Type to search

धुळे

चोंदी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

Share

बोराडी । दि.20 । वार्ताहर :  गेल्या सहा वर्षांपासून फेब्रुवारी महिना आला की चोंदी गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकती करावी लागते. परंतू यंदा गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत जानेवारी महिन्यापासूनच पाणी कमी झाले होते. आता तर विहिरीने तळच गाठला आहे. गावातील हातपंप बंद, पाण्याची टाकी असून पाण्याअभावी काहीच कामाची नाही. पाण्याची पातळी खोलवर असल्याने बोअरवेल देखील कोरडे आहेत. गावापासून एक कि.मी. अंतरावरील एका विहिरीतून गावाला एक ते दोन दिवसानंतर पाणी मिळते. पण काही वेळेस 12 ते 14 तासाच्या भारनियमनामुळे ग्रामस्थांना वेळेवर पाणी मिळत नाही. म्हणून चोंदी गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.

बोराडी-सांगवी रस्त्यावर चोंदी गाव आहे. चोंदी हे गाव टेंभेपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येते. सुमारे 1500 ते 1700 लोकवस्तीचे हे गाव आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून या गावाला अधिक पाणीटंचाई सामोरे जावे लागत असते. दरवर्षी फेब्रुवारी महिण्यापासून ग्रामस्थांसह महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.


चोंदी गावाजवळील अर्धा कि.मी अंतरावरील नाला देखील कोरडा पडला आहे. या नाल्यास बोराडीच्या काळयापाण्या धरणातील पाणी येते. परंतू आता धरणातच पाणी नसल्याने नाला कोरडा झाला आहे. त्यातील डबक्यांमधील पाण्यात महिला कपडे, आंघोळ करीत असल्याचे सांगितले जाते.

गावातील जनावरांना सुध्दा पाणीकरीता भटकंती करावी लागते. काही वेळेस जेथून महिला पाणी आणतात त्याच डबक्यातून जनावरे पाणी पितात. त्यामुळे रोगराई पसण्याची सुध्दा भीती व्यक्त केली जात आहे.गावातील व परिसरातील जवळपास असलेले पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहेत. गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतची विहीर देखील फेब्रुवारीमध्येच कोरडी पडली. त्यामुळे जवळपास पाण्यासाठी गावकरी परिसरातील दोन ते तीन कि.मी.वरुन पाणी आणावे लागत आहे.

गेल्या तीन वर्षांपूर्वी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी स्वखर्चाने चोंदी गावाजवळ बोरविहिर करून दिले होते. पंरतू पाणी कमी प्रमाणात लागले होते. तरी देखील त्यांनी खारीपाडा येथील दौलत पावरा यांच्या विहिरीतून चोंदी गावाला पाणी मिळवून दिले होते. यासाठी त्यांनी खारीपाडा ते चोंदी ग्रामपंचायतीच्या विहिरीपर्यंत स्वखर्चाने पाईपलाईन करून दिली होती. आज देखील त्याच पाईपलाईने चोंदी ग्रामस्थांना पाणी मिळत आहे.

या विहिरीला देखील या वर्षी पाणी कमी असल्यामुळे दोन ते तीन दिवसांनी पाणी मिळत आहे. पण तेही पंधरा ते विस मिनिटे चालते. पाण्याचे प्रमाण कमी असल्याने गावातील इतर भागात पाणी पोहचत नाही, म्हणून ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गावातील जनावरांना चारा व पाण्यासाठी सतत भटकंती करावी लागत आहे. जनावरांना पाण्यासाठी बोराडीच्या काळापाणी धरणावर दोन ते तीन कि.मी.पर्यंत घेवून जावे लागते. या दुष्काळात चाराटंचाई व पाणीटंचाईमुळे गुरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

चोंदी गावाला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन्-2017-18 मध्ये कृती आराखडयात गावाचा समावेश करण्यात आला होता. शासनाने आराखडयास मान्यता दिली असून नळ पाणीपुरवठा योजनेचे अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देणेबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत असल्याचे सूचित केले आहे. मात्र प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कुठलीच योजना या गावात कार्यान्वित झालेली नाही.

पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री पेयजल सारख्या इतर योजनाही कार्यान्वित असून देखील गावाला पिण्यासाठी पाणी मिळत नाही. दरवर्षी पाणीपट्टी नियमित भरून देखील पाण्याची सोय होत नसल्याने पाण्याअभावी गावकर्‍यांबरोबरच मुक्या प्राण्यांचेही प्रचंड हाल होत असल्याने दिसून येत आहे. शासनाने चोंदी गावातील पाणीटंचाई लवकर दुर करून कायमस्वरूपी पाणी पुरवठा मिळण्यासाठी नवीन योजनेची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

यंदा भीषण पाणीटंचाई

चोंदी गावाला दरवर्षी जानेवारी महिन्यात पाणीटंचाई भासू लागते. परंतू या वर्षी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी शासनाने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून गावाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. तसेच गावासह परिसरातील गुरांसाठी चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही. यामुळे गुराचे हाल होत आहे. शासनाने गुरांसाठी चारा छावणी उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-अण्णा धरमसिंग पावरा-चोंदी,
ग्रामपंचायत सदस्य, टेंभेपाडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!