धुळे आगारासाठी ४० शिवशाही बस : विभाग नियंत्रक देवरे यांची माहिती

0
धुळे |  प्रतिनिधी :  पायाभूत सुविधांचा विकास करतांनाच सामान्य, निमआराम बसच्या जोडीला महामंडळांतर्गत ४० शिवशाही बस, स्लिपरकोच बस धुळे आगारासाठी मागविण्यात आल्या आहेत. यामुळे परिवहन महामंडळ स्पर्धेत राहणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यंत्र अभियंता किशोर सोमवंशी, सांख्यिक प्रमुख आर.डी.पवार, वरिष्ठ वाहक राजेंद्र भावसार आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री.देवरे म्हणाले की, शिवशाही आणि स्लिपर कोच बसेसमुळे लांब पल्ल्याच्या मार्गासह अन्य विविध ठिकाणी या बसेस सुरु होतील.

निमआरामापेक्षा किरकोळ प्रमाणात जादा भाडे आकारुन प्रवाशांना दर्जेदार प्रवास करता येणार आहे. धुळे विभागाची कामगिरी पाहता जादा बसेस मिळू शकतात. या बसेसची देखभाल, दुरुस्ती व चालविण्याची जबाबदारी खासगी संस्थेला देण्यात येणार असून मात्र, वाहक हा महामंडळाचा राहील, असेही देवरे यांनी सांगितले.

पुढे बोलतांना देवरे म्हणाले की, मागील वर्षी महामंडळाचे अध्यक्ष रावते यांनी एस.टी.ला गतिमान करण्यासाठी महसूल वाढीवर लक्ष केंद्रीय केले होते.

या अपेक्षेला धुळे विभाग पूर्णपणे कसोटीला उतरला आहे. दि.१ मे ते ३१ मे या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत चार कोटींपेक्षा जास्त महसूल प्राप्त केला आहे. प्रवाशी केंद्रबिंदू मानून प्रवाशीभिमूख वक्तशीर दर्जेदार सेवा पुरविण्याचा संकल्प धुळे विभागाने केला आहे.

प्रवासीभिमूख सेवा पुरवितांना धुळ व नंदुरबार जिल्ह्यातील नऊ आगारात जलद सेवांबरोबरच शटल सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. त्या शटल सेवांमध्ये त्रुटी असतील, त्या फेर्‍या प्रवाशांकडून आलेल्या वेळेच्या बदलाबाबत विचार करुन निर्णय घेण्यात येणार आहे.

चालक, वाहक व यांत्रिकी कामगारांसाठी अद्ययावत विश्रांतीगृह बनविण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ही सुविधा नाही तेथे लवकरच सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे श्री.देवरे यांनी सांगितले.

सोलर वॉटर हिटरची सुविधा

धुळे विभागातील सर्व आगारांमध्ये थंड पाणी वॉटर प्युरिफायर व रात्र निवारासाठी आगारातील चालक व वाहक यांच्यासाठी सोलर हिटरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे श्री.देवरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*