक नसल्याने गाव सोडले आणि तेव्हापासून ते विमनस्क मनस्थितीत फिरतात असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांच्या बोलण्यातून विस्मरण, वयामुळे थकलेपण, जीवन जगण्याची सोडलेली उमेद वेळोवेळी जाणवत होती. त्यांना नगांवच्या वृध्दाश्रमात दाखल करण्यात आले आहे. ही सर्व घटना हाताळतांना पाहिलेल्या दु:ख्याने आम्ही दोन्ही बहिणी फार भावुक व अस्वस्थ झालो.
-हर्षदा बडगुजर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी,धुळे.

LEAVE A REPLY

*