Type to search

खान्देशच्या पुरातत्त्वीय इतिहासाकडे अभ्यासकांचे दुर्लक्ष !

maharashtra आवर्जून वाचाच धुळे मुख्य बातम्या

खान्देशच्या पुरातत्त्वीय इतिहासाकडे अभ्यासकांचे दुर्लक्ष !

Share
धुळे ।  प्रतिनिधी :  खान्देशाला पुरातत्त्वीय इतिहास लाभला आहे. जलसंस्कृतीचा प्रदेश म्हणून खान्देशची खरी ओळख आहे. येथूनच सुरू झाली. गड-किल्ले, स्थापत्य कलेत खान्देश अग्रेसर आहे. अशा खान्देशचा इतिहास अभ्यासण्यासाठी परदेशी लोक इथे येतात परंतु स्थानिक अभ्यासकाने मात्र खान्देशाला दुर्लक्षित ठेवला असल्याची खंत प्रा.डॉ.सर्जेराव भामरे यांनी व्यक्त केली.

येथील का.स.वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेतर्फे खान्देशचा सांस्कृतिक इतिहास प्रकल्पाच्या पुनर्लेखनासाठी निमंत्रित लेखकांसाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी डॉ. भामरे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.के.बी. पाटील, का.स.वाणी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत धामणे, सचिव प्रा.डॉ.शोभा शिंदे, विश्वस्त डॉ.न.म.जैन, जितेंद्र सोनगिरे, प्राचार्य बी.एन.पाटील, डॉ.वंदना महाजन, डॉ. सर्जेराव भामरे आदी उपस्थित होते.

डॉ.वंदना महाजन यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या सत्रात शशिकांत धामणे यांनी प्रसिद्ध झालेल्या पाच खंडांच्या खान्देशच्या सांस्कृतिक इतिहासाची भूमिका, उद्देश व त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या विविध विषयांचा समावेश आणि त्यासाठी लाभलेल्या सहयोगी लेखकांचे योगदान, कै.प्रा.डॉ.मु.ब. शहा यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून स्वीकारलेली जबाबदारी या विषयी कृतज्ञता व्यक्त करून नव्याने प्रकाशित होणार्‍या सात खंडांचे पुनर्लेखन हे दर्जेदार व नव्या पिढीला मार्गदर्शक ठरावे असे सांगितले.

यावेळी खान्देश खंडाचे सहयोगी लेखक प्राचार्य बी.एन. पाटील म्हणाले की, खान्देशचा सांस्कृतिक इतिहासाचे पुनर्लेखन समाजप्रबोधनाच्या चळवळीच्या दृष्टीने झाले पाहिजे. समाजातील अनिष्ट जातपंचायत व्यवस्था याकडे लक्ष वेधले पाहिजे. खान्देशात शिक्षक परंपरा फार मोठी आहे. लोकशिक्षक म्हणून त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, याची नोंद घेतली गेली पाहिजे.असे त्यांनी सांगितले.

पहिल्या सत्राच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.के.बी. पाटील म्हणाले की, खानदेशात स्थलांतरित झालेला समाज खूप मोठा आहे. याचा मूळ शोध संशोधकांनी घेतला पाहिजे. दर्जेदार प्रकल्प उभे करण्यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेतली पाहिजे. संशोधनाच्या अंगाने खान्देश खंडाचे उत्तम दर्जाचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दुसर्‍या सत्रात व्याख्याने डॉ.सुनंदा पाटील यांनी बंजारा समाज, गोसावी समाज, कंजर समाज यांचे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून लेखन झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले, तर डॉ.पुष्पा गावीत यांनी आदिवासी बोली संस्कृती, खान्देशातील राजवटीचा इतिहास यावर प्रकाश टाकला. तर डॉ. फुला बागुल यांनी खान्देशातील साहित्य व बोली यावर मार्गदर्शन केले.

सत्राध्यक्ष म्हणून प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.एस.आर.चौधरी यांनी भूमिका बजावली.तिसर्‍या सत्रात लता प्रतिभा मधुकर यांनी संशोधन पद्धती आणि इतिहास लेखन, संध्या नरे-पवार यांनी संशोधनातील विविध प्रवाह, डॉ.सयाजी पगार, खान्देशातील लोकदैवते, पत्रकार संजय झेंडे यांनी खान्देशातील तडवी समाज संस्कृती तर सत्राध्यक्ष रमेश सूर्यवंशी यांनी कन्नड लोकगीतांचा ऐतिहासिक अभ्यास,कृषी संस्कृती, खान्देशातील भाषा, म्हणी यावर मार्गदर्शन केले.

खुल्या सत्रात सुभाष अहिरे, विशाल गवळी, संध्या पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेच्या तिन्ही सत्रांचे सूत्रसंचालन डॉ. भारती लाडकर, डॉ. नामदेव माळी व प्रा. ललित पाटील यांनी केले. कार्यशाळेस धुळे-जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील लेखक उपस्थित होते. शेवटी डॉ.वंदना महाजन यांनी आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!