अखेर शेतकर्‍यांना पीक विमा मंजूर

0
धुळे । तालुक्यातल्या लामकानी महसूली विभागातील खरीप हंगाम 2016-17 च्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेपासून 343 शेतकरी वंचित झाले होते.

कापूस पिकासाठी शेतकर्‍यांनी 8 लाख 51 हजार 958 रुपयांचा विमाहप्ता भरुनही शेतकर्‍यांना मिळणार्‍या पिक विम्याचा 56 लाख 22 हजार 67 रुपये लाभ बुडविल्याने माजी आ. प्रा.शरद पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर रिलायन्स विमा कंपनीला शेतकर्‍यांपुढे झुकावे लागले.

शेतकर्‍यांना पिक विमा मंजूर झाला आहे. सदर पिक विम्याची रक्कम 343 शेतकर्‍यांच्या खात्यावर एका हप्त्याच्या आत जमा होणार असल्याची माहिती प्रा.शरद पाटील यांनी दिली.

राज्यात 2016 च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. सदर पीकविमा योजनेचा हप्ता शेतकर्‍यांना बँकांकडून वितरित केल्या जाणार्‍या कर्जाबरोबरच जून, जुलैमध्ये वसूल करण्यात येतो. तालुक्यातील लामकानी महसूल क्षेत्रातील चिंचवार, लामकानी, बोरीस, सैताळे, वडणे, निकुंभे, रामी, बेहेड या 8 गावातील 343 शेतकर्‍यांनी बोरीस सेंट्रल बँकेच्या माध्यमातून कापूस पिकासाठी खरीप हंगाम 2016-17 साठी विमा काढला होता.

या विम्यासाठी शेतकर्‍यांच्या कर्जातून आगाऊ कपात करुन सेंट्रल बँकेने 8 लाख 51 हजार 958 रुपये रिलायन्स कंपनीला डिमांड ड्राफ्ट क्रमांक 004738 अन्वये अदा केलेला असतांनाही रिलायन्स विमा कंपनीने सदर विमा प्रकरण मंजूर करताना जाणीवपुर्वक तांत्रिक चुका ठेवून विमा नाकारला होता.

सेंट्रल बँकेचे तत्कालीन शाखा मॅनेजर श्री.मेहरा, श्री.राजपूत, कृषी अधिकारी निशांत सिन्हा यांनी शेतकर्‍यांकडून विम्याचा हप्ता घेऊन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे धुळे शाखेच्या खात्यावर जमा केले होते. मात्र सदर पैसे जमा करतांना शेतकर्‍यांची स्वतंत्र यादी न दिल्याचे तांत्रिक कारण पुढे करत रिलायन्स विमा कंपनीचे योगीराज यांनी विमा नाकारलाच्या पत्र बँकेला पाठविले होते. सदर बाब काही शेतकर्‍यांच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रा.शरद पाटील यांच्याशी संपर्क साधून न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले होते.

त्यानंतर शेतकर्‍यांनी बँक व विमा कंपनीकडे धाव घेतली असता उडवाउडवीची उत्तरे दिलीत. सर्व वंचित शेतकर्‍यांनी माजी आ. प्रा.शरद पाटील यांची भेट घेवून सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे सुपुर्द केली. सेंट्रल बँक, रिलायन्स विमा कंपनी व जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने सदर प्रकरण गांभीर्याने न घेतल्यामुळे प्रा.शरद पाटील यांनी संबंदितांवर दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रा.शरद पाटील व शेतकर्‍यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे रिलायन्स विमा कंपनीला झुकावे लागले. त्यांनी स्वत:ची चूक सावरत 56 लाख 22 हजार 67 रुपये मोबदला मंजूर करुन धनादेश क्र.540465 अन्वये आज दि.15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सेंट्रल बँकेकडे सुपुर्द केला आहे.

याबाबत शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. याबाबत जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्यासह सेंट्रल बँकेचे मॅनेजर एस.डी.निकुंभे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेतकर्‍यांच्या वतीने परशुराम देवरे, व सुनिल बोरसे(बोरीस), आधारसिंग गिरासे, जगतसिंग गिरासे (रामी), अशिष अग्रवाल, निंबा चौधरी, शकुर पटेल (चिंचवार), व्ही.सी.पाटील, गुलाब धनगर, सरपंच धनंजय कुवर (लामकानी), राजारामबापू पाटील (सैताळे), हंसराज शिंदे, रजेसिंग गिरासे, रुपसिंग गिरासे (वडणे), अभिलाल पाटील (निकुंभे), विठ्ठल कोळी (बेहेड), सरपंच सुनिल दादू गोयकर (नवे कोठरे) आदी शेतकर्‍यांनी न्यायलयीन प्रस्ताव तयार करण्यास सहकार्य केले.

LEAVE A REPLY

*