विकासासाठी एकत्र या :धुळे महापालिकेच्या इमारत लोकार्पणप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचे आवाहन

0

धुळे ।  प्रतिनिधी :  सत्तेसाठी राजकारण करावे लागते. राजकारण करतांना संघर्ष हा करावाच लागतो. निवडणुकीच्या काळात संघर्ष जरुर करावा. परंतू, निवडणुक संपल्यानंतर राजकारण, पक्षभेद, मतभेद बाजुला ठेवून विकास कामांसाठी सवार्ंनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी केले.

धुळे महापालिकच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ. राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, सुनिल महाले, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते खा. शरद पवार यांना बैलगाडी भेट म्हणून देण्यात आली. तसेच धुळे महापालिकेतर्फे मानपत्र देण्यात आले.

खा. शरद पवार पुढे म्हणाले की, शहराच्या सौंदर्यात भर पडले अशी मनपाची वास्तू उभी राहिली आहे. धुळे शहर अनेक प्रश्नांनी ग्रासलेले आहे. विविध विकास कामांबाबत अनेक कार्यक्रम घेतले. मात्र येथील राजकारणामुळे त्यांची अंमलबजावणी होवू शकलेली नाही. सत्तेच्या राजकारणात संघर्ष होतो. परंतू, निवडणुक संपल्यानंतर मतभेद बाजुला ठेवून विकासासाठी सर्वानी एकत्र यायला पाहिजे.

या शहराच्या सीमा रेषेपासून दोन महामार्ग धावतात. तेव्हा शहराच्या आणि जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी त्याचा उपयोग करायला हवा. ग्रामीण भागातील मनुष्य शहराकडे येत आहे. याचा अर्थ विकासाची गती वाढू पाहत आहे. महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असल्याने इतर भागातील उद्योजक देखील महाराष्ट्रात येत आहेत. परंतू, असे असतांना राज्य सरकार मर्यादीत घटकांसाठी काम करीत आहे. त्याचवेळी मर्यादीत विचार पुढे येत आहेत. खरे तर ही परिस्थिती हानीकारक आहे.

प्रगत विचारांचे राज्य म्हणुन महाराष्ट्राची ओळख आहे. याला अनुसरुन वर्तन झाले पाहिजे, अशी अपेक्षा ही शरद पवार यांनी व्यक्त केली. सर्व समाज घटनाकांना सोबत घ्यावे, सामाजिक एकजुटीने देशाचा व राज्याचा चेहर बदलू शकतो. धुळे मनपाचे नेतृत्व महिला करत असल्याचा आनंद आहे. स्त्रीच्या कर्तृत्वाला मान्यता देण्याची भुमिका घेतली तर देश पुढे जाईल. महिलांना संधी देणे गरजेचे आहे. तसेच त्यांना प्रोत्साहित केले पाहीजेत. अधिकार त्यांच्या हातात दिले पाहीजेत, असेही खा. शरद पवार यांनी सांगितले.

शेवटी त्यांनी शहराचा चेहरा-मोहरा बदलायचा असेल तर राजकारण, पक्षभेद बाजुला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, विकासासाठी माझी मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

अमरिशभाईंचा आदर्श घ्यावा !

खरे तर आ. अमरिशभाई पटेल यांचा आदर्श घ्यावा. त्यांनी शिरपूर शहराचा विकास केला आहे. त्यांच्या शिरपूर पॅर्टनची राज्यात दखल घेतली जाते, असे सांगत तुम्ही तुमच्या कामाचा केंद्रबिंदू शिरपूर पुरता मर्यादीत ठेवू नका. बाहेर या जिल्ह्याकडेही लक्ष द्यावे, असे आ. पटेल यांना सांगितले. तुमच्या कामाची उपयोगीता राज्यासाठी आहे. तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. ज्याला विकास कळतो त्यांनी राज्याकडे बघावे. तुम्ही पुढाकार घ्यावा, विकासाचे राजकरण करा. शहराचा चेहरा-मोहरा बदलायला हवा, असेही खा. पवार म्हणाले

.

LEAVE A REPLY

*