ठेकेदाराविरुद्धच्या तक्रारींसाठी नोडल अधिकार्‍याची नियुक्ती : धुळे महापौर कल्पना महाले

0
धुळे | | प्रतिनिधी :  वारंवार निर्माण होणार्‍या अडचणी व ठेकेदार विरुध्दच्या तक्रारींवर समन्वय ठेवण्यात मजिप्रा मार्फत नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर सौ.कल्पना महाले यांनी दिली.

शहरात पाणीपुरवठा योजना अंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मजिप्रा व मनपाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक महापौर सौ.महाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

शहरात युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. सदर योजनेंतर्गत सुरु असलेले सद्य:स्थितीतील कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

मोहाडी, चक्करबर्डी येथील जलकुंभाचे आरसीसी काम पूर्णत्वास आले असून नेहरु नगर जलकुंभाचे खोदकाम पूर्ण झाले आहे. रामनगर जलकुंभाच्या तिसर्‍या ब्रेसचे काम पूर्ण झालेले असून शांतीनाथ नगर येथील जलकुंभाचे दुसर्‍या ब्रेसपर्यंत कॉलमचे काम प्रगतीपथावर आहे.

प्रियदर्शनी नगर येथील जलकुंभाची जागा निश्‍चित करण्यात आलेली असून भगवती नगर जलकुंभाच्या कामाबाबत कार्यादेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. नगाव बारी येथील संतुलीत जलकुंभाचे ब्रेस बिमपर्यंतचे काम पूर्णत्वास आले आहे. या सर्व जलकुंभांचे काम आठ महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

शहरात टाकण्यात आलेल्या पाईप लाईन जोडण्याचे काम तातडीने करण्यात येत असून सद्य:स्थितीत जोडण्यात न येणार्‍या पाईपला कॅप लावून बंद करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. यापूर्वी टाकण्यात आलेल्या ४५ कि.मी.लांबीच्या पाईप लाईनचे मोजमाप पूर्ण झाले असून उर्वरित मोजमाप तातडीने करण्यात यावे, अशी सूचना महापौरांनी दिली.

वारंवार निर्माण होणार्‍या अडचणी व ठेकेदार विरुध्दच्या तक्रारी यावर समन्वय ठेवण्यासाठी मजिप्रातर्फे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून नगरसेवकांच्या तक्रारीबाबत संबंधित ओवरसियर यांनी एकत्रित अहवाल महापौरांकडे सादर करावा. कामाची गुणवत्ता राखावी व गतीने काम करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

या बैठकीला आयुक्त सुधाकर देशमुख, स्थायी सभापती कैलास चौधरी, चंद्रकांत सोनार, कार्यकारी अभियंता निकम, उपायुक्त रवींद्र जाधव, उपअभियंता सूर्यवंशी, अभियंता कैलास शिंदे, शाखा अभियंता राठोड, श्री.भोई आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*