Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच धुळे मुख्य बातम्या

मनरेगाच्या कामांना गती द्या !

Share
धुळे । प्रतिनिधी :  दुष्काळनिवारणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला. प्रशासनानेही मनरेगाच्या कामांची मागणी येताच त्याला विनाविलंब तीन दिवसाच्या आत मान्यता द्यावी, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांना दिल्या.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज ऑडीओ ब्रीज सिस्टमद्वारे धुळे जिल्ह्यातील सुमारे 45 सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांचाही सहभाग होता.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल, त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

गावांची 2018 ची लोकसंख्या व जनावरांची संख्या लक्षात घेवून आवश्यक अतिरिक्त टँकर व जनावरांना मागणीनुसार तात्काळ चारा उपलब्ध करुन द्यावा. बंद पडलेल्या योजनाही विशेष दुरुस्ती योजनेमधून सुरु करुन गावकर्‍यांना टंचाईच्या काळात तातडीचा दिलासा देता येईल, मागणी येताच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी विनाविलंब असे प्रस्ताव मान्य करावेत, जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तक्रारींची नोंद घेऊन कार्यवाही करावी व तसा अहवाल आपणास सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिल्या.

पहिले प्राधान्य पिण्याच्या पाण्याला

जिल्ह्यांमधील पाणीसाठे हे प्रथमत: पिण्याच्या पाण्यासाठी आहेत. त्यामुळे कोणी बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा करत असेल तर त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या. पिण्याच्या पाण्यासाठी निधी तसेच आवश्यक तेथे बोअरवेलची संख्या वाढविण्यात यावी. जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे आणि आवश्यकतेनुसार जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, टंचाईनिवारणाच्या तातडीच्या उपाययोजनांवर 48 तासांच्या आत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

धुळे जिल्ह्यांतील मधुकर पाटील, वालचंद पवार, विलास शिंदे, गुलाब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, मीराबाई पाटील, योगेश पाटील, महादू राजपूत, बाळासाहेब रावल आदी सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी मोबाईलवरुन थेट संवाद साधला.
यावेळी मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, पदुम विभागाचे सचिव अनुपकुमार, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिंदखेडा तालुक्यात सर्वात जास्त 16 टँकर सुरु असून साक्री तालुक्यात सर्वात कमी चार टँकर सुरु आहेत. पिण्याच्या पाण्याचा टंचाई निवारणार्थ आजअखेर धुळे जिल्ह्यातील एका नळपाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती करुन नऊ तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन 145 विहिरीचे अधिग्रहण करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.

पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची3.36 कोटी इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे. सर्व नळ पाणीपुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यांतील दुष्काळ घोषित केलेल्या तीन तालुक्यातील 451 गावातील एक लाख 55 हजार 628 इतक्या शेतकर्‍यांना 122.11 कोटी इतकी रक्कम वाटप करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 29 हजार 247 शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी 6.44 कोटी अदा करण्यात येणार असून त्यापैकी 6.40 कोटी इतकी रक्कम 7 हजार 181 शेतकर्‍यांना अदा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यातील 1.90 लक्ष शेतकर्‍यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 46 हजार शेतकर्‍यांना 2000 रूपये प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण 9.20 कोटी इतके अर्थसहाय देण्यात आले आहे. उर्वरित शेतकर्‍यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यात एक हजार 733 कामे सुरु असून त्यावर चार हजार 109 मजूर उपस्थिती आहे. सर्वात जास्त 1 हजार 379 मजूर सिंदखेडा तालुक्यात असून सर्वात कमी 664 मजूर उपस्थिती साक्री तालुक्यात आहे. जिल्ह्यामध्ये 13 हजार 899 कामे शेल्फवर आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!