स्वच्छतेसंदर्भात देशात ३ऱ्या क्रमांकावर आहे शिरपूरची ऑनलाईन ॲप प्रणाली.

0
शिरपूर |  प्रतिनिधी :  संपूर्ण भारतात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मिशन यशस्वीपणे राबविण्याचे काम सर्वत्र सुरु आहे. या मिशन मध्ये शिरपूर शहराने देशभरातून ऑनलाईन तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता पाटील, सर्व अधिकारी, कर्मचारी सक्रीयतेने व यशस्वीरीत्या योगदान देत आहेत.

शहरात स्वच्छता मूल्यमापन समिती गेल्या चार दिवसांपासून दाखल झाली असून कागदपत्रे तपासणी नंतर प्रत्यक्षात शौचालये, मुतार्‍या, रस्ते, विविध योजनांतर्गत कामांची पाहणी करून लगेचच शासनाला त्याच ठिकाणाहून फोटोसह अहवाल अपलोड करीत आहेत.

शिरपूरात केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेचे सर्वच निकष आधीच पूर्ण केले असून सर्वत्र सुंदर व मजबूत रस्ते, २४ तास पिण्याच्या पाण्याची योजना, भूमिगत गटार योजना, संपूर्ण शहरात एल.ई.डी. लाईट, सुंदर बगीचे, वॉटर पार्क, १ लाखापेक्षा जास्त लिंबाची झाडे, गोरगरीब व गरजूंसह सर्वांसाठी आरोग्यासाठी नगर परिषदेचे अत्याधुनिक इंदिरा गांधी हॉस्पिटल व अनेक सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध असून या सर्व ठिकाणी भेटी देऊन पाहणी करून स्वच्छता मोहीम समिती मूल्यमापनाचे काम करीत आहे.

सर्व प्रभागांमध्ये स्वेच्छेने रंगरंगोटी, रस्ते स्वच्छ व त्यांवर दोन्ही बाजूने पिवळे पट्टे मारण्यात आले असून प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली आहे. केंद्र शासनाने भव्य स्वरूपात बक्षिस योजना आखली असून महाराष्ट्र शासनाने देखील कोट्यवधींची बक्षिस योजना आहे. यातच शासनाने वॉर्ड स्पर्धा निर्माण करून नगरसेवक यांना देखील या मोहिमेत समाविष्ट केले आहे.

अस्वच्छतेस जबाबदार असलेल्या मंडळींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे देखील निर्देश दिल्याने शासनाने नगर परिषदांना स्वच्छतेसाठी अनेक अधिकार बहाल केले आहेत.यापूर्वी शिरपूर नगर परिषदेला शासनाचे अनेक बक्षिसे मिळाल्याने आताही कोणत्याही परिस्थितीत देशात बक्षिस पटकवायचा चंग सर्वांनी बांधला आहे. शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने ऑनलाईन ऍप्स प्रणाली द्वारे संपूर्ण भारतातून तृतीय क्रमांक पटकावला असून देशभरातून लाखो शहरातून मान मिळणे हि शिरपूरकरांच्या दृष्टीने फार अभिमानाची आहे.

शिरपूर नगर परिषदेच्या स्वच्छता मोहीम संदर्भात समिती आली असून कागदोपत्री सर्व पाहणी केली. त्यानंतर शहरातली स्वच्छता, नगरपरिषदेने राबविलेल्या विविध योजना तसेच नागरिकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधून सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरु आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शिरपूर शहरात आतापर्यंत विविध उपक्रम हाती घेण्यात आले.

स्वच्छ शिरपूर, सुंदर शिरपूर हा नारा देत शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली. नगरपरिषदेच्या घंटागाड्या प्रत्येक वार्डात घरोघरी जाऊन १०० टक्के कचरा संकलन करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.

घंटागाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आल्यामुळे घंटागाडी कोणत्या मार्गावर, कोणत्या प्रभागात कचरा संकलन करत आहे, ह्याबाबतची निश्चित माहिती तात्काळ मिळते ही मार मोठी कौतुकाची बाब आहे. प्रत्येक घरी तसेच नाश्ता व जेवणाच्या हॉटेल्स दुकानदारांना डस्टबीनचे वाटप झाल्याने यामुळे कचरा संकलन योग्य रीतीने होऊन ओला व सुका कचरा विलगीकरण सुलभतेने होत आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात खूपच उत्कृष्ट काम सुरु असतांना शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालयांच्या भिंती, कम्पाऊंड रंगविण्यात येऊन स्वच्छतेच्या संदेशांनी शहर खूपच सुंदर व आकर्षक दिसत आहे. शिरपूरकरांनी मनापासून स्वच्छता मेहिमेला आपलेसे केले आहे. यामुळे शिरपूरकरांना उत्तम आरोग्य लाभणार यात शंकाच नाही.

ऑनलाईन रँकिंगमध्ये जादा गुण प्राप्तीसाठी शहरवासीयांनी कंबर कसली असून शहरात आलेल्या स्वच्छता समितीच्या सदस्यांना सकारात्मक उत्तरे देणे हे देखील तेवढेच महत्वाचे काम आहे. शहरवासीयांनी आपले कर्तव्य समजून शिरपूर स्वच्छ व सुंदर तर परंतु शिरपूरचे नाव देशात अग्रक्रमांकावर येण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये मोठ्या स्वरूपात सक्रिय सहभाग अतिशय मोलाचा आहे.

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये खालील प्रमाणे प्रश्‍न विचारले जाणार असून या प्रश्‍नांना उत्कृष्टपणे सकारात्मक व चांगला प्रतिसाद देणे नागरिकांकडून अपेक्षित आहे.

नागरिकांसाठी स्वच्छतेची नियमावली

आपले शिरपूर शहर या स्पर्धेत सहभागी असल्याची माहिती आपणास आहे का?
मागील वर्षाच्या तुलनेत आपले शिरपूर शहर हे स्वच्छ आहे का?
सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचरा कुंडीचा वापर आपण करता का?
घराघरातून ओला व सुका कचरा वेगवेगळया डब्यांमधून गोळा करण्याचे व्यवस्थेबाबत आपण समाधानी आहात का?
मागील वर्षाच्या तुलनेत शिरपूर शहरातील शौचालयाचे आणि मुतार्‍यांचे प्रमाण वाढलेले आहे का?
शिरपूर शहरातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ आणि जोडलेली आहेत काय?

प्रत्येक वॉर्डमध्ये स्पर्धा लागली असून स्वच्छतेसह रंगविणे, दुतर्फा रस्ते रंगविणे, चौक सजविणे, अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवून शिरपूर दवष्ट नंबर १ येण्यासाठी एकजूट झाले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्छता मोहिमेसाठी पक्षभेद व हेवेदावे बाजूला ठेवून सक्रिय झाले आहेत.

LEAVE A REPLY

*