‘योग पंढरी’… ‘योग आषाढी’

0

२१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा झाला. महाराष्ट्रात आणि विशेषत: आपल्या धुळ्यात योग दिनाचा सोहळा दृष्ट लागावी एवढा सुंदर झाला.

धुळ्यातील सर्व योग व अध्यात्माशी जोडलेल्या संस्था एकत्र आल्या आणि सध्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंसह आमदार, महापौर, विविध पक्षांचे प्रमुख व लोकसेवकांसह शासनाचे उच्च अधिकारी हजारो नागरिकांसह उपस्थित होते.

अतिशय शिस्तबध्द व शासन निर्देशित योगाध्यास (प्रोटोकॉल) आसने, प्राणायाम व ध्यानाचा अभ्यास पतंजलीचे योग प्रशिक्षक राजेंद्र निकुंभ व अविनाश धर्माधिकारी यांनी सगळ्यांकडून करुन घेतला.असा भव्य-दिव्य कार्यक्रम महाराष्ट्रात फक्त धुळ्यातच घडू शकला.

एकूणच या पार्श्‍वभूमीवर व धुळ्याची योग परंपरा बघता धुळ्याला योगाची पंढरी म्हटले तर वावगे ठरणार नाही आणि अर्थातच २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन असल्याने त्याला जागतिक महत्त्व आहे. पंढरीच्या विठोबाप्रमाणेच ‘योग’ सुध्दा कोणताही जातीभेद न करता जो त्याची मनोभावे पूजा करेल त्याला सुखी, समृध्द व निरोगी आयुष्य प्राप्त करुन देतो.

त्यामुळे २१ जूनला योगाच्या विठोबाची ‘आषाढी एकादशी’ म्हटले तरी वावगे ठरु नये. सगळे योगसाधरक, योगशिक्षक व योगप्रेमी हे त्या योग पंढरीचे वारकरी आहेत. त्यांचे जत्थेच्या जत्थे २१ जूनला मंगलमय प्रभाती विविध मैदानात एकत्र येवून योगाभ्यास व प्रार्थना करीत योग विठोबाचे अनन्य भावाने दर्शन घेतात

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त योगसंध्या पतंजली योग समिती व स्वामी रामदेवजी महाराजांच्या पाचही संघटनांनी यंदाही २१ जूनला योगदिनाचा कार्यक्रम राज्य राखीव पोलिस दलाच्या एसआरपी मैदान, साक्रीरोड बायपास, साक्रीरोड येथे सकाळी सात ते ८.३० वाजेदरम्यान साजरा करीत आहे.

योगदिनाचा हा एवढा उदो उदो कशासाठी? असेही काही लोकांना वाटू शकते. यामागे शासनाचा काही छुपा अजेंडा तर नाही ना? असेही तर्क-वितर्क लढवले जातात. तथापि, या सर्व निरर्थक चर्चा आहेत, असे योगाचा अभ्यासक म्हणून मी खात्रीने सांगू शकतो.

मघाशीच म्हटल्याप्रमाणे योग सार्वभौम कसा हे मी स्पष्ट करु इच्छितो. ज्यावेळी आपण आजारी पडतो, त्यावेळी तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला औषधी, गोळ्या लिहून देतात. ती औषधी प्रत्येकाच्या शरीरावर सारखाच परिणाम करतात. हा परिणाम साधताना ही औषधी त्या आजारी देहाचा, शरीराचा भेदभाव करीत नाहीत.

तो देह हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्‍चन धर्माच्या व्यक्तीचा आहे, असा भेदभावही गोळ्या-औषधी करीत नाही. तसेच एरवी योग दर्शनासह वैदीक धर्मात उल्लेख असलेल्या योगाला परंपरागत हिंदू धर्म तत्वज्ञान किंवा भारतीय अध्यात्मिक शास्त्र म्हणून त्यापासून विनाकारण दूर राहाणार्‍या काही अन्य धर्मीय किंवा तथाकथित पुढारलेल्या लोकांनाही आता लक्षात येवू लागले आहे की, योग हे शरीर, मनाचे शास्त्र आहे.

