मंदाणेनजीक मोटारसायकलींची धडक : सीआरपीएफच्या जवानासह तिघे ठार

0

शहादा | ता.प्र. :  तालुक्यातील मंदाणे येथून जवळच असलेल्या मध्यप्रदेश सीमेलगत पानसेमल मार्गावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर जबरदस्त धडक बसून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली.

मयतांपैकी दोन युवक जावदेतर्फे हवेली येथील असून त्यात एक सीआरपीएफचा जवान आहे. तिसरा मयत हा कान्सूल (मध्यप्रदेश) येथील इसम आहे. जखमी युवकही जावदा येथील आहे.

या घटनेने जावदा व कान्सुल येथे हळहळ व्यक्त होत असून मयतांवर  शुक्रवारी दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताबाबत पानसेमल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील जावदातर्फे हवेली येथील सीआरपीएफचा जवान जगदिश दिलीप बिरारे (वय २९) हा सध्या गावाकडे सुटीवर आलेला होता. दोन दिवसापुर्वीच त्याचे एटीएम असलेले पाकिट कुठेतरी हरवले होते.

याबाबत एटीएम कुणाच्या हाती लागून त्याचा गैरवापर टाळण्यासाठी तो लॉक करण्यासाठी जगदिश गुरूवारी सायंकाळी आपले मित्र मुकेश राजू साळवे (१९) व चेतन युवराज अहिरे (१६) यांना मोटारसायकलने सोबत घेवून म्हसावद पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते.

तेथून ते खेतीयामार्गे पानसेमलला आले व रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पानसेमलहून जावदा येथे घरी जाण्यासाठी तिघे जण निघाले. त्यावेळी ट्रॅक्टर शोरूमसमोर येणार्‍या मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक बसली.

या अपघातात जावदा येथील जवान जगदिश दिलीप बिरारे व मुकेश राजु साळवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागेवरच ठार झाले तर त्यांच्या सोबत असलेला तिसरा तरूण चेतन युवराज महिरे हा गंभीर जखमी झाला. खेतीयाकडून येणारे दुसरे मोटरसायकलस्वार विक्रम जामसिंग ठाकरे (४०) रा.कान्सुल हेही जागीच ठार झाले.

घटना घडल्यानंतर १०८ रूग्णवाहिका जात असतांना अपघात झाल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्यांनी पानसेमलचे पोलीस निरीक्षक पी.एस.डामोर यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे वृत्त कळताच त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी पानसेमल शासकीय रूग्णालयात दाखल केले.

जखमी युवकालाही रूग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मयत जवान जगदिश बिरारे यांच्याकडील मोबाईल वरून बाहेर संपर्क केल्यावर दोघे मयत व जखमी युवक हे जावदेतर्फे हवेली (ता.शहादा) येथील असल्याची ओळख पटली.

जावदे गावात हळहळ

अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघे तरूण व जखमी युवक हे जावदा येथील असल्याचे कळताच गावात शोककळा पसरली. घटना घडल्याचे वृत्त गावात धडकताच ग्रामस्थांनी नातेवाईकांनी घटना स्थळीकडे धाव घेतली. जखमी युवकाला गंभीर अवस्थेत पानसेमल येथे प्राथमिक उपचार करून शहादा येथे एका खाजगी रूग्णायात दाखल करण्यात आले आहे.

शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार

अपघातात मृत्यू झालेल्या सीआरपीएफचा जवान जगदिश बिरारे व मुकेश साळवे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर दोन्ही मृतदेह जावदे येथील त्यांच्या घरी आणण्यात आले. त्यांच्या कुटूंबियांनी हंबरडा फोडला. अत्यंत शोकाकूल वातारणात अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग नातेवाईक व गावकर्‍यांवर आल्याने गाव सुन्न झाले आहे.

दरम्यान, मयत जवान जगदीश बिरारे हे सीआरपीएफचे जवान असतांनाही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाही. त्यांच्या अंत्ययात्रेला कोणतेही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते.

या अपघातात मृत्यूमुखी झालेल्या जगदिश बिरारे हा अत्यंत सामान्य कुटूंबातील होता. २०११ पासून सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स मध्ये तो जवान म्हणून कार्यरत होता. सध्या छत्तीसगडमधील दंतवाडा येथे नेमणुकीस असतांना एक महिन्याची सुटी घेवून तो घरी आला होता.

वडील आजारी असल्याने त्याने त्यांच्या उपचारासाठी सुटी वाढवली होती. दोन दिवसापुर्वीच तो डयुटीवर हजर होणार होता, परंतु एटीएम हरविल्याने त्याला जाण्यास विलंब झाला.

त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, पत्नी व आठ महिन्याची मुलगी दिशा असा परिवार आहे. एका मनमिळावू हुशार देशसेवक हरपल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.

दुसरा मयत मुकेश साळवे हा मंदाणे आदर्श विद्यालयात १२ वी सायन्सला होता. तो नुकताच ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याच्या पश्‍चात वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.

तर मध्यप्रदेशातील कान्सुल येथील मयत विक्रमसिंग ठाकरे हे मजूरी करीत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व लहान चार मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मीत निधनामुळे कान्सुल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघात प्रकरणी पानसेमल पोलीस ठाण्यात दोन्ही मोटरसायकलस्वारांच्या नातेवाईकांनी परस्परांविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पी.एस.डामोद यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एम.एस.चव्हाण करीत आहेत.

LEAVE A REPLY

*