अगदी आधुनिक वैद्यकीय शास्त्र आहे ना, अगदी तसेच. ठराविक योग प्रक्रियेचा अभ्यास केल्यास शरीर, मनावर ठराविक योग परिणाम होतो हे आता शास्त्राने सिध्द केले आहे. या पलिकडे जावून माणसाच्या आनंदाचे गमक हे त्याच्या आत्मिक सुख, समाधानात असते. हा विषय आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या पलिकडचा आहे.

योग दर्शनात याविषयी सखोल माहिती दिलेली आहे व हीच काळाची गरज आहे. आज माणसाकडे सगळे काही आहे, पण तरीही तो समाधानी नाही. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात तर पुढची पिढी ही वैफल्यग्रस्त निघेल, अशी धोक्याची सूचनाही अभ्यासक देतात आणि या सगळ्या परिस्थितीत जागतिक शांततेचे समाधान, उत्तर हे फक्त योगात आहे हे हळुहळु मान्य होवू लागले आहे.

म्हणूनच तर कधी नव्हे ते जागतिक संघटना ‘युनो‘ मध्ये सुमारे १७५ देशांनी कोणत्याही विशेष चर्चेशिवाय २१ जून योग दिनाला आंतरराष्ट्रीय योगदिन घोषित केले. यातच योगाचे महत्त्व अधोरिखीत होते.भारत सरकारने आता योगाबरोबरच आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिध्द अशा भारतीय आरोग्य शाखा व ज्ञानाला चालना देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाचीच स्थापना केली. श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वात ‘आयुष’ मंत्रालय गेल्या दोन वर्षात अतिशय समाधानकारक कामगिरी करीत आहे.

विशेषत: योगक्षेत्रात कार्य करणार्‍या भारतातील मोठमोठ्या योगसंस्थेमध्ये योगाभ्यास, आसने, प्राणायाम, ध्यान प्रक्रिया, शुध्दीक्रिया, मुद्रा, अध्यात्म आदी अनेक विषयांत एकसूत्रता नाही आहे. प्रत्येकाची शिकविण्याची व ज्ञानाची पध्दत वेगळी आहे. त्यामुळे काहीवेळा एका परंपरेत योग शिकलेला योगसाधक दुसर्‍या परंपरेकडे योग्य दृष्टिकोनातून बघेलच असे नाही.

शिवाय श्रेष्ठ, कनिष्ठ असा भेदही निर्माण होवू लागतो. हा सगळा भेद नष्ट करु योगात आधुनिक शास्त्राप्रमाणे एकसूत्रता, शिस्तबध्दता, संशोधन व विकास व्हावा, यासाठी आयुष मंत्रालय योग्य पाऊले उचलत आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या सहकार्याने घेण्यात येणार्‍या योगाच्या परीक्षा व योगशिक्षकांना प्रमाणीत करण्याचे काम सुरु झाले आहे.

योगाचे भविष्य आणि योगाच्या निमित्ताने संपूर्ण जगाचे भविष्य अतिशय सुरक्षित आहे, असे या निमित्ताने सांगावेसे वाटते.म्हणून योगदिनाचे औचित्य साधून आपण सगळ्यांनी दैनंदिन जीवनात योगाभ्यास सुरु करावा व आपल्या जीवनात घडणारे आमुलाग्र बदल बघावे.

आजारी पडायचे नसेल किंवा छोट्या-मोठ्या आरोग्याच्या समस्या सहज आणि कोणत्याही औषधींविना घालवायच्या असतील तर हा प्रयोग करुन बघायला हरकत नाही. पुढे आत्मिक सुखाचा लाभ आणि कैवल्याच्या प्राप्तीकडे आपोआप मन धाव घेईल यात तिळमात्र शंका नाही.

राजेंद्र निकुंभ
जिल्हा प्रभारी, पतंजली योग संस्था,
धुळे मो. नं. ७५८८३१८७७७

LEAVE A REPLY

*